Thursday, August 27, 2026

Chandrashekhar Bawankule : अमरावतीतील सर्व मोठ्या आस्थापनांचे फायर ऑडिट होणार; महिनाभरात प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश

Chandrashekhar Bawankule : अमरावतीतील सर्व मोठ्या आस्थापनांचे फायर ऑडिट होणार; महिनाभरात प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश

मुंबई : अमरावती जिल्ह्यातील सर्व मोठ्या आस्थापनांमध्ये अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण (Fire Audit) आणि आग प्रतिबंधक सराव (Fire Drill) महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले आहेत. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरीन) नवजात बालकांच्या मृत्यूच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आले आहेत.

२४ ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास डफरीन रुग्णालयात ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री बावनकुळे यांनी सकाळी चार वाजल्यापासून संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून आवश्यक निर्देश दिले. (Chandrashekhar Bawankule)

मृत नवजात बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने ३६ नवजात बालकांना इतर रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले. त्यापैकी २९ बालकांवर अमरावतीतील विविध रुग्णालयांमध्ये मोफत उपचार सुरू आहेत. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ११, डॉ. मुरके रुग्णालयातील ८, होप रुग्णालयातील ८ आणि पारिजात रुग्णालयातील २ बालकांचा समावेश आहे. उर्वरित सात नवजात बालके त्यांच्या मातांसोबत डफरीन रुग्णालयात वैद्यकीय देखरेखीखाली सुरक्षित आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आरोग्यमंत्री आणि आरोग्य सचिवांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर आरोग्य आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला घटनेचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल सात दिवसांत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Chandrashekhar Bawankule)

“डफरीन प्रकरणात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही,” असा इशारा पालकमंत्री बावनकुळे यांनी दिला आहे. जिल्ह्यातील मोठ्या आस्थापनांमध्ये फायर ऑडिट आणि फायर ड्रिल वेळेत पूर्ण करून अग्निसुरक्षेतील त्रुटी तातडीने दूर करण्यावर प्रशासनाने भर द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >