Sunday, May 19, 2024
Homeदेशमुघलांचा इतिहास अभ्यासक्रमातून काढणार!

मुघलांचा इतिहास अभ्यासक्रमातून काढणार!

उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारचा मोठा निर्णय

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने उत्तर प्रदेश बोर्ड आणि सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम बदलला आहे. त्यामुळे आता बारावीच्या विद्यार्थ्यांना मुघलांचा इतिहास शिकवला जाणार नाही. भारताचा इतिहास या पुस्तकातून मुघल दरबार हा विषय कमी करण्यात आला आहे. तसेच ११ वीच्या पुस्तकातून इस्लामचा उदय, संस्कृतींमध्ये झालेले मतभेद, औद्योगिक क्रांती असे धडे हटवण्यात आले आहेत. हा बदल २०२३-२४ या वर्षापासून करण्यात आला आहे.

याआधी योगी सरकारने आग्रा मुघल म्युझियमचे नाव बदलले होते. योगी सरकारने हे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम असे ठेवले होते. गुलामीची मानसिकता दाखवणारी प्रतीकं उत्तर प्रदेशात नकोत या आशयाचे ट्वीटही तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते.

दरम्यान, इतिहासाच्या पुस्तकासोबतच इतर विषयांमध्येही बदल करण्यात आला आहे. याआधी बारावीच्या इतिहासाच्या पुस्तकात भारतीय इतिहास II मध्ये शासक ते मुघल दरबार हे धडे होते. ही सगळी प्रकरणं आता वगळण्यात आली आहेत. तर दुसरीकडे नागरिक शास्त्राच्या पुस्तकातून अमेरिकेचे वर्चस्व आणि शीतयुद्ध हे धडे हटवण्यात आले आहेत.

या निर्णयानंतर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी सांगितले की, “आपली संस्कृती हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. नव्या पिढीला आपण हा वारसा काय होता ते शिकवलं पाहिजे. पुरातन काळात लोक कोणत्या संस्कृतीत होते हा विषय शिकवलाच गेला नाही. त्यामुळे आम्ही मुघलांचा इतिहास वगळून त्याऐवजी हा विषय शिकवणार आहोत.”

उत्तर प्रदेश सरकारने अकरावी आणि बारावीच्या पुस्तकांतून मुघलांचा इतिहास वगळण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्याबाबत समाजवादी पार्टीचे आमदार आणि माजी माध्यमिक शिक्षण मंत्री नवाब इकबाल मेहमुद यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “भाजपाचं सरकार मुस्लीम समाजाच्या विरोधात जे काही करता येईल ते सगळं करतं आहे. मात्र नुसतं इतिहासातून अभ्यासक्रम वगळून काय होणार? मुघल काळात भारताने खूप प्रगती केली होती हे कसं विसरता येईल?” असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

तसेच नवाब इकबाल मेहमुद म्हणाले की, आता या सरकारने जी अभ्यासक्रमात सध्याची पुस्तकं आहेत ती सगळी पुस्तकंही जप्त केली पाहिजेत. असे केले तर मुघल शासकांचा इतिहास होता याचा पुरावाच नष्ट होईल. भाजपाकडून फक्त मतांच्या राजकारणासाठी या गोष्टी केल्या जात आहे. ताजमहाल, लाल किल्ला, कुतुबमिनार यांचा इतिहास फक्त भारतासाठीच मर्यादित नाही तर तो इतिहास सगळ्या जगाला माहित आहे. कारण सगळ्या जगातले पर्यटक ही ठिकाणं पाहण्यासाठी येत असतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -