Saturday, August 15, 2026

Devendra Fadnavis : राज्याची पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, नदीजोड प्रकल्प वेगाने राबवणार; स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांनी केले आश्वस्त

Devendra Fadnavis : राज्याची पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, नदीजोड प्रकल्प वेगाने राबवणार; स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांनी केले आश्वस्त

मुंबई : महाराष्ट्राच्या मागील आणि सध्याच्या पिढीने मोठ्या प्रमाणावर दुष्काळाचा सामना केला आहे; मात्र येणाऱ्या पिढीला दुष्काळ पाहावा लागू नये, यासाठी नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांत पाणी पोहोचवून राज्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केले. देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयात आयोजित मुख्य ध्वजारोहण सोहळ्यानंतर त्यांनी राज्यातील आणि देशातील जनतेला संबोधित करताना हा निर्धार व्यक्त केला.

विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्र हे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असून छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातील मूल्यांना अनुसरून राज्य सातत्याने प्रगती करत असल्याचे त्यांनी सांगितले. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत महाराष्ट्राचा आर्थिक विकासदर जवळपास ८.८ टक्के राहिला असून, राज्यातील १३ जिल्ह्यांनी आपापली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण केली आहेत. गडचिरोली, पालघर आणि नंदुरबारसारख्या दुर्गम भागांपर्यंत विकास शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक जिल्हा 'ग्रोथ इंजिन' बनवण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटी रुपयांचे आर्थिक कवच दिले जात आहे. याशिवाय, सध्या ७६ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून दिली जात असून, येत्या वर्षभरात राज्यातील १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा संकल्प पूर्ण केला जाईल. महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत दर्जा देणारा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र हे देशाचे ‘स्टार्टअप कॅपिटल’

महाराष्ट्र हे देशाचे ‘स्टार्टअप कॅपिटल’ बनले असून सर्वाधिक परकीय गुंतवणूक आणि औद्योगिक गुंतवणूक राज्यात येत आहे. या माध्यमातून युवाशक्तीसाठी रोजगाराच्या विपुल संधी निर्माण केल्या जात आहेत. तसेच तरुणांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी ‘एज्युसिटी’च्या माध्यमातून परदेशी विद्यापीठांना राज्यात निमंत्रित केले जात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यापर्यंत केलेली वाटचाल विलक्षण असून, २५ कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्यात भारताला यश आले असल्याचे सांगत त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >