Saturday, April 27, 2024
Homeअध्यात्मएक अनोखी प्रथा..., पायाला घुंगरू बांधुन नाचल्याशिवाय होत नाही मान्य

एक अनोखी प्रथा…, पायाला घुंगरू बांधुन नाचल्याशिवाय होत नाही मान्य

खोपटे गावातील प्रसिद्ध ‘गौरा’ उत्सवाला ८२ वर्षांची परंपरा

उरण तालुक्यातील खोपटे, पाटीलपाडा येथिल शिवकृपा गौरा मंडळाने एक अनोखी प्रथा जपली आहे. गेल्या ८२ वर्षापासून येथे दरवर्षी नियमितपणे गौरा उत्सव साजरा केला जात असून गौरीच्या दिवशी येथे शंकराची प्रतिष्ठापना केली जाते. तालुक्यातील सगळ्यात जूने हे गौरामंडळ असून या शिवगौऱ्यांच्या दर्शनासाठी उरण, पनवेल, पेण आणि अलिबाग तालुक्यातील लोक येतात. सगळीकडे गणेश चतूर्थीची धामधुम सुरू असताना खोपटा ग्रामस्थ हे शंकरांची प्रतिष्ठापना करतात. भाद्रपद शुद्ध अष्टमीला शंकराची प्रतिष्ठापना करून भाद्रपद शुद्ध द्वादशीला या गौऱ्याचे विसर्जन केले जाते. संपूर्ण खोपटे ग्रामस्थांबरोबरच तालुक्यातील सगळ्या गावातील लोक या उत्सवात मोठ्या श्रद्धेने भाग घेतात.

१९४१ साली खोपटे पाटीलपाडा येथिल रामजी तुकाराम पाटील, रघुनाथ पोशा पाटील, विश्वनाथ नामा पाटील, जनार्दन गोविंद पाटील, रामभाउ बाळाराम भगत,दादु सावळाराम पाटील, जगन्नाथ हसूराम पाटील अशा वीसजणांनी खोपटे पाटीलपाडा ग्रामस्थांच्या सहकार्याने या मंडळाची स्थापना केली. पूर्वी एका जुन्या घरात या शिवगौऱ्याची स्थापना करत असत कालांतराने त्या घरमालकाने हे घर या शिवकृपा गौरा मंडळासाठी दिले. त्यानंतर दहा वर्षापूर्वी येथे परेशशेठ देडीया यांच्या अर्थिक मदतीतून आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने येथे अंत्यंत देखणे असे शिवमंदिर उभारण्यात आले आहे. तेव्हापासून या मंदिरातच शिवगौऱ्याची प्रतिष्ठापना केली जाते.

दरवर्षी गणेशाच्या स्थापनेनंतर येथील शिवमंदिरात गौऱ्याची स्थापनेबरोबरच ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक कथाप्रसंगाद्वारे संदेश देणारी शाडूच्या मातीतील सुबक चित्रे आणि आकर्षक देखावे असतात. दररोज रात्री उशिरापर्यंत विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पहिल्या दिवशी महिलांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जात नाही. या मंडळातर्फे सतत पाच दिवस सांस्कृतीक कार्यक्रम, भजन किर्तन, गोंधळ, महिलांचे तसेच पुरूषांचे पारंपारिक नाच यासारखे कार्यक्रम सतत असतात.

गौरीपूजनाच्या दिवशी करतात शिवाची पूजा 
गेल्या ८२ वर्षापासून येथे पायाला घुंगरू बांधुन नाच झाल्याशिवाय या उत्सवाची सांगता होत नाही. नवसाला पावणारा अशी या गौऱ्याची ख्याती आहे. पर्यावरणाला हानी पोहचणार नाही याची दक्षता देखील घेतली जाते. ८२ वर्षापासून, याठिकाणी बनविण्यात येणारे देखावे आणि शंकराची मुर्ती फक्त शाडूच्या मातीपासूनच बनविलेली असते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -