Monday, August 24, 2026

National Teacher Award 2026 : उच्च शिक्षण - तंत्रनिकेतन क्षेत्रातील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर, महाराष्ट्रातील तीन प्राध्यापकांचा समावेश

National Teacher Award 2026 : उच्च शिक्षण - तंत्रनिकेतन क्षेत्रातील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर, महाराष्ट्रातील तीन प्राध्यापकांचा समावेश

नवी दिल्ली : देशभरातील उच्च शिक्षण आणि तंत्रनिकेतन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २१ अध्यापक-प्राध्यापकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी (२०२६) निवड करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या या पुरस्कारार्थींच्या यादीत महाराष्ट्रातील तीन प्राध्यापकांचा समावेश आहे. शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. अध्यापनातील गुणवत्ता, नावीन्यपूर्ण उपक्रम, संशोधन तसेच शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत दोन टप्प्यांतील कठोर छाननी प्रक्रियेनंतर या प्राध्यापकांची निवड करण्यात आली आहे. उच्च शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि तंत्रशिक्षण अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राध्यापकांच्या प्राप्त अर्जांच्या छाननीनंतर केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमधील १२, राज्य विद्यापीठे व महाविद्यालयांमधील ५ आणि तंत्रनिकेतन संस्थांमधील ४, अशा एकूण २१ शिक्षक-प्राध्यापकांची या पुरस्कारांसाठी अंतिम निवड करण्यात आली आहे.

  1. डॉ. विक्रम विशाल (आयआयटी, मुंबई) : आयआयटी (मुंबई) मधील पृथ्वी विज्ञान विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. विक्रम विशाल हे ‘कॉम्प्युटेशनल अँड एक्सपेरिमेंटल जिओमेकॅनिक्स’ या संशोधन गटाचे नेतृत्व करतात. जिओमेकॅनिक्स, कार्बन कॅप्चर अँड सिक्वेस्ट्रेशन तसेच अपारंपरिक हायड्रोकार्बन प्रणाली या क्षेत्रांतील त्यांच्या उल्लेखनीय संशोधनाची दखल घेत त्यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
  2. डॉ. अमर ताकसांडे (जेएनएमसी, वर्धा) : दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. अमर मोहनराव ताकसांडे यांना बालरोगशास्त्रातील दीर्घकालीन अध्यापन, संशोधन तसेच वैद्यकीय सेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  3. डॉ. संदीपान नरोटे (शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर) : इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील संशोधन, विशेषतः इमेज प्रोसेसिंग आणि बायोमेट्रिक्समधील योगदानासाठी डॉ. संदीपान प्रल्हाद नरोटे यांची निवड करण्यात आली आहे. शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता सारखे (एआय) आधुनिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचीही दखल घेण्यात आली आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >