Wednesday, May 8, 2024
Homeमहत्वाची बातमीबडतर्फ कामगारांना पुन्हा कामावर घेता येत नाही

बडतर्फ कामगारांना पुन्हा कामावर घेता येत नाही

एसटी महामंडळ संचालकांनी दिला गंभीर इशारा

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरू असून काही कर्मचारी कामावर रूजू झाले असले तरी बहुतांश कर्मचारी अद्यापही आंदोलनावर ठाम आहे. त्यामुळेच एसटी महामंडळाने अनेक कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती, बडतर्फ करण्याची कारवाई केलीय. याबाबत एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी स्वतः आकडेवारी माध्यमांसमोर ठेवली. तसेच बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेता येत नाही, असे नमूद करत संपावर ठाम असणाऱ्या कामगारांना एकप्रकारे इशारा दिला आहे.

चन्ने म्हणाले, ‘संप सुरू झाला तेव्हा पटावर ९२ हजार कर्मचारी होते. त्यानंतर रोजंदारीवर असलेल्या २००० लोकांची सेवासमाप्ती झाली. कालपर्यंत (१३ जानेवारी) ३१०० कर्मचारी सेवेतून बडतर्फ झाले आहेत. साधारणतः या काळात संप केल्याने आणि इतर काही कारणाने आम्हाला ५००० कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त कराव्या लागल्या. साधारणतः ८७ ते ८८ हजार कर्मचारी आत्ता पटावर आहेत. त्यापैकी २६ हजार ५०० कर्मचारी आता कामावर आहेत’.

पत्रकारांनी संपादरम्यान बडतर्फ कर्मचाऱ्यांच्या पुन्हा वापसीचा काही मार्ग आहे का? असा प्रश्न विचारला. यावर शेखर चन्ने यांनी बडतर्फ कामगारांना पुन्हा सेवेत घेता येत नाही, असे स्पष्ट केले.
‘बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर येण्यासाठी काही प्रक्रिया आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील आधी सांगितले होते की बडतर्फ झाल्यावर त्याला कामावर घेता येत नाही. ती तेवढी सोपी प्रक्रिया नाही. म्हणूनच कर्मचाऱ्यांना आमचे आवाहन आहे की अशाप्रकारची कारवाई त्यांच्यावर करण्याची वेळ येऊ नये. त्यांना यातून पुढे त्रास होऊ नये म्हणून त्यांनी रूजू व्हावे. बऱ्याचशा कर्मचाऱ्यांची कामावर हजर होण्याची इच्छा आहे. ते रुजू होत आहेत. सध्या महाराष्ट्रात सकारात्मक चित्र दिसून येत आहे,’ असे चन्ने यांनी नमूद केले.

७५० खासगी चालक कंत्राटी पद्धतीने घेणार…

‘एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले, तर त्यांच्यावर कारवाई करणार नाही. ७५० खासगी चालक कंत्राटी पद्धतीने घेण्यात येत आहेत. जे सेवानिवृत्त झाले आहेत, ज्यांचे वय ६२ पेक्षा कमी आहे, जे फिट आहेत त्यांना काही काळ कामासाठी घेणार आहोत. एसटी सेवा प्रवाशांना मिळावी हा खासगी चालक कंत्राटी पद्धतीने घेण्यामागचा हेतू आहे,’ असंही चन्ने यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -