Wednesday, July 1, 2026

Jalgaon : जळगाव स्थानकावर मोठा अनर्थ टळला! धावत्या अमृतसर एक्स्प्रेसच्या जनरेटर बोगीला आग

Jalgaon : जळगाव स्थानकावर मोठा अनर्थ टळला! धावत्या अमृतसर एक्स्प्रेसच्या जनरेटर बोगीला आग

Jalgaon Railway Station : जळगाव रेल्वे स्थानकावर बुधवारी सकाळी एक मोठा अनर्थ थोडक्यात टळला. मुंबईहून अमृतसरकडे धावणाऱ्या अमृतसर एक्स्प्रेसच्या (Amritsar Express) जनरेटर बोगीच्या ब्रेक डिस्कला अचानक आग लागल्याने काही काळ स्थानकावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. धुराचे मोठे लोट बाहेर पडताना पाहून प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. अनेक प्रवासी बोग्यांमधून बाहेर पडण्यासाठी धावपळ करू लागले. मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आणि तांत्रिक अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे काही मिनिटांतच आग आटोक्यात आली आणि संभाव्य मोठा अपघात टळला.

जळगाव स्थानकावर मोठा अनर्थ टळला

ही घटना बुधवारी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबईहून अमृतसरकडे जाणारी ११०५७ अमृतसर एक्स्प्रेस जळगाव रेल्वे स्थानकावर दाखल झाली होती. याचवेळी रेल्वे रुळाला लागलेली एक चावी उडून डीव्हीला आदळली. त्यामुळे एअर प्रेशर अचानक रिलीज झाले. परिणामी सामान ब्रेक आणि जनरेटर कार बोगीचे ब्रेक एकाचवेळी दाबले गेले. या प्रक्रियेत ब्रेक डिस्कमध्ये प्रचंड घर्षण निर्माण झाल्याने त्यातून ठिणग्या उडाल्या आणि काही क्षणांतच आग लागली. (Jalgaon Railway Station)

रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ

आग लागल्यानंतर जनरेटर बोगीतून धुराचे मोठे लोट बाहेर पडू लागले. प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांना ट्रेनला भीषण आग लागल्याचा भास झाला. त्यामुळे काही काळ स्थानकावर एकच गोंधळ उडाला. मात्र रेल्वे प्रशासनाने प्रसंगावधान राखत तातडीने बचावकार्य सुरू केले. रेल्वेतील कर्मचारी आणि स्थानकावरील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जनरेटर बोगीतील दोन फायर एक्स्टिंग्विशरच्या साहाय्याने आग विझविण्यास सुरुवात केली. काही मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

या संपूर्ण घटनेत आणखी एक महत्त्वाची भूमिका बजावली ती तांत्रिक सहाय्यक देवेंद्र गुरव यांनी. भुसावळ येथे ड्युटी पूर्ण करून इगतपुरी मेमूने घरी जात असताना ते जळगाव स्थानकावर उतरले आणि त्यांना ही घटना दिसली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करत त्यांनी एअर प्रेशर नियंत्रित केले आणि रेल्वेची यंत्रणा पुन्हा सुरळीत करण्यासाठी महत्त्वाची मदत केली.

अन अमृतसर एक्स्प्रेस भुसावळकडे रवाना

आग पूर्णपणे विझवल्यानंतर रेल्वेच्या सर्व यंत्रणेची सखोल तपासणी करण्यात आली. कोणताही तांत्रिक धोका नसल्याची खात्री झाल्यानंतर सकाळी सुमारे ८.१५ वाजता अमृतसर एक्स्प्रेसला भुसावळच्या दिशेने पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. मात्र काही क्षणांसाठी निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणामुळे प्रवाशांचा थरकाप उडाला होता. रेल्वे कर्मचारी, अग्निशमन साहित्याचा योग्य वापर आणि तांत्रिक अधिकाऱ्यांच्या वेळेवर केलेल्या कार्यवाहीमुळे संभाव्य मोठा अपघात टळला, अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >