Friday, April 26, 2024
Homeदेशलोकसभेसोबत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक होणार!

लोकसभेसोबत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक होणार!

भाजपाची रणनीती

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक ही पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसोबतच घेण्याचा विचार भाजपाच्या नेतृत्वाकडून सुरू आहे. राज्यातील विधानसभेची निवडणूक लोकसभेसोबतच घ्यावी असा प्रस्ताव प्रदेश भाजपाने केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुढील विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी भाजपाने वेगळी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार या प्रस्तावावर आता केंद्रीय नेतृत्वाकडून विचार सुरू आहे.

पुढील वर्षभरात शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्याकाळात अनेक धाडसी निर्णय घेतले जातील. त्या कामाचा वेग आणि महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही लोकसभा निवडणुकीसोबत घेतल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याचा मतदारांवर प्रभाव पडेल. तसेच या निवडणुकीत राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांमुळेही मतदारांना प्रभावित करता येईल, असा प्रदेश भाजपाचा होरा आहे.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मविआ सरकार कोसळून शिंदे गट आणि भाजपा अशी युती होऊन नवे सरकार स्थापन झाले.

राज्यात सत्तांतर झाले असले तरी कोर्टकचेरी आणि रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार यामुळे नव्या सरकारचा म्हणावा तसा जम अद्याप बसलेला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती करून स्थापन झालेल्या सरकारच्या कारभाराचा प्रभाव पडण्यास वेळ लागू शकतो, असे प्रदेश भाजपाला वाटते. त्यातच महाविकास आघाडीमधील ठाकरे गट दुबळा झाला असला तरी मविआ म्हणावी तशी दुबळी झालेली नाही. त्यातच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जागावाटप निश्चित केल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे मविआ एकत्र लढल्यास शिवसेना-भाजपाची डोकेदुखी वाढू शकते, असा भाजपाचा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभेची निवडणूक घेतल्यास ते अधिक फायदेशीर ठरेल, असे भाजपाला वाटते.

त्यामुळे लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभेची निवडणूक लढण्याचा प्रस्ताव देण्यात आला असून, भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून त्यावर विचार सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -