मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गणेशमूर्ती आगमन मार्गांची पुढील २४ तासांत पाहणी करून आवश्यक दुरुस्ती आणि सुरक्षात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले आहेत. प्रशासकीय व्यवस्थेत कसूर आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी दिला.
दुर्घटनेनंतर शेलार यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवसे आणि बृजेश जोशी यांच्या पार्थिवाचे चंदनवाडी स्मशानभूमीत अंतिम दर्शनही त्यांनी घेतले. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
दुर्घटनेमागील नेमके कारण आणि जबाबदारी चौकशीतून स्पष्ट होईल. त्यामुळे पोलिसांना त्यांचे काम करू दिले पाहिजे, असे शेलार यांनी सांगितले. गणेशमूर्ती वाहून नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॉली, चाकांची रचना, लोखंडी भाग आणि कंपन याबाबत गणेश मंडळांनी खबरदारी घ्यावी, तसेच पोलिसांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
नाशिक : सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने साधुग्राम आणि मंडप व्यवस्थेचा आढावा घेतला. ...
आगमन मार्गांची तातडीने पाहणी
मुंबई महापालिका आयुक्तांशी चर्चा करून गणेशमूर्ती आगमन मार्गांवरील रस्त्यांची स्थिती, आवश्यक दुरुस्ती आणि सुरक्षेच्या उपाययोजनांची पुढील २४ तासांत पाहणी करण्याचे निर्देश दिल्याचे शेलार यांनी सांगितले. यापूर्वीच्या बैठकीत दिलेल्या सूचनांचीही पुन्हा तपासणी केली जाणार आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना वैयक्तिक ५ लाखांची मदत
या दुर्घटनेतील मृत गणेश सेवकांना श्रद्धांजली अर्पण करत शेलार यांनी जखमींच्या उपचारासाठी आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन दिले. मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत केली जाणार असून, शेलार यांनी वैयक्तिकरित्या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली.






