विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील वम व त्याचे सोबती सहलीवर गेले होते. थकल्याने व जेवण झाल्याने ते महादेवाच्या मंदिरात आराम करत होते.थोड्या वेळाने ते उठले. त्यांनी पुन्हा महादेवाचे दर्शन घेतले व मंदिराची टेकडी उतरू लागले. आरामाने त्यांना आता उत्साह आलाच होता. त्यामुळे पुन्हा त्यांच्या गप्पागोष्टींना ऊत आला.
“आपल्या पृथ्वीला दोन ध्रुव आहेत हे आपणा सर्वांना माहीत आहेच.” शिवमने सहज विचारले. “अर्थात, हे तर आपणा साऱ्यांनाच माहीत आहे. एक उत्तर ध्रुव तर दुसरा दक्षिण ध्रुव,” अमोल म्हणाला. “पण ह्या दोन्ही ध्रुवांवर सतत बर्फ का असते हे कोणाला माहीत आहे का?” शिवमने विचारले. “नाही गड्या. ते तूच सांग,” विशाल म्हणाला. “आपल्या पृथ्वीवर सूर्यकिरण जेथे सरळ पडतात तेथील तापमान जास्त असते, तर सूर्यकिरण जेथे तिरपे पडतात तेथील तापमान कमी असते. पृथ्वीचे दोन्ही ध्रुव हे पृथ्वीच्या दोन टोकांवर असल्याने त्या ध्रुवांवर किरण तिरपे पडतात. तसेच त्यांवर पडणाऱ्या सूर्यकिरणांचा मार्ग हा खूपच लांब असतो. त्यामुळे दोन्ही ध्रुवांवर सूर्यकिरणांची उष्णता अत्यल्प पोहोचते. त्या कारणाने त्यांचे तापमान खूप कमी असते. त्यामुळे तेथे सतत बर्फ पडते. म्हणून दोन्ही ध्रुव सदोदित बर्फाच्छादित असतात. बर्फ पाण्यावर तरंगते हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे,” शिवमने विचारले.हो, आपणास वर्गात ते शिकवले आहेच. बर्फाची घनता कमी असल्याने ते पाण्याहून हलके असते. त्यामुळे ते पाण्यावर तरंगते,” कौशलने सांगितले. “तसेच ह्या दोन्ही ध्रुवीय भागातील समुद्रावरही बर्फ पाण्यावर तरंगते; परंतु बर्फाखाली मात्र नेहमीसारखे पाणी असते. म्हणून त्यात जलचर मस्त जगतात,” शिवम म्हणाला.हिमनदी कशी बनते?” विपुलने प्रश्न केला. “ध्रुव प्रदेशांत सतत बर्फ पडत असते. असे बर्फाचे थरावर थर बनतात व त्याच्या घट्ट लाद्या बनतात. ह्या लाद्यांच्या प्रचंड मोठमोठ्या शिळा बनतात. त्यांचा जो डोंगर तयार होतो, त्यालाच हिमगिरी म्हणजे हिमपर्वत किंवा बर्फाचा डोंगर म्हणतात. ह्या लाद्यांच्या सर्वात खालच्या तळाचे बर्फ त्यावरील बर्फाच्या दाबामुळे वितळते आणि लाद्यांच्या तळाशी पाण्याचा थर तयार होतो. त्या पाण्याच्या थरावरून वरच्या घट्ट लाद्या हळूहळू घसरू लागतात. हिमपर्वतावरून खाली घसरत जाणाऱ्या व उतारावरून वाहणाऱ्या बर्फाच्या मोठमोठ्या लाद्यांना हिमनदी म्हणतात. अशा बर्फाच्या प्रचंड शिळा त्या हिमनदीतून वाहत वाहत समुद्रात येतात. त्यांना हिमराशी किंवा हिमनग म्हणतात. पर्वतांमध्ये हिमनदीच्या उगमाजवळ, डोंगर उतारावर जो खड्डा पडतो त्याला हिमगव्हर म्हणतात. जेव्हा बर्फ वितळते तेव्हा त्यात पाणी साठते व तळे निर्माण होते,” शिवमने सांगितले.“मृत समुद्र म्हणजे कसा असतो शिवम?” कैवल्यने प्रश्न केला.
“ज्या समुद्रात कोणताच सजीव जगू शकत नाही त्याला मृत समुद्र म्हणतात. काही समुद्रात क्षारांचे प्रमाण अनेक पटींनी जास्त असते. मृत समुद्राचे पाणी अति क्षारयुक्त असल्याने ते खूप जड असते. तसेच त्यात मॅग्नेशियम क्लोराइड व इतर काही विषजन्य घटकही मिसळलेले असतात. त्यामुळे ते खूप विषारीही असते. अशा अति क्षारांच्या व विषजन्य घटकांच्या समुद्रात मासे, वनस्पती, जलचर जगत नाहीत. पण काही एकपेशीय सजीवच मात्र त्यात जगू शकतात. इतर सजीव त्यात मरतात. म्हणून त्याला मृत समुद्र म्हणतात. मृत समुद्राची घनता जास्त असल्याने त्यात पोहणे अशक्य असते; परंतु मृत समुद्रात अनेक खनिजे खूप मोठ्या प्रमाणात सापडतात,” शिवमने सांगितले.






