Nashik : नाशिकच्या दिंडोरी जकात नाका परिसरात आदिवासी कुटुंबाच्या ताब्यातील जमिनीवरील शेड हटवून जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी नाशिक महापालिकेच्या तीन अधिकाऱ्यांसह एकूण सात जणांविरोधात म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अर्थात ॲट्रॉसिटी कायदा तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील संबंधित कलमांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. (Nashik News)
मनपा अधिकाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा
या प्रकरणात नाशिक महापालिकेचे (Nashik Municipal Corporation) विभागीय अधिकारी राहुल जाधव, लिपिक जाधव आणि कर्मचारी मोरे यांच्यावर अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण पथकाला केवळ सार्वजनिक रस्ते किंवा महापालिकेच्या मालकीच्या जागेवरील बेकायदेशीर बांधकाम हटविण्याचा अधिकार असताना, संबंधित अधिकाऱ्यांनी खासगी जागेवरील शेड हटवून त्यानंतर ती जागा व्यापाऱ्यांच्या ताब्यात दिल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. (Nashik News)
Nashik Crime News : नाशिकच्या पंचवटी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 32 वर्षीय तरुणाने पत्नी आणि वडिलांना मोबाईलवर 'सॉरी' असा मेसेज पाठवून गोदावरी नदी ...
जागेवर अतिक्रमण करून ताबा मिळवण्याचा प्रयत्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसरूळ परिसरातील ५३ वर्षीय बाजीराव दत्तू धोंगडे यांच्या कब्जातील जमिनीवरून १९९३ पासून व्यापारी प्रवीणचंद वालचंद शहा आणि इतरांशी वाद सुरू आहे. या जमिनीच्या हक्काबाबत अप्पर तहसील कार्यालयात आदिवासी प्रकरण क्रमांक १३/२०२५ प्रलंबित असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, २० ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास प्रवीणचंद शहा, तेजस शहा, सुरेखाबेन शहा, त्यांचे कुलमुखत्यारधारक मनोजकुमार गवई यांच्यासह सुमारे ७० ते ८० जण संबंधित जमिनीवर आले. त्यांनी जागेवर अतिक्रमण करून ताबा मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. (Nashik News)
कुटुंबीयांना जातिवाचक शिवीगाळ अन् धमकी
या वेळी तक्रारदार बाजीराव धोंगडे आणि त्यांच्या कुटुंबीयांना जातिवाचक शिवीगाळ करण्यात आली. तसेच धक्काबुक्की करून धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. तक्रारीतील आणखी एका गंभीर आरोपानुसार, महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने संबंधित जमिनीवरील शेड हटविले. मात्र, कारवाई केवळ अतिक्रमण हटविण्यापुरती मर्यादित न राहता शेड असलेली जागा आणि त्याव्यतिरिक्त अतिरिक्त जागेचाही ताबा व्यापारी शहा आणि त्यांच्या मुखत्यारधारकाला देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जमिनीच्या मालकीहक्काचा निर्णय घेण्याचा किंवा खासगी जमिनीचा ताबा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सोपविण्याचा अधिकार नसतानाही ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत आहे. (Nashik News)
Nashik : भाऊ-बहिणीच्या निर्मळ प्रेमाला दैवी भ्रातृभावाची व्यापक जोड देणारा स्वाध्याय परिवाराचा विशेष ‘रक्षाबंधन उत्सव’ शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी ...
म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल
प्राथमिक नियमांची माहिती असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांशी संगनमत करून जमिनीची सनद अथवा ताबा सोपविल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणातील जमिनीचा मूळ मालकीहक्क नेमका कोणाचा आहे, तसेच महापालिकेने केलेली कारवाई कोणत्या अधिकाराच्या आधारे करण्यात आली, हे अद्याप चौकशीचा विषय आहे. जमिनीबाबतचे हक्क आणि प्रशासकीय कारवाईचे वैधत्व संबंधित महसूल चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होणार आहे. बाजीराव धोंगडे यांच्या तक्रारीवरून म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून महिला पोलिस उपनिरीक्षक मयुरी तुरे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, महापालिका (Nashik Municipal Corporation) अधिकाऱ्यांवरच अधिकाराचा गैरवापर आणि आदिवासी कुटुंबाच्या जमिनीच्या ताब्याशी संबंधित गंभीर आरोप झाल्याने या प्रकरणाकडे आता प्रशासन आणि पोलिसांच्या तपासाच्या दृष्टीने लक्ष लागले आहे.






