Wednesday, August 12, 2026

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहकार्य आणि समन्वय वाढवणार आहे. धरण क्षेत्रात मासेमारीसाठी स्थानिक मच्छीमारांना प्राधान्य देता यावे यादृष्टीने जलसंपदा विभाग आणि मत्स्य व्यवसाय विकास विभाग समन्वय राखून काम करणार आहेत. लवकरच दोन्ही विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली संयुक्त समिती आवश्यक त्या सर्वेक्षणाची कामं करणार आहे अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यावेळी मत्स्य व्यवसाय विकास मंत्री नितेश राणे, आमदार प्रकाश सावंत, प्रधान सचिव रामास्वामी एन, सचिव लाभक्षेत्र विकास प्रकाश मिसाळ, मत्स्य व्यवसाय विकास आयुक्त प्रेरणा देशभ्रतार , जलसंपदा आणि मत्स्य व्यवसाय विकास विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी उजनी धरणातील मासेमारी विकासासाठी प्रक्रिया राबवली जात असल्याचे विखे पाटील म्हणाले. त्यांनी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात कोणकोणत्या ठिकाणी धरण क्षेत्रांमध्ये मासेमारी करणे शक्य आहे याचा अंदाज घेण्यासाठी जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभाग संयुक्त सर्वेक्षण करणार असल्याचे सांगितले. यासाठी दोन्ही विभागातील अधिकाऱ्यांची संयुक्त सर्वेक्षण समिती स्थापन करणार असल्याचेही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. यासाठी जलसंपदा विभागाच्या चारही मुख्य अभियंता यांना जबाबदारी देण्यात येत असून गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ यामधील धरणांमध्ये मासेमारीच्या दृष्टीने आवश्यक माहिती एकत्रित केली जाईल, असे ते म्हणाले.

जलसंपदा विभागाशी समन्वय राखण्यासाठी मत्स्य व्यवसाय विकास आयुक्त यांना जबाबदारी देण्यात येत आहे. मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने जवळपास २५०० धरण आणि तलाव यातील मासेमारीसाठी मच्छीमारांच्या सहकारी संस्थांना संधी दिली जाते. विभागाने याबाबत पारदर्शक व आधुनिकता आणण्यासाठी डिजिटायझेशन, मॅपिंग केले आहे आणि रियल टाईम डाटा सर्वेलान्स प्रणाली कार्यरत केली आहे. जलसंपदा विभागाच्या विविध धरणांमध्ये देखील स्थानिक मच्छीमारांना मासेमारीसाठी संधी मिळावी यादृष्टीने विभाग प्रयत्नशील आहे असे मत्स्य व्यवसाय विकास मंत्री नितेश राणे म्हणाले.

जलसंपदा विभागाच्या अंतर्गत धरणांमधील गाळ काढण्यासाठी व जल साठवण क्षमता वाढविण्यासाठी कार्यवाही केली जाते त्यामध्ये मत्स्य व्यवसाय विभागाच्या अखत्यारीत असलेल्या धरणातील व तलावातील गाळ काढण्यासाठी देखील सहकार्य मिळावे असे मंत्री नितेश राणे म्हणाले. यावेळी गोड्या पाण्यातील मासेमारी, सहकारी मच्छीमार संस्था, तलावातील मासेमारीसाठी ठेका पद्धती, दोन्ही विभागांशी संबंधित विविध बाबी, मासेमारीसाठी राबविण्यात येणारी प्रक्रिया आदी विषयाबाबत चर्चा झाली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >