Tuesday, August 4, 2026

Bihar and Bengal : बिहार-बंगालमध्ये वीज कोसळून ११ मृत्यू , भूस्खलनामुळे बद्रीनाथ महामार्ग ठप्प; मुसळधार पावसाचा अनेक राज्यांना वेढा

Bihar and Bengal : बिहार-बंगालमध्ये वीज कोसळून ११ मृत्यू , भूस्खलनामुळे बद्रीनाथ महामार्ग ठप्प; मुसळधार पावसाचा अनेक राज्यांना वेढा

नवी दिल्ली : अनेक राज्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून वाहतूक, दैनंदिन व्यवहार आणि सार्वजनिक सुरक्षेवर त्याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये सोमवारी वीज पडून ११ जणांचा मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले आहेत. दुसरीकडे, उत्तराखंडमध्ये भूस्खलन, रस्ते खचणे आणि वाहतूक खोळंबल्याच्या घटना घडल्या असून अनेक राज्यांत पावसाचा जोर कायम आहे.

बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका बिहार आणि पश्चिम बंगालला बसला. वीज पडल्याच्या विविध घटनांमध्ये बिहारमध्ये सात तर पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाला. हावडा जिल्ह्यातील जगतबल्लवपूर, आमता आणि बागनान परिसरात वीज पडल्याच्या घटना घडल्या. जगतबल्लवपूर येथे शेतात काम करत असताना दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. आमता येथे तलावाजवळ हात-पाय धुत असताना ३५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. बागनानमधील कटापुकूर गावातही शेतात काम करत असताना एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला.

बद्रीनाथ महामार्गावर भूस्खलन; २०० प्रवासी अडकले

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे बद्रीनाथ महामार्गावर भूस्खलन झाले. डोंगरावरील मोठमोठे दगड आणि माती रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. परिणामी, सुमारे २०० यात्रेकरू आणि प्रवासी सोमवारी रात्रीपासून मार्ग खुला होण्याची प्रतीक्षा करत अडकून पडले आहेत.

उत्तराखंडमध्ये पावसाचा जोर कायम

राज्यातील सर्व जिल्ह्यांत पावसाची नोंद झाली असून हवामान विभागाने बहुतांश भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. देहरादून, टिहरी, नैनीताल आणि बागेश्वर जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. नारायणबगड परिसरात अवघ्या एका तासाच्या मुसळधार पावसामुळे बाजारपेठेत माती व दगडांचा मलबा शिरला. सिमली-आल्मोडा राष्ट्रीय महामार्गही काही ठिकाणी बंद झाला. उत्तरकाशीमध्ये गंगोत्री महामार्गाच्या सुमारे १०० मीटर भागाला मोठ्या भेगा पडल्या असून रस्ता खचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

हरियाणात रस्त्यांचे तलावात रूपांतर

हरियाणातील अंबाला आणि झज्जर जिल्ह्यांत रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असून नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर आग्रा शहरात मध्यरात्रीनंतर सुरू झालेल्या पावसामुळे अनेक भागांत दोन ते तीन फूट पाणी साचले. वाहतुकीची कोंडी निर्माण झाली असून परिस्थिती लक्षात घेता शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बाराबंकी येथे दोन तासांच्या मुसळधार पावसामुळे बसस्थानक जलमय झाले. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला.

मध्य प्रदेशात ६ ऑगस्टपासून पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस मध्य प्रदेशात अतिवृष्टीची शक्यता कमी आहे. मात्र, पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे ६ ऑगस्टपासून राज्यात पुन्हा व्यापक पावसाची शक्यता असून अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडू शकतो. यंदाच्या मान्सून हंगामात राज्यात १६ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. जबलपूर, शहडोल, रीवा आणि सागर विभागांमध्ये सर्वाधिक तूट आढळली आहे. तर छत्तीसगडमध्ये मंगळवारपासून पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि विजांचा इशारा देण्यात आला आहे. तसेच हिमाचल प्रदेशात पुढील सहा दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा सुमारे ९ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

वालदेवीच्या पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

चार दिवसांपासून सुरू असलेल्या अथक शोधमोहीमेला अखेर मंगळवारी यश आले. वालदेवी नदीच्या पुरात वाहून गेलेल्या अभिषेक अनिल जाधव (वय २८) याचा मृतदेह पुलाजवळील बंधाऱ्यालगत झाडाझुडपांमध्ये आढळून आला. एकुलता एक मुलगा गमावल्याने आई शुभांगी जाधव यांचा घटनास्थळी झालेला आक्रोश उपस्थितांच्या काळजाला भिडणारा ठरला. दाढेगावजवळील वालदेवी नदीवरील पुलावरून १ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात अभिषेक जाधव दुचाकीसह वाहून गेला होता. घटनेनंतर अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकांकडून सलग चार दिवस शोधमोहीम राबविण्यात आली; मात्र त्याचा कोणताही मागमूस लागत नव्हता. मंगळवारी सकाळी पुलाजवळील बंधाऱ्याच्या परिसरात काही कुत्रे वारंवार जात असल्याचे दोन महिलांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने त्यांनी तेथे जाऊन पाहणी केली असता झाडाझुडपांमध्ये रेनकोट परिधान केलेल्या अवस्थेत एक मृतदेह दिसून आला. त्यांनी तातडीने ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर संजय सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनीही यासाठी मदत केली. मृतदेहाजवळ सापडलेल्या ओळखपत्राच्या आधारे तो अभिषेक जाधव याचाच असल्याची खात्री करण्यात आली. अभिषेक जाधव हा नाशिक रोड परिसरातील जय भवानी रोड येथे आईसोबत राहत होता. त्याचे वडील यापूर्वीच निधन पावले असून त्याला विवाहित बहीण आहे. अभिषेक एबीपी कंपनीमध्ये कार्यरत होता. कामावरून घरी परतत असताना त्याच्यावर काळाने झडप घातली. एकुलता एक मुलगा गमावल्याने आई शुभांगी जाधव यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >