Saturday, June 20, 2026

समुद्र कसे निर्माण झाले?

समुद्र कसे निर्माण झाले?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील शिवम व त्याचे सवंगडी सहलीला गेले असताना दुपारचे जेवण झाल्यावर विश्रांती घेत बसले होते. जेवण करताना त्यांची पृथ्वीसंबंधित गोष्टींवर चर्चा सुरू होती. आराम करता करताही चूप राहतील, तर ती मुलेच कसली. त्यांची जिज्ञासा काही त्यांना चूप बसू देत नव्हतीच. “पृथ्वीवर समुद्र कसे काय निर्माण झालेत गड्या?” कौशलने प्रश्न केलाच. “पावसाचे पाणी जेव्हा एखाद्या नैसर्गिक खड्ड्यात किंवा खळग्यात जमा होते त्याला तलाव किंवा तळे म्हणतात. तलाव जर खूप मोठा आणि खोल असेल, तर त्याला सरोवर म्हणतात. अफाट मोठ्या व अति प्रचंड खोल खड्ड्यातील पाण्याच्या विशाल व अथांग साठ्याला समुद्र म्हणतात. पृथ्वीवरील सर्व नद्यांचे पाणी हे समुद्रात जमा होते. त्यामुळे आपल्या पृथ्वीवर विशाल व अथांग समुद्र बनलेत. आपल्या पृथ्वीवर पाऊण टक्के समुद्र व फक्त पाव टक्केच जमीन आहे.” शिवमने सांगितले.“समुद्र किती खोल असतात?” सोबतच्या यात्रेकरूने शंका काढली. शिवम म्हणाला, “समुद्र किना­ऱ्याजवळ जरी उथळ असला तरी जसेजसे किना­ऱ्यापासून आत समुद्रात जावे तसतशी समुद्राची खोली वाढत जाते. ज्याप्रमाणे पृथ्वीवरील वेगवेगळ्या पर्वतांची उंची ही वेगवेगळी असते त्याचप्रमाणे पृथ्वीवरील वेगवेगळ्या समुद्रांची खोलीसुद्धा वेगवेगळी असते. समुद्रची खोली ही ४ कि.मी. एवढी व काही ठिकाणी तर ७ ते ८ कि.मी.ही असते. आतापर्यंत समुद्राची जास्तीत जास्त खोली ११.०३ कि.मी. इतकी मोजण्यात आली आहे.” “मग समुद्राचा तळ कसा आहे?” मंगलने प्रश्न विचारला. “समुद्राचा तळही एकदम सपाट व सखल नसून तोही जमिनीच्या पृष्ठभागासारखा उंच-सखल आहे. समुद्रातही उंच ठेंगणे पर्वत व खोल द­ऱ्या आहेत. लाव्हारस ओकणारे ज्वालामुखीही आहेत. समुद्रात जमिनीप्रमाणेच खडकसुद्धा आहेत.” शिवमने सांगितले. “पण पृथ्वीवर भूभागापेक्षा जलभाग जास्त का आहे?” यात्रेकरूने शंका विचारली. “त्याचे असे आहे काका, पृथ्वी घन होत असताना पृथ्वीवर सपाट भागापेक्षा वा डोंगरपर्वतांपेक्षा लहान-मोठे, विशाल आकाराचे उथळ, खोलगट, अत्यंत खोल असे खड्डे जास्त तयार झालेत. ही प्रक्रिया सुरू असतानाच भूगर्भातील प्रचंड उष्णतेने काही द्रवरूप खडक वितळून त्यांचे पाणी होऊन त्या खळग्यांमध्ये साचत गेले. तसेच प्रतिवर्षी त्यांवर होणा­ऱ्या पावसाचे पाणी त्यात साचत गेले. त्याचप्रमाणे दरवर्षी पृथ्वीच्या इतर भागांवर पडलले पावसाचे पाणीही नद्यांद्वारे त्यांमध्येच जमा होत गेले. साहजिकच निसर्गत: खळग्यांची संख्या जास्त असल्याने तळे, तलाव, सरोवर व समुद्र जास्त निर्माण झालेत. म्हणून पृथ्वीवर भूभागापेक्षा जलभाग हा जास्त आहे. म्हणूनच पृथ्वीला जलग्रह म्हणतात.” शिवमने सोप्या भाषेत स्पष्टीकरण दिले. “आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये सप्तसागर असा उल्लेख येतो. ते कोणते आहेत?” यात्रेकरूने विचारले. “काका, तसे पाहिले तर पृथ्वीवर विशाल, अथांग व अफाट असा एकच महासागर आहे. इतर सारे समुद्र त्याचेच तुकडे आहेत. पृथ्वीवर ७० टक्के भाग सागरांनी व्यापला आहे. तरीही जसे आपल्या पृथ्वीचे सात खंड आहेत तसेच आपल्या पृथ्वीवर प्रमुख महासागरसुद्धा सातच आहेत कारण त्यांच्यामुळेच पृथ्वीचे सात खंड निर्माण झालेले आहेत. ते म्हणजे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर, भूमध्य समुद्र, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, ऑस्ट्रिक महासागर. ह्यांपैकी पॅसिफिक महासागर हा आकाराने सर्वात मोठा आहे.” शिवमने उत्तर दिले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा