ठाणे : व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई येथे केले. नवी मुंबई पोलिसांच्या 'नशामुक्त नवी मुंबई' अभियानाअंतर्गत महाविद्यालयीन युवक-युवतींमध्ये अमली पदार्थांच्या सेवनाविरोधात जनजागृती करण्यासाठी 'कॅम्पस कनेक्ट' या विशेष मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
नेरूळ येथील डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीज सेंटर ऑफ एक्सलन्स येथे आयोजित या सोहळ्यास यावेळी वन मंत्री गणेश नाईक, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री रायगड भरत गोगावले, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार महेश बालदी, आमदार रवींद्र फाटक, आमदार विक्रम पाटील, नवी मुंबई महानगरपालिका महापौर सुजाता पाटील, पनवेल महानगरपालिका महापौर नितीन पाटील, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, डी.वाय. पाटील महाविद्यालयाचे अध्यक्ष विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. (CM Devendra Fadnavis)
मुंबई : टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील युवकांच्या कौशल्य, रोजगारक्षमता, ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजच्या तरुण पिढीमध्ये अमली पदार्थांचे वाढते आकर्षण आणि त्याचे होणारे गंभीर सामाजिक, शारीरिक व मानसिक परिणाम लक्षात घेता नवी मुंबई पोलिसांनी या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. महाविद्यालयीन परिसर हा युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा महत्त्वाचा टप्पा असल्याने या वयोगटात योग्य माहिती व जागरूकता निर्माण करणे, हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी भारताच्या 'डेमोग्राफिक डिव्हिडंड'चा उल्लेख करत स्पष्ट केले की, देशाची ६५% युवाशक्ती ही आपली मोठी ताकद आहे. या युवाशक्तीला निष्प्रभ करण्यासाठी शत्रू राष्ट्रे आणि असामाजिक घटक तरुणांना व्यसनाच्या आहारी घालण्याचे षड्यंत्र रचत आहेत. या लढाईत अमली पदार्थांची पुरवठा साखळी (सप्लाय चेन) पूर्णपणे नेस्तनाबूत करणे आणि तरुणांमध्ये जागृती निर्माण करून मागणी (Demand Side) संपवणे, अशा सर्वांगीण (३६०-डिग्री) अप्रोच ही काळाची गरज आहे. (CM Devendra Fadnavis)
'नो टू ड्रग्ज'चा संदेश
प्रत्येक शैक्षणिक कॅम्पस हे या लढाईचे केंद्र असून प्रत्येक विद्यार्थी या नशाविरोधी मोहिमेचा सैनिक आहे. व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे. व्यसनाच्या गर्तेत अडकलेल्या विद्यार्थ्यांना भेदभाव न करता व्यसनमुक्ती केंद्रांच्या (डी-एडिक्शन सेंटर) माध्यमातून मदत केली जाईल, असे सांगून स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा दाखला देत, योग्य दिशेने गेलेली युवाशक्ती समाजासाठी 'ऑक्सिजन' बनून संजीवनी देते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पोलीस, महानगरपालिका, नागरिक आणि तरुणाईच्या संयुक्त प्रयत्नांतून नवी मुंबईला पूर्णपणे नशामुक्त आणि सुरक्षित बनवण्याचा संकल्प या वेळी सोडण्यात आला. तरुणाईच्या साथीने नशा पराभूत होईल आणि 'सुजलाम सुफलाम' व विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. (CM Devendra Fadnavis)
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्र व व्यसनमुक्त चित्रफितीचे लोकार्पणही करण्यात आले. तसेच या अभियानानिमित्त आयोजित जनजागृतीपार पोस्टर्स व रील्स स्पर्धेत निवडलेल्या सर्वोत्तम प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.





