Monday, May 6, 2024
Homeसाप्ताहिककोलाज‘रातराणी’ची जन्मकथा

‘रातराणी’ची जन्मकथा

सतीश पाटणकर

एसटीची ‘रातराणी’ सेवा ही आता सर्वत्र परिचित असलेली सेवा आहे; परंतु काही वर्षांपूर्वी जेव्हा रात्रीच्या वेळी एसटी गाड्या अधिकृतपणे धावत नसायच्या तेव्हा सावंतवाडीचे आगार व्यवस्थापक मनोहर नाईक यांनी कामगार व प्रवाशांच्या हितासाठी आणि वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी ‘रातराणी’ची कल्पना मांडली. तिला अधिकृत मान्यता मिळाली नाही, तरी स्वतःच्या हिमतीवर परिणामाची तमा न बाळगता त्यांनी ती प्रत्यक्षात आणली. एसटीच्या प्रत्येक आगाराच्या काही वेगळ्या लहान-मोठ्या समस्या असतात. उदाहरणार्थ, खुद्द त्या आगाराच्या गाड्यांच्या खेपांहून अन्य ठिकाणाहून येणाऱ्या गाड्यांच्या खेपांची संख्या दुपटीने, तर त्याहूनही अधिक पटीने असते. त्याचा भार आगारातील काही विभागांवर पडतो. शिवाय चांगले-वाईट रस्ते यांचे प्रमाण कमी-जास्त असू शकते. म्हणून आगार व्यवस्थापकाला अशा सर्व समस्यांची ओळख करून घेणे आवश्यक ठरते.

मुंबईहून बोटीने गोवा, वेंगुर्ले, कुडाळ इत्यादी ठिकाणचे प्रवासी परतीच्या प्रवासासाठी सर्वस्वी एसटीच्या गाड्यांवर अवलंबून असत. मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई आगारातून गाड्या सोडल्या जात आणि परतीच्या प्रवासात त्या जवळजवळ मोकळ्याच धावत. जूनच्या १० तारखेच्या सुमारास शाळा, कॉलेजे उघडत असल्यामुळे मुंबईला परत जाण्यासाठी सर्वसाधारणपणे मे २८ ते जून १० या काळात झुंबड उडे. मग मुंबईच्या गाड्यांवर भिस्त ठेवून आणि सावंतवाडी परिसरात धावणाऱ्या गाड्या बंद करून त्या गोवा-मुंबई, सावंतवाडी-मुंबई, वेंगुर्ले-मुंबई अशा वळवल्या जात. परिस्थितीमुळे ही व्यवस्था अपरिहार्य; परंतु प्रवासी जनतेच्या आणि आगारातील कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत अव्यवहारी, खर्चिक आणि धोकादायक होती.

त्या काळी मुंबई-चिपळूण-कणकवली-गोवा या रस्त्याचा बराच भाग अरुंद, खाडीचा असल्यामुळे सावंतवाडी-मुंबई आणि दक्षिणेकडील अन्य ठिकाणच्या गाड्या आजरा-कोल्हापूर-पुणे-मुंबई अशा जात असत. हा मार्ग गोवा-चिपळूण-मुंबई मार्गाहून थोडा अधिक लांबीचा होता. संध्याकाळनंतर पहाटेपर्यंत या धुक्यातून गाड्या चालवणे अत्यंत कठीण आणि धोकादायक होते. गोवा-मुंबई प्रत्यक्षात २४ तास, तर कधी ३६ किंवा त्याहून अधिक वेळ लागत असे. वास्तविक सरकारी नियमांप्रमाणे जास्तीत जास्त १२ तास दैनंदिन ड्युटी घेता येते. हा नियम अतिश्रमाने अपघात होऊ नये या कारणामुळेही केलेला असेल. आता सलग ४८ तास बस चालवणाऱ्या चालकाचे काय होत असेल, हा विचार त्यांच्या मनात आला. हे थांबवलेच पाहिजे, असा निश्चय केला. त्यांनी कामगारांशी चर्चा करून एक योजना आखली.

गोवा-सावंतवाडी वाहतूक चिपळूणमार्गे चालवावी. दोन चालकांनी  पालटून बस चालवावी म्हणजे त्याना सलग बस चालवावी लागणार नाही. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच बऱ्याच रस्त्यांवरची वाहतूक बंद पडल्यामुळे ४-५ बसेस पडून राहत. संपूर्ण बस वाहतुकीचा अभ्यास करून, या काळासाठी २२ बसेस आणि ३३ चालक १५ दिवसांसाठी सावंतवाडीला पाठवावे व या परतीच्या वाहतुकीला शिस्त लावावी, अशी कागदोपत्री योजना करून ती रत्नागिरीच्या विभागीय कचेरीला ऑगस्ट १९६५ या महिन्यात पाठवली. १९६६चे वर्ष उजाडले. पण त्यांना वरिष्ठ कचेरीतून काहीच प्रतिक्रिया मिळाली नाही. तेव्हा त्यांनी सावंतवाडीचे आमदार शिवराम राजे भोसले यांना भेटून परतीच्या वाहतुकीचा सगळा घोळ कथन केला. त्यांनाही धक्का बसला. त्यांनी पर्याय सुचविण्यास सांगितले. त्यांनी ती वाचली आणि म्हणाले की, “तुम्हाला १५ मेपर्यंत तुम्ही मागितल्याप्रमाणे बसचालक व बसेस मिळाल्या नाहीत, तर मला भेटा.” दरम्यान ते त्यांना अनेक वेळा भेटले. चालकांची आणि बसेसची काहीच व्यवस्था झाली नव्हती. मेचा दुसरा आठवडा उलटला. वरिष्ठांची प्रतिक्रिया शून्य. ते राजेसाहेबांना भेटले. ते मुंबईला गेले आणि जनरल मॅनेजरला भेटले. परत आल्यावर म्हणाले की, “तुम्हाला २-३ दिवसांत बसेस आणि चालक मिळतील.” पण एसटीच्या कारभाराचा खाक्या त्यांना माहीत होता.

सावंतवाडीच्या आगारातील सर्व कामगारांच्या मनःपूर्वक सहाय्यावाचून आणि राजेसाहेबांच्या पाठिंब्यावाचून ती अमलात आणणे शक्य झाले नसते. २० मेपासून बेतीम-मुंबई, सावंतवाडी-मुंबई, कुडाळ-मुंबई, वेंगुर्ले-मुंबई अशी रात्री ८-९ वाजता सुटणाऱ्या बसेसची आगाऊ तिकिटे देण्यास सुरुवात केली. विशेष निष्णांत चालकांची नावे कामगार पुढाऱ्यांनीच दिली आणि २७ जून ते १० जुलै अशा रात्रीच्या बसेस चालवल्या. कुठेही अपघात झाला नाही. बसला ओरखडाही आलेला नाही. प्रवासी जनता खूश झाली. बसेस वेळेवर सुटू लागल्या आणि वेळेवर पोहोचू लागल्या.

दरम्यान काही विशेष घटना घडल्या. मुंबईच्या मुख्य कचेरीतून आमच्या प्रमुख वाहतूक व्यवस्थापकांचा ट्रंक कॉल आला. ते म्हणाले की, “तुमची सस्पेन्शन ऑर्डर निघत आहे. तुम्ही रात्रीची वाहतूक ताबडतोब बंद करा.” तोपर्यंत सर्व परतीचे प्रवासी मुंबईला गेले होते. राजेसाहेबांना मुंबई कचेरीचा संदेश कळवला. ते रातोरात मुंबईला गेले आणि मुख्यमंत्री वसंतराव नाईकांची भेट घेऊन सारा प्रकार सांगितला. नाईक साहेबांनी जनरल  मॅनेजरला बोलावून त्यांची कानउघाडणी केली.

एस्टिमेट कमिटीचे चेअरमन अंतुलेसाहेब सावंतवाडीला खास रात्रीच्या वाहतुकीची चौकशी करायला आले. अंतुले यांनी आपल्या कमिटीच्या अहवालात “महामंडळाने रात्रीच्या बसगाड्या  पल्ल्याच्या इतर मार्गावरही चालवण्याच्या दृष्टीने पावले टाकावी”, अशी आदेशवजा सूचना दिली. १९६७ पासून सावंतवाडी-मुंबई ही पहिली अधिकृत ‘रातराणी’ चालू झाली. हळूहळू इतर मार्गावरही रातराण्या धावू लागल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -