Thursday, May 2, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनसर्जनशीलतेचे दर्शन घडवणारी उद्योजिका

सर्जनशीलतेचे दर्शन घडवणारी उद्योजिका

दी लेडी बॉस – अर्चना सोंडे

काही मुली या मुळातच धडपड करणाऱ्या असतात. जे काही करेन त्यावर स्वत:चा ठसा उमटवेन अशी त्यांची वृत्ती असते. वाट्टेल ते कष्ट घेण्याची तयारी असेल आणि सोबतीला स्मार्टनेस असेल तर अशी कोणतीही मुलगी ‘लेडी बॉस’ बनते. ती सुद्धा अशीच धडपड करणारी. स्वत:चं अस्तित्व घडवू पाहणारी, स्वत:सोबतच आपल्यासोबत असणाऱ्या प्रत्येकाच्या उत्कर्षासाठी झटणारी. सर्जनशीलतेच्या जगात तिने स्वत:ची वेगळी वाट निवडली. ही गोष्ट आहे दर्शना म्हात्रे यांची.

सर्जनशीलतेच्या क्षेत्रात वावरणारी अवलिया म्हणजे दर्शना योगेश म्हात्रे, पूर्वाश्रमीची दर्शना धनवडे. देवजी मीडिया अ‍ॅण्ड कम्युनिकेशन्सची संचालिका. तिचे बाबा दीपक धनवडे उत्तम वादक आहेत. वाद्यवृंद समूहाला ते साथ देतात. ज्योती धनवडे आणि दीपक धनवडे या दाम्पत्यांची दर्शना एकुलती एक कन्या. मात्र मुलाप्रमाणे तिला त्यांनी वाढविले. शालेय शिक्षण सेंट जोसेफ विद्यालयातून झाल्यावर एका संस्थेतून तिने अ‍ॅनिमेशन आणि ग्राफिक्सचा तीन वर्षांचा डिप्लोमा केला. यानंतर एका जाहिरात कंपनीत तब्बल आठ वर्षे तिने नोकरी केली.

सर्जनशीलता मुळात असल्याने विविध कलाप्रकार दर्शनाने हाताळले. त्यातला दिग्दर्शन हा तिचा आवडता कलाप्रकार. अनेक लघुपटांचे दिग्दर्शन तिने केले. ‘फ्लेम इन दी डार्क’ या लघुपटाला एम अ‍ॅव्हेन्युज ऑफ इंटरनॅशनल मीडिया हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला. कवी चंद्रहास रहाटे यांच्या स्वरचित कवितेवरील ’समबडी कुणीतरी प्रेम करावं’ या गाण्याला ‘बेस्ट पिक्चरायझेशन’ हा नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा पुरस्कार मिळाला.

दर्शनाच्या आईचे वडील देवजी गणपत मालगुंडकर त्या काळातील एक प्रथिथयश उद्योजक होते. कास्टिंगचा त्यांचा व्यवसाय होता. आपल्या आजोबांना उद्योगातला आदर्श मानून दर्शनाने त्यांच्याच नावाने देवजी मीडिया अ‍ॅण्ड कम्युनिकेशन ही संस्था सुरू केली. डिजिटल मार्केटिंग, व्हीडिओ, व्हीएफएक, ग्राफिक डिझायनिंग, वेबसाईट डेव्हलपिंग सारख्या सेवा ‘देवजी’ देते. होम डेकोरेशन, रिअल इस्टेट, फूड इंडस्ट्री, सौंदर्यप्रसाधने क्षेत्रातील अनेक संस्थांना देवजी उत्तम सेवा देत आहे.

‘देवजी’ उभी करण्यासाठी दर्शनाला तिचे बाबा दीपक, आई ज्योती आणि स्वत: उद्योजक असलेला पती योगेश त्र्यंबक म्हात्रे यांनी भरघोस पाठिंबा दिला. याच पाठिंब्याच्या जोरावर दर्शनाची ‘देवजी’ भरधाव वेगाने दौडत आहे. नवीन काळातील उत्तम जाहिरात संस्था म्हणून अमृता देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते दर्शनाला ‘मेड इन इंडिया आयकॉन’ पुरस्कार मिळाला आहे.

‘वेज फ्लाय हाय’ wayz fly high हा एक महिला उद्योजक गट आहे. दर्शना या गटासोबत ग्रोथ पार्टनर म्हणून मार्गदर्शन करते. या संस्थेच्या अंतर्गत महिला उद्योजकांना मदत केली जाते. संस्थेने पॉडकास्ट मालिका सुरू केली आहे.
उद्योगाला जर अध्यात्माची जोड असेल तर अशा व्यवसायात पारदर्शकता नक्कीच असते. तिला भगवदगीतेत सांगितलेले श्रीकृष्णाचे तत्त्वज्ञान हे जवळचे वाटले. प्रापंचिक आयुष्यातील सर्व प्रश्नांची भगवदगीतेत आहे अशी जाणीव झाल्यावर ती इस्कॉनसोबत जोडली गेली. २०१७ पासून इस्कॉनमध्ये दर्शनाचा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला. उद्योग व्यवसाय करत असताना दर्शना तिच्या भौतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करते.

आपल्या आयुष्यात अनेक चांगल्या व्यक्ती भेटल्यानेच आपण आतापर्यंतचा प्रवास करू शकलो असे दर्शनाचे ठाम मत आहे. आपले आई-बाबा, कुटुंब, पती योगेश म्हात्रे, गायत्री म्हात्रे, नीलिमा राऊळ, अर्चना नेवरेकर, सुप्रिया पठारे, संगीता नेवरेकर, सावंत असोसिएटचे संचालक निलेश सावंत, पूनम इंगळे, प्रमोद सावंत आणि अर्चना, अनिकेत रंजेंद्र कदम यांच्याप्रति ती कृतज्ञता व्यक्त करते.

अपार मेहनत, कल्पकता, स्नेहबंध, चिकाटी हे गुण असणारी दर्शना म्हात्रे सर्जनशीलतेच्या क्षेत्रातील लेडी बॉस ठरते.

theladybosspower@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -