Saturday, August 15, 2026

Central Railway Headquarters : मध्य रेल्वे मुख्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न; १५ डब्यांच्या २२ नव्या लोकल सेवांची घोषणा

Central Railway Headquarters : मध्य रेल्वे मुख्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न; १५ डब्यांच्या २२ नव्या लोकल सेवांची घोषणा

मुंबई: मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. राजीव श्रीवास्तव यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील मध्य रेल्वे मुख्यालयात ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. याप्रसंगी आरपीएफ (RPF) पथकाच्या संचलनाची पाहणी करून त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. राष्ट्राच्या प्रगतीत भारतीय रेल्वेचे योगदान मोलाचे असून आव्हानात्मक परिस्थितीतही अहोरात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रेल्वे व्यवस्था सुरक्षित व सुरळीत सुरू असल्याचे कौतुक महाव्यवस्थापकांनी केले. तसेच प्रवाशांची सुरक्षितता हेच मध्य रेल्वेचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, उत्कृष्ट सेवेबद्दल मध्य रेल्वेच्या आरपीएफ झोनल सायबर सेलचे हेड कॉन्स्टेबल श्री. शंकर शिवस्वामी एडले यांना नवी दिल्ली येथे भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते 'राष्ट्रपती पदक' (MSM) प्रदान करण्यात आल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

मुंबईकरांसाठी मोठी खूशखबर:

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महाव्यवस्थापकांनी प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील CSMT–कर्जत आणि खोपोली विभागातील २२ उपनगरीय लोकल सेवा १२ डब्यांवरून १५ डब्यांच्या करण्यात येत आहेत. यामुळे मध्य रेल्वेवरील १५ डब्यांच्या एकूण लोकल फेऱ्यांची संख्या ३२ वरून थेट ५४ होणार आहे. या निर्णयामुळे विशेषतः गर्दीच्या वेळेत प्रवास करणाऱ्या अंबरनाथ, बदलापूर, कर्जत आणि खोपोलीच्या प्रवाशांची क्षमता २५ टक्क्यांनी वाढणार असून मोठा दिलासा मिळणार आहे. यासोबतच ११ मेल व पॅसेंजर गाड्यांना नियमित गाड्यांचा दर्जा देण्यात आला आहे. कार्यक्रमादरम्यान आरपीएफ डॉग स्क्वॉडचे कसरतींचे प्रात्यक्षिके आणि मध्य रेल्वे सांस्कृतिक अकादमीच्या कलाकारांचे कार्यक्रम मुसळधार पावसातही उत्साहात पार पडले. या सोहळ्याला मध्य रेल्वे महिला कल्याण संस्था (CRWWO) अध्यक्षा श्रीमती स्निग्धा श्रीवास्तव, अतिरिक्त महाव्यवस्थापक श्री. प्रतीक गोस्वामी यांच्यासह वरिष्ठ रेल्वे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा मध्य रेल्वेच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपित करण्यात आला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >