Thursday, July 23, 2026

India at UN : संयुक्त राष्ट्र बैठकीत भारताचा पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा; बलुचिस्तानातील संसाधनांच्या शोषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

India at UN : संयुक्त राष्ट्र बैठकीत भारताचा पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा; बलुचिस्तानातील संसाधनांच्या शोषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

संयुक्त राष्ट्रांच्या (UN) उच्चस्तरीय बैठकीत भारताने नैसर्गिक संसाधनांच्या न्याय्य वापराचा मुद्दा उपस्थित करत बलुचिस्तानमधील परिस्थितीकडे अप्रत्यक्षपणे लक्ष वेधले. स्थानिक समुदायांना त्यांच्या प्रदेशातील नैसर्गिक संपत्तीचा योग्य लाभ मिळणे आवश्यक असल्याचे ठामपणे सांगत भारताने शाश्वत विकासासाठी सामाजिक आणि आर्थिक न्यायाचे महत्त्व अधोरेखित केले. या वक्तव्यानंतर भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मंचावर आमनेसामने आल्याची चर्चा सुरू झाली आहे. (India at UN)

'स्थानिकांचा सहभाग आवश्यक' : 

संयुक्त राष्ट्रांतील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी पी. हरीश यांनी 'Natural Resource Governance' या विषयावरील चर्चेत बोलताना सांगितले की, नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन ही प्रत्येक सार्वभौम राष्ट्राची जबाबदारी आहे. मात्र, त्या संसाधनांचा लाभ स्थानिक नागरिकांपर्यंत पोहोचला नाही, तर विकासाऐवजी असुरक्षितता, अस्थिरता आणि संघर्ष निर्माण होऊ शकतो. त्यांनी असेही नमूद केले की, संसाधनसमृद्ध भागांतील लोकांना निर्णय प्रक्रियेतून दूर ठेवले गेले किंवा त्यांच्या हक्कांकडे दुर्लक्ष झाले, तर त्याचे दीर्घकालीन परिणाम सामाजिक आणि आर्थिक असंतोषाच्या स्वरूपात दिसून येतात. भारताने कोणत्याही देशाचे नाव घेतले नसले, तरी या वक्तव्याचा संदर्भ बलुचिस्तानशी जोडला जात आहे. (India at UN)

बलुचिस्तान का चर्चेत?

बलुचिस्तान हा पाकिस्तानातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रांत असून, येथे नैसर्गिक वायू, सोने, तांबे, कोळसा आणि इतर खनिजसंपत्तीचे मोठे साठे आहेत. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) अंतर्गत विकसित करण्यात आलेले ग्वादर बंदरही याच प्रांतात आहे. स्थानिक संघटना आणि काही नेत्यांचा आरोप आहे की, प्रांतातील नैसर्गिक संपत्तीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असला तरी त्याचा आर्थिक आणि विकासात्मक लाभ स्थानिक नागरिकांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचत नाही. रोजगार, पायाभूत सुविधा आणि मूलभूत सेवांबाबतही हा प्रदेश मागे राहिल्याची टीका सातत्याने होत असते. (India at UN)

पाकिस्तानचे प्रत्युत्तर : 

भारताच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात प्रतिक्रिया देताना भारतावर तथ्यांचे विकृतीकरण केल्याचा आरोप केला. पाकिस्तानने भारताचे दावे फेटाळून लावत आपली भूमिका मांडली आणि भारताने चुकीची माहिती सादर केल्याचा दावा केला. (India at UN)

आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा चर्चा : 

विश्लेषकांच्या मते, भारताच्या वक्तव्यातून दोन महत्त्वाचे संदेश देण्यात आले. नैसर्गिक संसाधनांचा लाभ स्थानिक समाजापर्यंत पोहोचणे हे शाश्वत विकासासाठी आवश्यक असल्याचे भारताने अधोरेखित केले. तसेच, संसाधनसमृद्ध प्रदेशांतील प्रश्नांकडे केवळ सुरक्षेच्या दृष्टिकोनातून न पाहता सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या चौकटीतून पाहण्याची गरज असल्याचेही भारताने सूचित केले.

भारताच्या या भूमिकेमुळे बलुचिस्तानचा मुद्दा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय चर्चेत आला असून, भारत-पाकिस्तानमधील राजनैतिक वादाला नवी धार मिळाल्याची चर्चा सुरू आहे. (India at UN)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >