Saturday, August 8, 2026

सेल...सेल...सेल... साड्यांचा उत्सव

सेल...सेल...सेल... साड्यांचा उत्सव

- मनस्विनी; पूर्णिमा शिंदे

पावसाळा सुरू झाला की माझा आनंद द्विगुणित होतो. हिरवाईने नटलेली सृष्टी, रिमझिम सरी, गारवा, गरमागरम भजी, वाफाळलेला चहा, पावसाळी सहली, श्रावणातील सण आणि मन प्रसन्न करणारे वातावरण... या सगळ्यांमुळे पावसाळा प्रत्येकालाच आवडतो. पण माझ्यासारख्या अनेक महिलांसाठी पावसाळा आणखी एका कारणाने खास असतो. ते म्हणजे साड्यांचे सेल!

पावसाळा सुरू होताच शहरातील जवळपास सर्वच दुकानांमध्ये साड्यांवर आकर्षक सवलती जाहीर होतात. दहा, वीस, पन्नास टक्के सूट, एकावर एक मोफत, तर कधी साडीसोबत नथ किंवा इतर भेटवस्तू अशा ऑफर्स महिलांना खुणावत असतात. सोशल मीडियावरील जाहिराती, मोबाईलवर येणारे संदेश आणि मोठमोठे बॅनर्स पाहिले की खरेदीची ओढ आणखी वाढते.

दक्षिण मुंबई, लालबाग, परळ, दादर, माटुंगा अशा भागांतील प्रदर्शनांना आणि सेलला जाण्याची उत्सुकता वेगळीच असते. सेल सुरू होण्याची तारीख, मैत्रिणींना फोन, एकत्र जाण्याचे नियोजन आणि दुकानात पोहोचल्यावर तासनतास साड्या पाहणे... ही एक आनंददायी प्रक्रिया असते. साड्या निवडायच्या, पुन्हा त्यातून आणखी सुंदर साड्या निवडायच्या आणि शेवटी समाधानाने खरेदी करायची.

साडी हा केवळ पोशाख नसतो; तो आठवणींचा खजिना असतो. प्रत्येक साडीमागे एखादा सण, समारंभ, वाढदिवस, लग्न, प्रवास किंवा आयुष्यातील एखादा खास क्षण दडलेला असतो. म्हणूनच कपाटातील साड्या पाहताना अनेक आठवणी पुन्हा जिवंत होतात.

समुपदेशक म्हणून काम करताना मला अनेक मानसिक तणावग्रस्त महिलांना भेटण्याची संधी मिळते. काही महिला जीवनाबद्दल निराश झालेल्या असतात. अशा वेळी मी त्यांना एक साधा सल्ला देते - घरी जाऊन कपाट आवरा. आपल्या साड्या, ड्रेस, जुने फोटो अल्बम आणि आठवणी पुन्हा पाहा. या छोट्याशा कृतीमुळे त्यांचे मन भूतकाळातील आनंदी क्षणांशी जोडले जाते. अनेकदा जगण्याची उमेद पुन्हा निर्माण होते. अर्थात, मानसिक आरोग्याच्या गंभीर समस्यांमध्ये तज्ज्ञांचा वैद्यकीय सल्ला आणि उपचार आवश्यकच असतात; पण आनंददायी आठवणी मनाला उभारी देण्याचे काम नक्की करतात.

एकदा मी माझ्या डॉक्टरांना सहज गंमतीने म्हटले होते, “मला जगायचं नाही, पण माझ्यानंतर माझ्या साड्यांचं काय होणार?” ते हसत म्हणाले, “त्यांचा टेम्पो भरून लिलाव करू!” त्या विनोदी उत्तराने मला स्वतःकडे नव्याने पाहायला शिकवले. त्या दिवसानंतर निराशेच्या विचारांपेक्षा जगण्याचा आनंद अधिक महत्त्वाचा वाटू लागला.

जून-जुलैपासून सुरू होणारे साड्यांचे प्रदर्शन श्रावण, रक्षाबंधन, नागपंचमी, मंगळागौर, गोकुळाष्टमी, गौरी-गणपती, नवरात्र, दसरा आणि दिवाळीपर्यंत सुरू असते. सुरुवातीच्या दिवसांत सर्वाधिक आकर्षक संग्रह उपलब्ध असल्याने अनेक महिला पहिल्याच दिवशी सेलला पोहोचण्याचा प्रयत्न करतात. साडी निवडताना केवळ रंग किंवा डिझाइनच महत्त्वाचे नसते. तिचे सूत, पोत, टिकाऊपणा, पदर, किनार आणि विण यालाही तितकेच महत्त्व असते. आज बाजारात कलमकारी, कॉटन, कॉटन सिल्क, चेन्नई सिल्क, उपाडा सिल्क, महेश्वरी, पैठणी, नारायणपेठ, कांजीवरम, धर्मावरम, बनारसी, चंदेरी, पोचमपल्ली, पटोला, बांधणी, जमदानी, जॉर्जेट, खादी सिल्क, हातमाग, पश्मिना, वारली प्रिंट, इरकल, बेळगाव सिल्क, रो सिल्क अशा असंख्य प्रकारच्या साड्या उपलब्ध आहेत. प्रत्येक साडीचे वैशिष्ट्य वेगळे आणि आकर्षणही वेगळे.

सेलमध्ये खरेदी करताना उधळपट्टी करण्याची गरज नसते. योग्य नियोजन करून घेतलेली एखादी सुंदर साडी रक्षाबंधन, वाढदिवस, लग्नसराई किंवा वास्तुशांतीसारख्या प्रसंगी मैत्रिणीला किंवा नातेवाइकाला भेट म्हणून देता येते.

माझ्या परिचयातील सत्तरी ओलांडलेल्या एका ज्येष्ठ महिलेला साड्यांचा विलक्षण शौक आहे. “हा रंग अजून घेतला नाही, अशी किनार नाही, असा पदर नाही,” असे म्हणत त्या आजही उत्साहाने खरेदी करतात. त्यांचा उत्साह पाहिला की वाटते - आयुष्यभर मनातली आवड जपता आली, तर वय हा केवळ आकडा ठरतो.

खरेदीचे व्यसन नसावे; पण आवडीच्या गोष्टीतून मिळणारा आनंद नक्कीच जपावा. साडी विकत घेतली नाही तरी सेलमध्ये जाऊन सुंदर साड्या पाहण्याचा आनंदही काही कमी नसतो. नेत्रसुखही तेवढेच महत्त्वाचे असते.

आज फॅशन बदलत आहे, नवनवे प्रकार बाजारात येत आहेत. तरीही “जुनं ते सोनं” ही म्हण साड्यांच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरते. जुन्या पैठण्या, जरीच्या साड्या किंवा पारंपरिक विणीच्या साड्या आजही तितक्याच उठून दिसतात. अनेक जुन्या साड्यांच्या जरीची किंमतही मोठी असते. त्यामुळे त्या जपून ठेवणे हीसुद्धा एक गुंतवणूकच आहे.

फॅशन कोण ठरवते? आपणच. आपण आत्मविश्वासाने जी साडी नेसतो, तीच फॅशन बनते. म्हणून कपाटातील जुन्या साड्याही पुन्हा बाहेर काढा, त्यांना नवा साज चढवा आणि मनसोक्त आनंद घ्या.कारण पावसाळा म्हणजे फक्त सरींचा नाही, तर साड्यांच्या सेलचा, आठवणींचा आणि आनंदाचा उत्सवही असतो!

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा