मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षा पेपरफुटी पेपरफुटीप्रकरणात भाजप आणि शरद पवार गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. शरद पवार गटाने या प्रकरणात भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांचे नाव घेतले असून, त्यांच्या निकटवर्तीयाचा यात हात असल्याचा आरोप केला आहे. तर शरद पवार गटाच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजपने सुनील गाढवे या कथित संशयीताचे शरद पवार आणि रोहित पवारांसोबतचे फोटो समोर आणले आहेत.
दरम्यान, या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसून आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप पूर्णपणे निराधार व राजकीय हेतूने प्रेरित आहेत, असे स्पष्टीकरण भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी दिले आहे. या प्रकरणावरून काही असंतुष्ट व्यक्ती आणि विरोधकांकडून जाणीवपूर्वक बदनामीकारक मोहीम राबवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (MPSC Paper Leak)
औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात सुनील गाढवे या व्यक्तीसोबतच्या संबंधावरून आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर टीका करण्यात येत होती. यावर स्पष्टीकरण देताना पवार म्हणाले की, सुनील गाढवे हा ना माझा वैयक्तिक सहाय्यक (पीए) आहे ना माझा नातेवाईक. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काम करताना अनेक विद्यार्थी व विद्यार्थी प्रतिनिधी आपल्या संपर्कात येतात आणि त्याच माध्यमातून गाढवे विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन संपर्कात आला होता. तो विरोधी पक्षातील इतर नेते आणि लोकप्रतिनिधींच्याही संपर्कात असून त्याचे तसे फोटो समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. त्यामुळे केवळ ओळखीच्या किंवा संपर्काच्या आधारावर कोणालाही या प्रकरणाशी जोडणे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
- गणेश भक्तांच्या सेवेसाठी गेल्या १४ वर्षांपासून उपक्रम; दादर रेल्वे स्थानकातून रेल्वे होणार मार्गस्थ मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात कोकणवासीयांना ...
मोघम आरोप करण्यापेक्षा पुराव्यासह बोलावे, असे आव्हान देत अभिमन्यू पवार म्हणाले की, सुनील गाढवे किंवा त्याच्या पत्नीचा या पेपरफुटी प्रकरणाशी प्रत्यक्ष संबंध असल्यास त्याचे ठोस पुरावे सार्वजनिक करावेत, जेणेकरून तपास यंत्रणेला योग्य दिशेने तपास करता येईल आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई होईल. या प्रकरणात तपास यंत्रणेमार्फत कारवाई सुरू असून आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, मूळ प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी काही जण विनाकारण राजकारण करत आहेत. (MPSC Paper Leak)
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी काम करताना हजारो विद्यार्थी आपल्या संपर्कात आले असून त्यातील अनेकजण आज विविध पदांवर कार्यरत आहेत. राजकीय व्यक्तींसोबत फोटो असलेल्या प्रत्येकाच्या चारित्र्यावर किंवा निवडीवर शंका घेणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांसाठी काम करणे म्हणजे त्यांच्या प्रत्येक कृतीची जबाबदारी घेणे नव्हे. विद्यार्थ्यांमधील आपली सकारात्मक प्रतिमा विरोधकांना खटकत असल्यामुळेच अशा निराधार अफवा पसरवल्या जात आहेत, असा पुनरुच्चार करत आमदार पवार यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.





