Sunday, August 23, 2026

Chhatrapati Sambhajinagar Suicide News : खवड्या डोंगर दुर्घटनेला कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी? आईच्या जुन्या व्हिडिओंमुळे नवे प्रश्न उपस्थित

Chhatrapati Sambhajinagar Suicide News : खवड्या डोंगर दुर्घटनेला कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी? आईच्या जुन्या व्हिडिओंमुळे नवे प्रश्न उपस्थित

छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगावजवळच्या खवड्या डोंगरावर २१ ऑगस्ट २०२६ रोजी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. १९ वर्षीय कुणाल चांदगुडे, त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे (४८) आणि आई संगीता चांदगुडे यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेनंतर संगीता चांदगुडे यांच्या जुन्या सोशल मीडिया व्हिडिओंची चर्चा सुरू झाली असून, त्यातून कुटुंबातील अंतर्गत वाद आणि तणावाची पार्श्वभूमी समोर येत असल्याचे दिसत आहे. (Chhatrapati Sambhajinagar Suicide News)

जुन्या व्हिडिओंमध्ये कौटुंबिक वादांचा उल्लेख :

संगीता चांदगुडे यांच्या यूट्यूब चॅनेलवरील काही जुन्या व्हिडिओंमध्ये त्यांनी कौटुंबिक नातेसंबंध आणि घरातील वादांबाबत भाष्य केले होते. एका व्हिडिओमध्ये त्यांनी नणंदेला उद्देशून मुलाच्या शिक्षणाचा मुद्दा उपस्थित करत नाराजी व्यक्त केली होती. “माझ्या मुलाचं शिक्षण बंद होईल असं वाटलं का?” असा सवाल करत त्यांनी कौटुंबिक वादामुळे आपल्यावर आणि मुलाच्या शिक्षणावर परिणाम होणार नसल्याचे म्हटले होते. या व्हिडिओतील वक्तव्यांमुळे कुटुंबात पूर्वीपासूनच काही मतभेद होते का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (Chhatrapati Sambhajinagar Suicide News)

पती आणि नणंदेच्या नात्यावरही भाष्य :

आणखी एका व्हिडिओमध्ये संगीता यांनी पती आणि नणंदेच्या नात्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. पतीच्या कठीण काळात पत्नीने दिलेल्या साथीसंदर्भात त्यांनी भावनिक भाष्य केले होते. या व्हिडिओंमधून त्यांच्या मनातील नाराजी आणि कौटुंबिक तणावाची काहीशी कल्पना येते. मात्र, या जुन्या व्हिडिओंमधील कौटुंबिक वादांचा खवड्या डोंगरावरील घटनेशी थेट संबंध आहे, असे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. या दिशेने कोणतीही निष्कर्षात्मक माहिती समोर आलेली नाही. (Chhatrapati Sambhajinagar Suicide News)

सोशल मीडियावर माय-लेकाचे भावनिक क्षण :

दुसरीकडे, संगीता यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर मुलगा कुणालसोबतचे अनेक भावनिक क्षणही शेअर केले होते. एका व्हिडिओमध्ये कुणाल आपल्या आईची ओटी भरताना दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील या व्हिडिओंमध्ये एका बाजूला माय-लेकामधील जिव्हाळ्याचे नाते दिसते, तर दुसऱ्या बाजूला कौटुंबिक मतभेदांचा उल्लेख आढळतो. (Chhatrapati Sambhajinagar Suicide News)

खवड्या डोंगरावर नेमकं काय घडलं?

२१ ऑगस्ट रोजी खवड्या डोंगरावर कुणालने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. त्याला खाली उतरवण्यासाठी आई संगीता यांनी आर्त विनवणी केली. पोलीस, स्थानिक नागरिक आणि कुटुंबीयांकडूनही त्याला समजावण्याचे प्रयत्न करण्यात आले. यावेळी संगीता यांनी कुणालला खाली येण्याची विनंती करत, पतीसोबतचे वाद संपवून त्याच्यासोबत राहण्याची तयारी दर्शवल्याचे सांगितले जाते. मात्र, कुणालने आपल्याला कोणीही समजून घेत नसल्याची भावना व्यक्त केल्याचे समोर आले आहे. यानंतर घडलेल्या घटनेत कुणालसह त्याचे आई-वडील तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. (Chhatrapati Sambhajinagar Suicide News)

घटनेमागचे नेमके कारण काय?

चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यूमागील नेमके कारण आणि घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी तपासातूनच स्पष्ट होणार आहे. सोशल मीडियावर समोर आलेले जुने व्हिडिओ आणि त्यातील कौटुंबिक वादांचा उल्लेख सध्या चर्चेचा विषय ठरत असला, तरी त्यावरून कोणताही अंतिम निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Chhatrapati Sambhajinagar Suicide News)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >