Wednesday, August 12, 2026

Delhi-Pune SpiceJet Flight : दिल्ली - पुणे विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

Delhi-Pune SpiceJet Flight  : दिल्ली - पुणे विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

नवी दिल्ली : दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. विमानात बसल्यानंतर अचानक तापमान वाढल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. काही प्रवाशांना श्वास घेण्यासही अडचण येत असल्याचा दावा करण्यात आला. परिस्थिती गंभीर असतानाही विमान धावपट्टीवर नेण्यात आल्याने प्रवाशांनी उड्डाणाला तीव्र विरोध केला. अखेर प्रवाशांच्या सतर्कतेमुळे विमानातील बिघाड लक्षात आला आणि सर्व प्रवाशांना विमानाबाहेर काढण्यात आले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. (Delhi-Pune SpiceJet Flight)

विमानातील तापमान अचानक वाढले :

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या या विमानात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक प्रवासी होते. विमानात बसल्यानंतर अचानक तापमान वाढल्याने प्रवाशांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागला. काही प्रवासी अक्षरशः घामाने भिजले होते, तर काहींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगण्यात आले. विमानातील परिस्थिती पाहता प्रवाशांनी विमान उड्डाण करू नये, अशी मागणी केली. (Delhi-Pune SpiceJet Flight)

धावपट्टीवर नेताच प्रवाशांचा गोंधळ :

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, समस्या कायम असतानाही विमान धावपट्टीवर नेण्यात आले. त्यामुळे विमानात मोठा गोंधळ निर्माण झाला. काही प्रवाशांनी आरडाओरड करत उड्डाणाला विरोध केला. प्रवाशांनी केलेल्या विरोधानंतर वैमानिक आणि विमान कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगण्यात येते. अखेर प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले. (Delhi-Pune SpiceJet Flight)

विमानतळावर प्रवाशांचे ठिय्या आंदोलन :

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी विमानतळावरच ठिय्या आंदोलन केले. विमान कंपनीच्या सेवेवर प्रश्न उपस्थित करत प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तांत्रिक बिघाड असताना विमान उड्डाणासाठी धावपट्टीवर नेण्यात आले का, प्रवाशांनी सुरुवातीला केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष का करण्यात आले आणि विमानाच्या सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते का, असे प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहेत. (Delhi-Pune SpiceJet Flight)

स्पाइसजेटविरोधात कारवाईची मागणी :

या घटनेची केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने गंभीर दखल घ्यावी आणि स्पाइसजेटविरोधात योग्य ती कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. दरम्यान, या घटनेमागील नेमके तांत्रिक कारण काय होते, विमानाची उड्डाणापूर्वीची तपासणी करण्यात आली होती का आणि प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यास विलंब झाला का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. (Delhi-Pune SpiceJet Flight)

प्रवाशांच्या सतर्कतेमुळे संभाव्य धोका वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळल्याचे या घटनेनंतर बोलले जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >