Tuesday, August 4, 2026

Sachin Ahir : मुंबईच्या पुनर्विकासाला मिळणार गती? उपसभापती सचिन अहिर यांची अमित शाहांसह केंद्रीय मंत्र्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा

Sachin Ahir : मुंबईच्या पुनर्विकासाला मिळणार गती? उपसभापती सचिन अहिर यांची अमित शाहांसह केंद्रीय मंत्र्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा

नवी दिल्ली : मुंबईतील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जमिनींवरील रखडलेले पुनर्विकास प्रकल्प, रेल्वेच्या मालकीच्या जमिनी, मुंबई पोर्ट ट्रस्ट, सॉल्ट पॅन जमिनींचा विकास आणि शहरातील पायाभूत सुविधांशी संबंधित विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नवी दिल्लीत विविध केंद्रीय मंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा केली. या बैठकीत अनेक प्रलंबित विषयांवर सकारात्मक भूमिका समोर आल्याचे सांगण्यात आले.

विधानपरिषदेचे उपसभापती म्हणून निवड झाल्यानंतर सचिन अहिर (Sachin Ahir) यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा होता. या दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री (Amit Shah) अमित शाह, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल, केंद्रीय बंदरे, नौकानयन व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह तसेच केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची सदिच्छा भेट घेत महाराष्ट्राशी संबंधित विविध विकासकामांवर चर्चा केली.

मुंबईच्या पुनर्विकासासाठी एकसमान धोरणाची मागणी :

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुंबईतील केंद्र सरकारच्या मालकीच्या जमिनींवरील पुनर्विकासासाठी एकसमान धोरणाची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जमिनींसाठी वेगवेगळे नियम लागू असल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. एकाच शहरात पुनर्विकासासाठी वेगवेगळी धोरणे असू नयेत, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. (Sachin Ahir)

मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील रखडलेले प्रकल्प चर्चेत :

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारीतील कुलाबा, बॅलार्ड पिअर आणि परिसरातील झोपडपट्ट्या तसेच मोडकळीस आलेल्या सेस इमारतींचा पुनर्विकास ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळत नसल्याने अनेक वर्षांपासून रखडला आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लवकरच स्वतंत्र उच्चस्तरीय बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी दिली.

रेल्वे सुविधा आणि स्थानकांच्या उन्नतीकरणावर भर :

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावरील सुविधा, तसेच मुंबई उपनगरीय रेल्वेतील महालक्ष्मी, प्रभादेवी आणि परिसरातील रेल्वे स्थानकांच्या उन्नतीकरणाबाबत सकारात्मक चर्चा झाली. या विषयावर लवकरच पुढील बैठक होणार असल्याचेही त्यांनी (Sachin Ahir) सांगितले.

सॉल्ट पॅन जमिनींसाठी लोकहिताचा आग्रह :

सॉल्ट पॅन जमिनींसंदर्भात कोणताही निर्णय घेताना पर्यावरणतज्ज्ञ, स्थानिक नागरिक आणि संबंधित घटकांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे अहिर यांनी स्पष्ट केले. भविष्यात या जमिनी राज्य सरकारकडे हस्तांतरित झाल्यास प्रकल्पग्रस्त, बेघर नागरिक, गिरणी कामगार आणि इतर वंचित घटकांसाठी परवडणारी घरे उभारण्याचा विचार करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी (Sachin Ahir) केली.

लोकसभा अध्यक्षांची सदिच्छा भेट :

संसदीय परंपरेनुसार विधानपरिषदेचे उपसभापती म्हणून निवड झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही सदिच्छा भेट घेण्यात आली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील खासदारांच्या शिष्टमंडळाने या भेटीत विविध विषयांवर चर्चा केली. दिल्ली दौऱ्यादरम्यान केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकाराने आयोजित आरोग्यविषयक कार्यक्रमातही सचिन अहिर (Sachin Ahir) सहभागी झाले. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने यूपीएससी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यालाही त्यांनी उपस्थिती लावली.

या शिष्टमंडळात (Sachin Ahir) उपसभापती सचिन अहिर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, संजय पाटील, ओमराजे निंबाळकर, श्रीरंग बारणे आणि इतर लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >