Tuesday, June 23, 2026

Nagpur News : नागपुरातील प्रसिद्ध रुग्णालयात डॉक्टरांचा संशयास्पद मृत्यू; इंजेक्शन ओव्हरडोजचा संशय

Nagpur News : नागपुरातील प्रसिद्ध रुग्णालयात डॉक्टरांचा संशयास्पद मृत्यू; इंजेक्शन ओव्हरडोजचा संशय

Nagpur News : नागपुर: नागपुरातील धंतोली परिसरातील न्यूरॉन रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका डॉक्टरांचा संशयास्पद मृत्यू (Death) झाल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालयातील त्यांच्या कक्षातच ते मृतावस्थेत आढळून आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. (Nagpur News)

मृत डॉक्टरांचे नाव डॉ. ईश्वरचंद्र नरहरी चांदेवार ( Dr Ishwarchandra Chandewar) (वय 42) असे आहे. ते आयुर्वेद शाखेचे डॉक्टर होते आणि न्यूरॉन रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. सोमवारी सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे रुग्णालयातील कामकाज पूर्ण केले. त्यानंतर ते विश्रांतीसाठी आपल्या कक्षात गेले.

मात्र बराच वेळ उलटूनही ते बाहेर न आल्याने सहकाऱ्यांना संशय आला. त्यांनी वारंवार आवाज दिला, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. कक्षाचा दरवाजा आतून बंद असल्याने अखेर पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी डॉ. चांदेवार बेशुद्ध अवस्थेत आढळले. तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. कक्षात काही इंजेक्शन आढळून आल्याने इंजेक्शनच्या ओव्हरडोजमुळे मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट आढळून आलेली नाही. त्यामुळे मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आत्महत्या, औषधांचा अतिरेक किंवा नैसर्गिक कारण अशा विविध शक्यतांवर तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री डॉ. चांदेवार यांना अस्वस्थ वाटत होते आणि त्यांनी वैद्यकीय तपासणीही करून घेतली होती. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. सध्या धंतोली पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. (Doctor Death Mystery)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा