Monday, May 6, 2024
Homeक्रीडाIPL 2024प्रथम विजयावर चेन्नईचे ‘लक्ष्य’

प्रथम विजयावर चेन्नईचे ‘लक्ष्य’

विजयी लय कायम ठेवण्यास लखनऊ उत्सुक

चेन्नई (वृत्तसंस्था) : सलामीचा सामना गमावल्यानंतर, चेन्नई सुपर किंग्ज सोमवारी त्यांच्या खोप्यामध्ये परतत अर्थात पहिल्या घरच्या सामन्यासाठी एमए चिदंबरम स्टेडियमवर १६व्या हंगामातील आपला पहिला-वहिला विजय मिळविण्याचे लक्ष्य ठेवेल, तर लखनऊ जायंट्सचा संघ विजयी लय कायम ठेवण्यास उत्सुक आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील स्पर्धेतील गुजरातनंतर दुसरा नवखा पण दमदार संघ लखनऊ सुपर जायंट्सने दिल्लीला अस्मान दाखवत हंगामाची विजयी सुरुवात केली आहे.

गत सामन्यात मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने धमाकेदार खेळी करूनही, बाकीचे फलंदाज चेन्नईला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत करू शकले नाहीत. गायकवाडने गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांशी दोन हात केले. तो बाद झाल्यानंतर संघाच्या धावा मंदावल्या आणि चेन्नई फक्त माफक धावसंख्या उभारू शकला, ज्याचा गतविजेता गुजरातने यशस्वी पाठलाग केला. परंतु सोमवारी होणाऱ्या सामन्यात  संघाच्या चाहत्यांना आशा असेल की, चेन्नई घरच्या मैदानावर मजबूत फलंदाजी करेल.

ताफ्यातील महागडा खेळाडू बेन स्टोक्स चेन्नईच्या घरच्या मैदानात आपली योग्यता दाखवण्यासाठी व धावांचा वेग  वाढविण्यासाठी उत्सुक असेल. पण मधल्या षटकांमध्ये वेग वाढवण्यास फलंदाजांची असमर्थता चिंतेचे कारण असेल. शिवाय गोलंदाजीही मोठी समस्या ठरू शकते. कारण, गत सामन्यात त्यांना टायटन्सच्या फलंदाजीला रोखता आले नाही त्यामुळे कर्णधार धोनीला गोलंदाजांकडून सुधारित कामगिरीची अपेक्षा असेल.

सीएसकेसाठी दिलासा देणारा घटक म्हणजे या मैदानात नुकत्याच खेळल्या गेलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात फिरकीपटूंचा बोलबाला राहिला होता. त्यामुळे चेन्नई आणि लखनऊ या दोन्ही संघात अतिरिक्त फिरकीपटू खेळू शकतो. रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर यांनी पहिल्या सामन्यात फारसा प्रभाव पाडला नाही, पण त्यांच्याकडून या सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. तसेच श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज महेश थिक्षाना संघाच्या पहिल्या तीन सामन्यांसाठी उपलब्ध नसल्यामुळे, फिरकी गोलंदाजी विभागाला बळ देण्यासाठी कोणाची निवड केली जाते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्सने शनिवारी रात्री दिल्ली कॅपिटल्सला ५० धावांनी पराभूत करत स्पर्धेचा धमाकेदार श्रीगणेशा केला आहे. काइल मेयर्सने सुपर जायंट्ससाठी विजयी कामगिरी केली. त्यामुळे आक्रमकतेला किंचित आवर घालून फिरकीपटूंसाठी अनुकूल असलेल्या या विकेटवर त्याची कामगिरी महत्त्वपूर्ण असेल. कर्णधार राहुल, जो अलीकडच्या काळात धावांसाठी झगडत आहे, तोही लयीत येण्यास उत्सुक असेल. मागील सामन्याआधी ट्रोल होत असलेला आणि सामन्यानंतर ट्रेंड होत असलेला निकोलस पूरन आणि मार्कस स्टॉइनिस हे लखनऊसाठी इतर प्रमुख फलंदाज असतील. वेगवान गोलंदाज मार्क वुड, ज्याने आपल्या ‘पंच’ने दिल्लीच्या आशा धुळीस मिळवल्या, त्याच्यापासून सीएसकेचे फलंदाज सावध असतील.  त्याच्या वेगामुळे सीएसकेचे फलंदाज अडचणीत येऊ शकतात. फलंदाजांची चलती असलेल्या क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये मार्क वुडने लक्ष वेधून घेतले. सोबत लखनऊचे फिरकीपटू रवी बिश्नोई आणि के गौतम यांची भूमिकाही महत्त्वाची आहे. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जच्या या सामन्यात निकालाची गुरुकिल्ली गोलंदाजांच्या हाती राखून गोलंदाजी विरुद्ध फलंदाजी अशी मनोरंजक लढाई पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वेळ : सं. ७.३० वाजता

ठिकाणी : एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -