Saturday, May 4, 2024
Homeमहत्वाची बातमीसंजय राऊत भाकरी 'मातोश्री'ची खातात अन् चाकरी पवारांची करतात

संजय राऊत भाकरी ‘मातोश्री’ची खातात अन् चाकरी पवारांची करतात

‘दादा’ भडकले आणि ‘दादां’ना भिडले! विधानसभेत गोंधळ!

मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या विरोधात टीका करत असताना मंत्री दादा भुसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेतल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तात्काळ जागेवरुन उठत यावर आक्षेप घेतला.

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारमधील मंत्री दादा भुसे यांच्यावर ट्विट करत गंभीर आरोप केले आहेत. मालेगाव येथील गिरणा अॅग्रो नावाने त्यांनी कोट्यवधी रुपयांचे शेअर्स गोळा केल्याचा गंभीर आरोप भुसे यांच्यावर केला आहे. कंपनीच्या नावाने कोट्यवधी रुपयांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा करण्यात आले. मात्र प्रत्यक्ष कंपनीच्या वेबसाइटवर कमी शेअर्स दाखवण्यात आले आहेत. ही थेट जनतेची लूट आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊतांच्या या ट्विटवर आज विधानसभेत निवेदन मांडत दादा भुसे यांनी राऊतांना चोख प्रत्युत्तर दिले. दादा भुसे म्हणाले की, आम्हाला नेहमी गद्दार म्हणणारे, मात्र आमच्याच मतांवर निवडून येणारे महागद्दार संजय राऊत यांनी काल माझ्याबद्दल एक ट्विट केले. माझी आपल्याला विनंती आहे की, जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून त्यांनी जे ट्विट केले आहे त्याची चौकशी व्हावी. या प्रकरणात मी दोषी आढळल्यास मंत्रिपदाचा, आमदारकीचाच काय संपूर्ण राजकारणातून निवृत्त होईल. तसेच जर या प्रकरणात खोटं आढळून आल्यास त्यांनी आमच्या मतावर निवडून आलेल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. त्याचप्रमाणे दैनिक सामनाच्या संपादकपदाचा राजीनामा देखील द्यावा, असे आव्हान दादा भुसे यांनी संजय राऊतांना दिले आहे. तसेच संजय राऊतांनी माफी न मागितल्यास मालेगावचे शिवसैनिक त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील दादा भुसे यांनी दिला आहे.

दादा भुसे पुढे म्हणाले की, हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादीचे माननीय शरद पवार यांची करतात आणि हे आम्हाला शिकवतात. दादा भुसेंनी असे वक्तव्य करताच विरोधी पक्षातील आमदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ‘दादा भुसे हाय हाय’ अशा घोषणा देखील सभागृहात देण्यात आल्या. त्याचवेळी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तात्काळ जागेवरुन उठत दादा भुसे यांना सुनावले. तुम्हाला काय मांडायचे आहे ते मांडा, मात्र तुम्ही आमच्या पक्षाचे प्रमुख शरद पवारसाहेबांचे यांचे नाव घेण्याची गरज नाही. दादा भुसे यांनी सभागृहात जे काही म्हटले आहे, ते रेकॉर्डवरुन काढून टाका, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दादा भुसे यांनी केलेले विधान आम्ही तपासून घेऊ आणि त्यात जे काही अनुचित असेल ते रेकॉर्डवरुन काढून टाकण्यात येईल, असे स्पष्टीकरण दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -