Saturday, August 15, 2026

DJ Lavani Restrictions : 'डीजे'च्या तालावर होणाऱ्या अश्लील लावण्यांवर निर्बंध

DJ Lavani Restrictions : 'डीजे'च्या तालावर होणाऱ्या अश्लील लावण्यांवर निर्बंध

- राज्य सरकारचा निर्णय; 'रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळा'चे प्रमाणपत्र बंधनकारक

मुंबई : महाराष्ट्राची समृद्ध लोककला असलेल्या लावणीच्या नावाने सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वाढणारी अश्लीलता आणि 'डीजे'च्या तालावर होणाऱ्या सर्रास नियमभंगाला चाप लावण्यासाठी राज्य शासनाने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. यापुढे 'डीजे' लावणीसह कोणत्याही सार्वजनिक मनोरंजनात्मक कार्यक्रमाला परवानगी देण्यापूर्वी त्या कार्यक्रमाकडे 'रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळा'चे (सेन्सॉर बोर्ड) योग्यता प्रमाणपत्र आहे की नाही, याची खातरजमा करणे राज्यातील संपूर्ण पोलीस प्रशासनाला बंधनकारक करण्यात आले आहे. रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सचिव सं. पुं. खामकर यांनी यासंदर्भातील परिपत्रक राज्यातील सर्व पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना जारी केले आहेत. (DJ Lavani Restrictions)

राज्यात गेल्या काही काळापासून पारंपरिक वाद्यांच्या तालावर रंगणाऱ्या अस्सल लावणीऐवजी अश्लील डीजे लावणीचे कार्यक्रम आयोजित करण्याचे पेव फुटले आहे. अनेक व्यावसायिक संस्था आणि आयोजक रंगभूमी मंडळाचे कोणतेही प्रमाणपत्र न घेताच अशा कार्यक्रमांचे जाहीर प्रयोग सादर करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर काही ठिकाणी मंडळाने मंजूर केलेल्या मूळ संहितेचा (स्क्रिप्ट) दुरुपयोग करून मंचावर उघडपणे अश्लीलता पसरवली जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी या प्रकाराबाबत सांस्कृतिक कार्य विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत सांस्कृतिक कार्य विभागाने दिलेल्या सूचनेनुसार रंगभूमी मंडळाने ही नवी कार्यपद्धती राज्यभरात लागू केली आहे. (DJ Lavani Restrictions)

मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३३ नुसार स्थापन झालेल्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या नियमांनुसार, सार्वजनिक ठिकाणी सादर होणाऱ्या सर्व प्रकारच्या मनोरंजनात्मक प्रयोगांचे पूर्वपरीक्षण करून प्रमाणपत्र घेणे कायद्यानुसार आवश्यक आहे. यामध्ये व्यावसायिक व प्रायोगिक नाटके, एकांकिका, दोन किंवा तीन अंकी लोकनाट्य, तमाशा, वग, मेळे, संगीतबारी मराठी गीते, लावणी कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण सोहळ्यांमधील मनोरंजनात्मक सादरीकरणाचा समावेश होतो. या सर्व कार्यक्रमांना आता सेन्सॉर बोर्डाच्या मान्यतेची मोहोर उठवणे अनिवार्य असणार आहे. (DJ Lavani Restrictions)

स्थानिक पोलीस ठाण्यांवर जबाबदारी :

- शासनाच्या या निर्णयानुसार स्थानिक पोलीस ठाण्यांना विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. पोलिसांनी कोणत्याही सार्वजनिक मनोरंजनाच्या कार्यक्रमाला परवानगी देण्यापूर्वी आयोजकांकडे रंगभूमी मंडळाने दिलेले योग्यता प्रमाणपत्र आहे की नाही, याची पडताळणी करावी लागणार आहे. तसेच लावणीसारख्या पारंपरिक कलाप्रकारात डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचाच वापर केला जाईल, यावर पोलिसांना देखरेख ठेवावी लागेल. - आयोजकांनी सेन्सॉर बोर्डाने मंजूर केलेल्या संहितेव्यतिरिक्त कोणताही अश्लील भाग सादर केल्यास किंवा त्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास, संबंधित आयोजकांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारवाईच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी मंजूर संहितेची अधिकृत कागदपत्रे रंगभूमी मंडळाकडून पोलिसांना उपलब्ध करून दिली जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. (DJ Lavani Restrictions)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >