- नक्षत्रांचे देणे; डॉ. विजया वाड
ती शाळा आशिया खंडातील प्रसिद्ध शाळा होती. तिचे नाव होते उदयाचल हायस्कूल. गोदरेज, विक्रोळी. तिथे मी २७ वर्षे सातत्याने काम केले. एक शिक्षिका ते मराठी विभागाची प्रमुख, म्हणजे पर्यवेक्षक येथपर्यंत अत्यंत इमानेइतबारे नोकरी केली. इथल्या चाचणी परीक्षा सुद्धा बोर्डाच्या परीक्षप्रमाणे काटेकोर घेतल्या जात. परीक्षेला जास्तीत जास्त २० मिनिटे उशीर मान्य केला जाई. तर एक मुलगा २० ऐवजी २५ मिनिटे उशीर करून परीक्षावर्गात आला. मी निरीक्षक होते.
“बाई, मी येऊ का?” “का रे उशीर करून आलास?” “मी एका मुलीचा हायवेवर जीव वाचवला आहे बाई,” “बरं! आता पेपर लिही.” मी त्याला प्रश्नपत्रिका दिली. हा सर्व प्रकार आमच्या पर्यवेक्षक बाई बघत होत्या. चिठ्ठी आली. “आता पेपर लिहू द्यावा. नंतर विद्यार्थ्यासह डॉ. पंड्या यांच्या ऑफिसमध्ये विद्यार्थांसह, पेपरसह यावे. मला थोडी धाकधूक वाटली; पण मी पेपर संपायची वाट बघत राहिले. त्या मुलास काही बोलले नाही; कारण त्याचा पेपर जाणे महत्त्वाचे वाटले मला! त्याच्या मनावर काही परिणाम होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा होती. वेळ काय हो? जातोच तो! पेपरचा गठ्ठा, परीक्षा खोलीत देऊन मी त्या विद्यार्थ्यासह डॉ. डी. डी. पंड्या या आमच्या मुख्याध्यापकाच्या कचेरीत गेले. त्यांना सारी कहाणी कथन केली. तो विद्यार्थी बोलू लागला. “मोठे सर, मी परीक्षेआधी २५ मिनिटे आधी निघालो होतो.” “बरं मग?” “पण हायवेवर एका मुलीला स्कूटरने उडविले. तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. तिला तसे टाकून परीक्षेसाठी येणे मला अगदी गैर वाटले. “मग काय झाले? इति हेड सर “मग मी तिला रिक्षाने कन्नमवार नगरच्या इस्पितळात घेऊन गेलो. डॉ. दयाळू होते. त्यांनी ताबडतोब रक्तस्त्राव थांबवला. मी त्यांच्या दवाखान्यातून फोन करून तिच्या वडिलांना बोलावून घेतले.” “हे तू छानच केलंस.” इति डॉ. पंड्या. “ते आले लगेच. मला पुन्हा पुन्हा थँक्यू म्हणत राहिले.” “तू योग्य वेळी अति योग्य वागालास मोठे सर म्हणाले. “मग मोठे सर, तिच्या वडिलांनी माझे पुन्हा पुन्हा आभार मानले आणि मी त्यांच्याकडूनच रिक्षाचे पैसे घेऊन, परीक्षा द्यायला आलो.” “हे तू छानच केलेस.” डॉ. पंड्या स्मितहास्य करीत म्हणाले. त्या विद्यार्थ्याची भीती थोडी कमी झाली. नंतर डॉ. पंड्या म्हणाले, “आपली शाळा नुसते पुस्तकी शिक्षण देत नाही.” “होय सर मला ते पुरतं ठाऊक आहे. “काय ठाऊक आहे तुला?” “माझी उदयाचल शाळा मला आई इतकी प्यारी आहे. आपल्या प्रार्थनेचे शब्दच किती सुंदर आहेत सर! प्यारा, हमारा उदयाचल जितना प्यारा उतना प्यारा, माता का आँचल! प्यारा हमारा उदयाचल!” “वाहवा! शाब्बास रे माझ्या मुला!” डॉ. पंड्या खूश झाले. तो मुलगा किंचित लाजला. मग म्हणाला, “मोठे सर, मी बरोबरच वागलो ना हो?” डॉ. पंड्या मुलाकडे बघत म्हणाले, “पुस्तकी विद्येपेक्षा शाळा जीवन विद्या शिकविते याचे, तुझे वागणे, हे उत्तम उदाहरण आहे.” “तरी पण एक प्रश्न मला विचारावासा वाटतो तुला लेकरा.” डॉ पंड्या पुढे म्हणाले. “जर का ही बोर्डाची परीक्षा असती, तर तू काय केले असतंस?” “तरीही मी जे वागलो, त्यात बदल केला नसता.” “म्हणजे रे काय?” “मी एक जीवन वाचवणं याच गोष्टीला महत्त्व दिलं असतं मोठे सर. माझ्या आयुष्यात मला जीव वाचवणं ह्या गोष्टीचं महत्त्व जास्त वाटतं मोठे सर! त्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे? एखादं वर्ष? सहा महिने? छे छ! परीक्षा काय? देता येतात! पण गेला जीव की संपलं जीवन! कसा मी पुढे जाऊ शकलो असतो, तिला तशीच जखमी अवस्थेत टाकून? अशक्य! अशक्य!” आणि तो विद्यार्थी रडू लागला. मोठे सर आपल्या खुर्चीवरून उठले. त्याच्या पाठीवर हात फिरवित म्हणाले, “माणूस म्हणून खूप मोठा हो माझ्या बाळा.” “नमस्कार करतो सर तुम्हाला.” डॉ. पंड्यांनी त्याला जवळ घेत म्हटले, “उद्या आयुष्यात कधीही समोर प्रसंग आला तरी चित्त विचलित होऊ देऊ नकोस. माणूस म्हणून मोठा मोठा हो. आजचे तुझे वर्तन इतके प्रशंसनीय आहे की...” आणि डॉ. पंड्यांनी त्याला उतर पत्रिकेवर ५ असा शेरा दिला.






