Wednesday, August 12, 2026

Actor Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांचा SIR वरचा दावा खोटा? निवडणूक आयोगाने दाखवला BLOचा व्हिडिओ; म्हणाले "जुन्या पत्त्यावर..."

Actor Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांचा  SIR वरचा दावा खोटा? निवडणूक आयोगाने दाखवला BLOचा व्हिडिओ; म्हणाले

नवी दिल्ली : अभिनेता प्रकाश राज (Actor Prakash Raj) आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता कर्नाटकमधील Special Intensive Revision (SIR) प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतून नाव हटवल्याच्या त्यांच्या दाव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. प्रकाश राज यांनी दावा केला होता की, बंगळुरू मतदारसंघातील SIR प्रक्रियेत तब्बल ६५ लाख मतदारांची नावे हटवण्यात आली असून, त्यामध्ये त्यांचाही समावेश आहे.

मात्र, प्रकाश राज (Actor Prakash Raj) यांच्या या दाव्यावर बंगळुरूचे अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी जगदीश जी. यांनी स्पष्टीकरण देत त्यांचा दावा तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाने प्रकाश राज राहत असलेल्या जुन्या पत्त्याचा पडताळणी अहवाल आणि बूथ लेव्हल ऑफिसरचा (BLO) व्हिडिओही समोर आणला आहे.

१६ जूनपर्यंत मतदार यादीत नाव सक्रिय : 

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, १६ जून २०२६ रोजी डेटा फ्रीज होईपर्यंत प्रकाश राज यांचे नाव १६३-शांतिनगर विधानसभा मतदारसंघातील पार्ट नंबर १, क्रमांक ९७० वर सक्रियपणे नोंदवलेले होते. त्यानंतर SIR प्रक्रियेत BLOकडून घरोघरी जाऊन मतदारांच्या पत्त्यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. यावेळी प्रकाश राज (Actor Prakash Raj) हे मतदार यादीत नोंद असलेल्या जुन्या पत्त्यावर राहत नसल्याचे आढळून आले.

BLO प्रकाश राजांच्या घराबाहेर पोहोचला :

प्रकाश राज (Actor Prakash Raj) यांच्या मकान क्रमांक २६६, गार्डन अपार्टमेंट या जुन्या पत्त्यावर BLOने भेट दिली. निवडणूक आयोगाने यासंदर्भातील व्हिडिओही जारी केला आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, शेजारी, इमारतीचे व्यवस्थापक आणि फ्लॅटच्या मालकाशी फोनवरून अधिकृत चौकशी करण्यात आली. त्यातून प्रकाश राज हे गेल्या चार वर्षांपासून या पत्त्यावर राहत नसल्याची माहिती मिळाली. सध्या या फ्लॅटमध्ये अन्य भाडेकरू राहत असल्याचेही समोर आले.

‘शिफ्टेड’ म्हणून नोंद का करण्यात आली?

पडताळणीदरम्यान प्रकाश राज (Actor Prakash Raj) जुन्या पत्त्यावर राहत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नियमानुसार पंचनामा तयार करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या मतदार नोंदीमध्ये ‘Shifted’ अशी नोंद करण्यात आली. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, ही कारवाई कोणत्याही मनमानी पद्धतीने करण्यात आलेली नसून निर्धारित कायदेशीर प्रक्रिया आणि निवडणूक नियमांचे पालन करून करण्यात आली आहे.

प्रकाश राज सध्या कुठे राहतात?

आयोगाच्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता प्रॉपर्टी मॅनेजरशी फोनवरून पुन्हा संपर्क साधण्यात आला आणि त्यांनी प्रकाश राज (Actor Prakash Raj) जुन्या पत्त्यावर राहत नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वतः प्रकाश राज यांच्याशी फोनवर चर्चा केली. प्रकाश राज यांनीही आपण जुन्या पत्त्यावर राहत नसल्याचे मान्य केले, मात्र आपण अद्याप शांतिनगर विधानसभा मतदारसंघातच अन्य एका पत्त्यावर राहत असल्याचे सांगितले. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना नवीन पत्त्याची नोंद करण्यासाठी Form-6 भरून देण्याचा सल्ला दिला आहे.

निवडणूक आयोगाचा दावा काय?

या संपूर्ण प्रकरणावर निवडणूक आयोगाने प्रकाश राज (Actor Prakash Raj) यांनी केलेले आरोप तपासात तथ्यहीन आणि चुकीचे आढळल्याचे म्हटले आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, त्यांचे नाव मनमानी पद्धतीने मतदार यादीतून हटवण्यात आलेले नाही. ते जुन्या पत्त्यावर राहत नसल्याचे प्रत्यक्ष पडताळणीत समोर आल्यानंतर नियमानुसार त्यांची नोंद ‘Shifted’ करण्यात आली.

दरम्यान, प्रकाश राज (Actor Prakash Raj) यांच्या आरोपांनंतर सुरू झालेला हा वाद आता निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. प्रकाश राज यांचे नाव मतदार यादीतून का बदलण्यात आले, याबाबत आयोगाने BLOच्या पडताळणीचा दाखला दिला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >