Thursday, August 27, 2026

Pune Crime : ‘बापाच्या प्रॉपर्टीत हिस्सा माग’चा तगादा; वाकडमध्ये ३२ वर्षीय विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

Pune Crime : ‘बापाच्या प्रॉपर्टीत हिस्सा माग’चा तगादा; वाकडमध्ये ३२ वर्षीय विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : वाकड परिसरात ३२ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिल्पा सचिन गवारे असे मृत विवाहितेचे नाव आहे. सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पा यांचा विवाह वाकड परिसरातील गवारे कुटुंबात झाला होता. लग्नानंतर काही काळातच सासरच्या मंडळींकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. “तुझ्या बापाच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागून घे”, असा तगादा पती आणि सासरच्या मंडळींकडून लावला जात असल्याचे तिच्या भावाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

माहेरून संपत्ती आणण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात होता, तसेच या कारणावरून तिला मारहाण आणि शिवीगाळ केली जात असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या कथित छळाला कंटाळून शिल्पाने टोकाचे पाऊल उचलल्याचे तिच्या माहेरच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर शिल्पाच्या भावाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिचा पती सचिन गवारे, सासरे आणि दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हुंड्यासाठी छळ आणि विवाहितेच्या मृत्यूशी संबंधित कायदेशीर कलमांनुसार पुढील कारवाई केली जात आहे.

रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्याने शिल्पाच्या माहेरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भावाने बहिणीला राखी बांधण्याची तयारी केली असताना तिच्या मृत्यूची बातमी समोर आल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. दरम्यान, सासरच्या मंडळींवरील आरोप सध्या पोलिस तपासाधीन आहेत. या प्रकरणामागील नेमकी परिस्थिती, छळाचे आरोप आणि आत्महत्येची कारणे याबाबत वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >