Saturday, August 8, 2026

संस्कार समर्पणाचा

संस्कार समर्पणाचा

- जीवनगंध; पूनम राणे

पहाटेचे ४ वाजले होते. सगळीकडे शांतता होती. वाऱ्याची हलकीशी झुळूक मनाला उत्साहित करत होती. गौरव काका शाळेत निघाले होते. ते मराठीचे शिक्षक होते. गौरव काकांच्या इमारतीत भली मोठी बाग होती. खूप वर्षापासून वाढलेले एक भले मोठे नारळाचे झाड होते. दोन-तीन पिंपळ औदुंबराची झाडे सुद्धा एकत्र वाढलेली होती. बाजूलाच जाई-जुई, मोगरा, निशिगंध, झेंडू, सदाफुली, जास्वंद आणि प्राजक्ताचे झाड होते.जाई-जुई, मोगरा, जास्वंद अजूनही झोपेत पेंगत होती. मात्र प्राजक्त केव्हाच उठला होता. झाडाखाली फुलांचा सडा पडला होता. साऱ्या बागेत सुगंध पसरला होता. सूर्य मात्र आपले काम नियमित करत होता. प्राजक्त सोडून बाकीची फुलझाडे सूर्योदयाची वाट पाहत होते. प्राजक्ता मात्र सूर्योदयाची वाट न पाहता सर्वांच्या अगोदर उठून आपले काम पूर्ण करत होता. गौरव काकांना प्रश्न पडला. आपण प्रत्येक जण एकमेकांवर अवलंबून राहतो. मात्र प्राजक्ताचे समर्पण त्याचा नियमितपणा दुसऱ्यावर अवलंबून न राहणे हे या प्राजक्ताकडून नक्कीच शिकले पाहिजे.

झाडावरून ओघळताना, इवलीशी नाजूक फुले किती त्रास सहन करत असतील. तरीही मुकाटपणे परिसर सुगंधित करणे आणि आपले स्वतःचे समर्पण अबाधित ठेवणे हे नक्कीच प्राजक्ताकडून शिकले पाहिजे.

ज्या मातीत आपण वाढलो त्या मातीला सुगंधित करण्याचे काम प्राजक्त करतो. गौरव सर, रेल्वेतून जाताना सतत प्राजक्त आणि त्याचे समर्पण याचाच विचार करत होते. बरोबर ७ वाजता ते शाळेत पोहोचले. मैदानात प्रार्थना झाली. परिपाठाच्या तासाला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची दिवस आज गौरव सरांचा होता. गौरव सरांनी समर्पण हा विषय घेऊन प्राजक्ताचे उदाहरण विद्यार्थ्यांना दिले. शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मन लावून गौरव सरांचे विचार ऐकण्यात दंग झाले होते.

विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला करता येणारी कामे सुद्धा आपण करत नाही. आळस करतो. इतरांवर अवलंबून राहतो. आपण प्रत्येक गोष्टीसाठी कधी ना कधी प्रत्येकाची वाट पाहत असतो. मदतीची अपेक्षा करत असतो. मदत नाही मिळाल्यास रागावतो. समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवतो. आपण प्रत्येक गोष्टीत आपला स्वतःचा स्वार्थ पाहत असतो; परंतु सर्वस्वाचा व त्यागाचा संस्कार आपण प्राजक्ताकडून शिकू या. असे म्हटल्यानंतर साऱ्या मैदानात टाळ्यांचा कडकडाट झाला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा