Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेनिवडणुकीचे बिगुल वाजताच उमेदवारांची भाऊगर्दी

निवडणुकीचे बिगुल वाजताच उमेदवारांची भाऊगर्दी

वचननामे, जाहीरनामे आणि कार्य अहवालांचा भडीमार

ठाणे (प्रतिनिधी) : शनिवारी ठाणे महानगरपालिकेसह नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली. मात्र गेली वर्षभर आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी आस लावून बसलेल्या अनेक भावी उमेदवारांचे मनसुबे उधळले, तर प्रस्थापितांचे घोडे गंगेत न्हाले आहेत.

आजी-माजी नगरसेवक व नव्याने निवडणूक लढवू पाहणारे उमेदवार यांनी आपापल्या वॉर्डात प्रचाराचा धडाका विविध नागरी कामे व सामाजिक उपक्रमांनी सुरू केला आहे. यामुळे आता उमेदवारांची भाऊगर्दी पाहायला मिळणार आहे. अनेक इच्छुक कार्यकर्ते इन्स्टा, फेसबुकवर आपापल्या प्रभागातील मतदारांना प्रश्न विचारत आहेत की, मी कसा लायक आहे. माजी नगरसेवकांचे वचननामे, जाहीरनामे आणि कार्य अहवाल आता सोशल मीडियावर यायला सुरुवात झाली आहे. मात्र तो कार्यकर्ता निवडणुकीस सक्षम आहे की नाही, हे पक्षश्रेष्ठीच ठरवतील, हे आगामी घोडेबाजारातून दिसून येईल.

ठाणे मनपा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्रिसदस्यीय पॅनल जाहीर झाल्याने अनेक इच्छुकांची आणि आजी-माजी नगरसेवकांची भाऊगर्दी झाली आहे. जानेवारीमध्येच पॅनल पद्धती जाहीर झाली होती. त्यावर हजारो हरकतींचा पाऊसही पडला. मात्र या सर्व हरकतींना प्रशासनाने हरताळ फासत नव्याने झालेली रचना कायम राखतच पॅनल जाहीर केले. यामध्ये माजी नगरसेवकांचे वॉर्ड इकडचे तिकडे झाले. कुणाला फायदा तर कुणाचे नुकसान होईल, मात्र आगामी निवडणूक ही सर्वच पक्षांची सत्त्वपरीक्षा ठरणार आहे.

मात्र जो नगरसेवक गेली दोन-तीन टर्म सचोटीने आपल्या प्रभागात काम करत आहे. जनमानसात आपली छाप उमटवून आहे तो नक्कीच यात सरस ठरेल. त्याला फुटलेल्या वॉर्डाची भीती नसेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे, तर इच्छुक उमेदवारांनी यापूर्वीच आपल्या वॉर्डात मतदारांना पायघड्या घालत विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांतून जनसंपर्क वाढविण्याचा प्रयत्न केला आहे, तो किती यशस्वी ठरतो हे येत्या निवडणुकीतूनच स्पष्ट होईल. दरम्यान आपण ज्या पक्षात प्रवेश केला त्या पक्षातून उमेदवारी मिळविण्यासाठी मोठा घोडेबाजार होणार हे मात्र निश्चत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -