Sunday, April 28, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सआर यू फीलिंग गिल्टी!

आर यू फीलिंग गिल्टी!

विशेष – डॉ. स्वाती विनय गानू

परागने सात वर्षांच्या अयानला रागावून दोन थोबाडीत मारल्या. तो कळवळलाच. परागच्या दणकट हाताच्या पाच बोटांचे वळ त्याच्या गालावर उमटले होते. अतिशय महागडा फ्लाॅवरपाॅट अयानच्या मस्तीमुळे फुटला होता. पण अयान कळवळला तसा पराग भानावर आला. त्याला आपल्या वागण्याने अपराधी वाटायला लागलं. आपण इतकं रिॲक्ट व्हायला नको होतं असं त्याला वाटलं.

दोन वर्षांच्या निहाराला घरी बेबीसीटरबरोबर ठेवून ऑफिसला जाणाऱ्या रसिकाला अलीकडे सारखं गिल्टी वाटायचं. तिला या वयात आपली सगळ्यात जास्त गरज आहे. नोकरी करणंही आपण थांबवू शकत नाही. सासू-सासरे, आई-बाबांनी गेली दोन वर्षे खूप मदत केली; पण शेवटी त्यांच्याही मर्यादा आहेत. निहाराला त्या मावशी नीट सांभाळतील ना? वेळेवर जेवायला देणं, झोपवणं, तिला खेळवणं करतील का प्रेमाने? आपण असं तिला दुसऱ्याच्या भरवशावर सोडून ऑफिसला येतोय, ही अपराधीपणाची भावना तिला मनाला खूप त्रास द्यायला लागली.

पालक म्हणून मूल वाढवताना बहुतेक पालकांच्या मनाची ही कुतरओढ होत असते. मुलांना सांभाळताना काही तडजोडी कराव्या लागतात, निर्णय घ्यावे लागतात. स्त्रिया कधीकधी ऑफिसमध्ये आल्यावर अनावर होऊन रडायला लागतात. विचारलं की कळतं मुलगा, मुलगी आजारी आहेत, परीक्षा आहे. अशा वेळी त्यांच्या मनात असहायता असते आणि गिल्टही असतं. स्वतःला दोष देणं हे खूप घडतं. मुलांनी मागितलेली वस्तू घेऊन न देणं, नाही म्हणणं, खेळण्याचा, टीव्ही बघण्याचा वेळ कमी करणं, मी सांगेन तेच मित्र निवडणं, ही बंधनं घालताना पालकांना निश्चितच थोडं वाईट वाटतं, पण जर त्यांना हवा असणारा तुमचा वेळ जर तुम्ही देऊ शकत नसलात, तर जी अपराधीपणाची भावना मनाला टोचत राहते ती वेदनादायी असते.

आपल्या मुलांबरोबर जेवणं, खेळणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, काही निमित्त नसलं तरी मुलांना बाहेर घेऊन जाणं, यासाठी आपण कमी पडलो की पालकांना अपराधी वाटतं. त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवणं, मुलात मूल होऊन खेळणं हे प्रत्येकाला करत रहावं असं वाटत असतं. पण हे करू शकलो नाही तर खूप पालकांना गिल्टी वाटतं.

काहींच्या बाबतीत या अपराधीपणाच्या भावनेचे मूळ बालपणी त्यांचे आई-वडील त्यांना वेळ देऊ शकले नाहीत यातही असतं. काही मुलं आई-वडील ऑफिसमधून घरी येईपर्यंत शेजाऱ्यांच्या घरी थांबतात. बहुतेकजण स्वभावाने चांगले असतात. पण काहीजण मुद्दाम टोमणा मारतात आणि ‘बिच्चारा’ असं म्हणून दया, दाखवण्याचं सोंग आणतात. मुलांना हे समजतं की, आपले आई-वडील नोकरी करतात म्हणून आपल्याला असं घराबाहेर बसून राहावं लागतं किंवा दुसऱ्याच्या घरी त्यांची वाट पाहावी लागते. आपल्या मुलांना अशी वेळ येऊ नये यासाठी पालकांची धडपड सुरू होते.

या अपराधीपणाच्या भावनेतून थोडा तरी रिलीफ मिळावा यासाठी काय करता येईल : आपण आपल्या मुलांवर मनापासून प्रेम करतो. त्यांना चांगल्या सवयी लागाव्यात, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत, यासाठी हे प्रयत्न आपण करत आहोत. त्यामुळे अपराधीपण घेऊन जगायचे नाही. मात्र मारणं हा पर्याय कधीच असू शकत नाही. मूल जन्माला घालताना आई-वडील या नात्याने त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी आपल्यावर असते. त्यासाठी नोकरी, व्यवसाय करणं अपरिहार्य आहे. त्यामुळे उगाच वेळ वाया घालवणं, टाइमपास करणं, चकाट्या पिणं, गाॅसिपिंग करणं यात तुम्ही वेळ वाया घालवत नाही आहात. अर्थार्जनाचे साधन म्हणून ते तुम्हाला करावे लागणार आहे. तेव्हा मुलांना घरी सवयीच्या नसलेल्या माणसांच्या भरवशावर सोडून जाणं जीवावर येऊ शकतं, मनात असुरक्षितताही वाटू शकतं. पण त्यात तुमचा दोष नाही, मग गिल्ट का बरे?

मुलं अनेकदा चुकीचं वागतात, उलट उत्तरं देणं, शिव्या देणं, अभ्यासात अधोगती होत जाणं, व्यसनांच्या आहारी जाणं, तुमच्या मुलांचं खाणं अतिरेकी असेल, मूल जोरजोराने किंचाळून बोलणारं असेल, स्क्रीन टाइमचे सर्वोच्च टोक गाठणारे असेल, तर यात आपलाच सर्वस्वी दोष असे मानणं बिलकुल योग्य नाही. यातून मार्ग काढणं, बाहेर पडण्यासाठी मुलांना मदत करणं हे जरूर करा. why me? पेक्षा what can I do now? यावर विचार करा. मीच अपराधी आहे, असे वाटून घेऊ नका.

मुलांच्या इच्छा पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य आहेच. पण काही वेळेस त्या पूर्ण करता आल्या नाहीत, तर वाईट वाटून स्वतःला कमी लेखणं, आपलंच चुकतंय असं समजणं ही भावना मनाला गिल्ट देते ते टाळायला हवं. इतरांची मुलं नामवंत शाळेत शिकताहेत, त्यांना भरपूर फीज असलेले क्लासेस, ॲक्टिव्हिटीजमध्ये जाता येतंय. त्यांच्यासाठी पालक फॉरेन टूर्स करताहेत, चांगल्या ठिकाणी हाॅटेलिंग, शाॅपिंग करताहेत हे पाहून आपल्या मुलांसाठी आपण हे करू शकत नाही, यातून काही पालकांना अपराधीपणाची भावना मनाला दुःखी करत राहते. हे जे काही वाटतं ते मुळात खरं नाही. यातून येणारं गिल्ट पूर्णपणे बाहेर पडायला हवं. आपलं मूल अभ्यासात यथातथाच असेल, तर ते मान्य करून, त्याच्यातील बलस्थाने शोधून ती विकसित करायला त्याला संधी उपलब्ध करून देणं हे करता येतं पण माझं मूल अभ्यासात मागे पडतेय, या विचारातून अपराधी वाटून घेणं हे बरोबर नाहीच. कारण प्रयत्न करण्यात तुम्ही कमी पडत नसता. मुलाची क्षमता पुरेशी नसते. त्याचा परफाॅरर्मन्स सुधारण्यासाठी मदत करणं ही आपली भूमिका असायला हवी. अपराध वाटावा अशी असू नये. असं गिल्ट वाटणं यात वेगळं काही नाही. हे बहुतेक सगळ्यांनाच वाटतं. पण ही भावना नेमकी कुठून येतेय, त्याचाही शोध घ्या. ती इतर कुठल्या दुसऱ्या गोष्टीतून तर येत नाही ना हे पाहा. एखाद्या वेळेस परिस्थितीवर आपलं नियंत्रण असू शकणार नाही, अशा वेळी ती मान्य करा. कारण यात शक्ती वाया जाते. जरा स्वतःशी प्रेमाने वागा, आनंदी रहा. कारण तुम्ही आनंदी तर मुलंही आनंदी होतील. जेव्हा तुम्ही कुटुंबातील लोकांशी, मित्र मैत्रिणींशी या भावनेविषयी बोलाल, तर तुम्हाला कळेल की बरेचजण यातून जात आहेत. जर मार्ग निघत नसेल, तर प्रोफेशनल मदत जरूर घ्या.

मी स्वतःसाठी या आठवड्यात काय केलं हे चक्क लिहून काढा. तुम्हाला लक्षात येईल की, तुम्ही मुलांसाठी जे करायचं ठरवलं होतं त्यापेक्षा अधिक केलंय. पाॅझिटिव्ह गोष्टींवर फोकस करा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -