Thursday, July 23, 2026

Ashadhi Wari Charan Seva : ‘चरणसेवा’ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य; १४ जिल्ह्यांतील ४.९६ लाख वारकऱ्यांना थेट लाभ

Ashadhi Wari Charan Seva : ‘चरणसेवा’ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य; १४ जिल्ह्यांतील ४.९६ लाख वारकऱ्यांना थेट लाभ

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा २४ जुलै रोजी समारोप; १४० मुक्कामस्थळांवर आरोग्यसेवेचे जाळे

मुंबई : आषाढी वारीतील लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या ‘चरणसेवा’ (Charan Seva) या राज्यव्यापी उपक्रमाचा समारोप उद्या म्हणजेच शुक्रवार, २४ जुलै रोजी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला. यंदाच्या वारीत राज्यातील १४ जिल्ह्यांतील तब्बल ४ लाख ९६ हजारांहून अधिक वारकऱ्यांनी चरणसेवा आणि विविध आरोग्यसेवांचा लाभ घेतला. (Ashadhi Wari Charan Seva)

वारकऱ्यांना (Warkari) पायी चालताना होणारा शारीरिक ताण, स्नायूदुखी, पायांना येणारे फोड, थकवा तसेच पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांचा धोका लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. मागील वर्षी सात जिल्ह्यांमध्ये मर्यादित स्वरूपात राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा यंदा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यात आला आणि तो सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक, बुलढाणा, अकोला, जालना, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, सांगली, अमरावती आणि अहिल्यानगर या १४ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आला. (Ashadhi Wari Charan Seva)

या जिल्ह्यांतील १४० मुक्कामस्थळांवर सेवा केंद्रे उभारण्यात आली होती. या केंद्रांमधून वारकऱ्यांना चरणसेवा, मोफत आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी, प्रथमोपचार, आवश्यक औषधांचे वितरण, रुग्णवाहिका सुविधा तसेच गरजेनुसार पुढील उपचारांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली.

या उपक्रमात १६४ आरोग्य संस्थांनी सहभाग घेतला. ७ हजार ५३८ स्वयंसेवक, तर ११ हजार ३३१ डॉक्टर, वैद्यकीय प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आणि आरोग्य कर्मचारी सेवाकार्यात सहभागी झाले. सेवेसाठी १० हजार टी-शर्ट आणि ३ हजार लिटर आयुर्वेदिक औषधी तेलाचा वापर करण्यात आला. तसेच ८ आरोग्य जनजागृती रथांद्वारे वारी मार्गावर व्यापक जनजागृती करण्यात आली. (Ashadhi Wari Charan Seva)

उपचारांबरोबरच स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, संसर्गजन्य आजारांपासून बचाव, रक्तदान, अवयवदान, निरोगी जीवनशैली आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांबाबत वारकऱ्यांना माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे दिंडी मार्गावर अवयवदानाबाबतही मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली.

उपक्रमाबाबत प्रतिक्रिया देताना आयोजकांनी सांगितले की, “राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये ४ लाख ९६ हजारांहून अधिक वारकऱ्यांपर्यंत ‘चरणसेवा’ पोहोचविता आली, याचा आनंद आहे. या उपक्रमाच्या यशामागे लोकसहभाग हीच सर्वात मोठी ताकद ठरली. विविध आरोग्य संस्था, दानशूर व्यक्ती, डॉक्टर, वैद्यकीय प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी आणि हजारो स्वयंसेवकांच्या सहकार्यामुळे हे सेवाकार्य यशस्वी झाले.” (Ashadhi Wari Charan Seva)

आषाढी वारीच्या परंपरेला आधुनिक आरोग्यसेवेची जोड देणारा ‘चरणसेवा’ उपक्रम वारकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरला असून, भविष्यात हा उपक्रम आणखी व्यापक स्वरूपात राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Ashadhi Wari Charan Seva)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा