Tuesday, August 25, 2026

Nashik : कुंभमेळा पर्व काळात त्र्यंबकेश्वर मंदिर सुरूच राहणार, शाहिस्नानानंतर साधू-संतांना दर्शनात अडथळा नाही - कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह

Nashik : कुंभमेळा पर्व काळात त्र्यंबकेश्वर मंदिर सुरूच राहणार, शाहिस्नानानंतर साधू-संतांना दर्शनात अडथळा नाही - कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह

Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्व काळात श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर बंद ठेवण्याचा कोणताही निर्णय झालेला नसून, मंदिर सुरूच राहणार आहे. शाहीस्नानाच्या परंपरेनुसार साधू-संत व आखाड्यांना श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता येणार असल्याचे कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह (Kumbh Mela Commissioner Shekhar Singh) यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.

साधू-संत, आखाडे आणि त्यांच्या धार्मिक परंपरा सिंहस्थ कुंभमेळ्याचा अविभाज्य भाग असल्याने त्यांच्या पारंपरिक धार्मिक विधी व दर्शनावर कोणतेही निर्बंध घालण्यात येणार नाहीत. पत्रकार परिषदेत मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या दर्शन व्यवस्थेबाबत केवळ नियोजनात्मक मुद्दा मांडण्यात आला होता. मंदिर परिसराची क्षमता, उपलब्ध दर्शन व्यवस्था आणि भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता सध्या दररोज सुमारे २० ते २५ हजार भाविकांना दर्शन देणे शक्य असल्याचे विचारात घेण्यात आले आहे.

पर्वणीच्या दिवशी लाखो भाविक येण्याची शक्यता असल्याने गर्दी नियंत्रण व सुरक्षिततेसाठी दर्शन व्यवस्थेबाबत देवस्थान, साधू-संत, आखाडे आणि प्रशासकीय घटकांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. मंदिर बंद ठेवणे किंवा शाहीस्नानानंतर साधू-संत व आखाड्यांना दर्शन नाकारण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा निर्णय प्राधिकरणाच्या स्तरावर झालेला नाही. धार्मिक परंपरांचा सन्मान राखतानाच भाविकांची सुरक्षितता, सुलभ दर्शन, गर्दी व्यवस्थापन, वाहतूक व आपत्कालीन व्यवस्था यांचा समतोल साधून नियोजन करण्यात येत आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय संबंधित धार्मिक व प्रशासकीय घटकांशी चर्चा करून, तसेच मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याशी आवश्यक विचारविनिमय केल्यानंतर घेण्यात येईल.

सिंहस्थ कुंभमेळ्याचे माहात्म्य व पावित्र्य कायम राखत साधू-संत व आखाड्यांच्या धार्मिक परंपरा अखंडित राहाव्यात आणि कोट्यवधी भाविकांसाठी सुरक्षित, स्वच्छ, शिस्तबद्ध व भक्तीपूर्ण वातावरणात सिंहस्थ कुंभमेळा संपन्न व्हावा, यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण प्रयत्नशील आहे. असे नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह (Kumbh Mela Commissioner Shekhar Singh) यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >