Saturday, July 25, 2026

जिम कॉर्बेटच्या सहवासात…

जिम कॉर्बेटच्या सहवासात…

भटकंती-प्रल्हाद जाधव जिम कॉर्बेट हा नैनिताल येथील कालाढुंगी भागातील एक लोकप्रिय ब्रँड असून अर्थव्यवस्थेचा कणा आहे. वनविभागाने कॉर्बेट यांच्या घराचे स्मारकात रूपांतर केले आहे. त्यांची पुस्तके, त्यांचे नाव असणाऱ्या टोप्या, जाकिटे अशा वस्तू तेथे विक्रीसाठी ठेवल्या आहेत. त्या खरेदी करण्यासाठी गर्दी असते. हे भाग्य कॉर्बेट यांना सहज लाभलेले नाही. त्यासाठी त्यांना आयुष्य वेचावे लागले. त्यांचे जीवन हाच त्यांचा संदेश होता. १८ फेब्रुवारी २०२६. बुधवार.

सकाळी ७.३० ला जाग आली तेव्हा आम्ही उभयता नैनितालला होतो. हॉटेलच्या बाहेर येऊन अंगणात बसलो. अंगण म्हणजे डोंगर उकरून सपाट केलेली थोडीशी जागा. चार-पाच गाड्या पार्क करता येतील अशी सोय. एकीकडे पर्यटकांना बसायला दोन-चार बाकडी. फॅशनेबल छप्पर असलेला झोपाळा. छोटी बाग. आजूबाजूला पाहावे तिकडे उंचच उंच देवदार. खाली पाहिले तर झाडाच्या शेंड्यांनी घेरलेला चर्चचा माथा. समोर ते जगप्रसिद्ध नैनी सरोवर. त्याचा किनारा धरून आकाशात घुसणाऱ्या हिरव्या-निळ्या पर्वतरांगा, अंगाशी लगट करणारी अल्हाददायक थंडी...इतकी शांतता आणि निवांतपणा की मी जणू समाधी अवस्थेत गेलो. मनाचा तळ स्वच्छ दिसू लागला. रस्किन बाँड आणि त्यांच्या लेखनाची आठवण झाली. ते मसुरीला लँडोर येथे राहतात. त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू नैनिताल. हिमालय ही त्यांची साहित्यिक खेळपट्टी. त्यांनी आणि नमिता गोखले या सुप्रसिद्ध लेखिकेने मिळून हिमालयाशी संबंधित मान्यवरांच्या लेखनाचे एक पुस्तक (Himalaya Adventures, Meditations, Life) संपादित केले आहे; त्याची आठवण झाली. हिमालयाच्या ओढीतून ओळख झालेले डॉ. शेखर पाठक यांचे ‘दास्तान-ए-हिमालय’ हे द्विखंडात्मक लेखन माझ्या संग्रही आहे. हिमालयाचा ज्ञानकोश अशी पाठक यांची ओळख आहे. ते नैनितालच्या बाहेर असल्यामुळे भेटीचा योग नव्हता. पण त्यांचे मित्र दै. ‘नैनिताल समाचार’चे संपादक राजीव लोचन साह यांची भेट ठरली होती.

सारे आवरून बाहेर पडलो. आजूबाजूच्या पर्वतांवर अगदी टोकाला जाऊन तेथून नैनितालचे विविध कोनातून विहंगम दर्शन घेतले. ‘नैनिताल दर्शन’ या एका पॉइंटवरून खालचे ते जगप्रसिद्ध सरोवर पूर्णपणे दृष्टिक्षेपात येते. ते दृश्य पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक तेथे जातात. कितीही पाहिले तरी समाधान होत नाही. हिमालयातील सारी सरोवरे आपल्याला असेच आकर्षित करून घेतात. निसर्गाने आपला प्रेमळ डोळा किलकिला करून जगाकडे पाहावे तशी ती भासतात.बाजूला ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेले बारा-पत्थर हे ठिकाण. प्रस्तरारोहण करणाऱ्या गिर्यारोहकांचे ते जणू तालमीचे ठिकाण. तेथून दूरवर क्षितिजाशी चमचमणाऱ्या हिमालयाच्या बर्फाच्छादित रांगा पाहिल्या. तेथे बाजूला बरेच घोडेवाले उभे होते. पर्यटकांना घोड्यावरून नैनिताल दर्शन घडवणे हा त्यांचा व्यवसाय. आम्ही त्यांना नम्र नकार देत तेथून निघालो. खाली उतरताना ‘हिमालयीन बोटॅनिकल गार्डन’मध्ये गेलो. हिमालयातील वनस्पती, प्राणी-पक्षी यांची माहिती देणारे कायमस्वरूपी प्रदर्शन तेथे लावलेले आहे. बाजूला ‘इन्सेक्ट म्युझियम’. तेथेही गेलो. एखादे कीटक संग्रहालय आम्ही प्रथमच पाहत होतो. हिमालयात आढळणाऱ्या कीटकांची अद्भुतरम्य माहिती तेथे देण्यात आली आहे. कीटकांचे जीवनचक्र तेथे शब्द, चित्र, प्रतिरूपांच्या माध्यमातून पाहायला मिळते.

एका काचपेटीत एका पुठ्ठ्यावर टाचून ठेवलेली काही विषारी फुलपाखरे पाहिली. बाजूला उभ्या असणाऱ्या एका मुलीकडे चौकशी केली. ती या विषयातील तज्ज्ञ निघाली. त्याच संस्थेत ती पीएच.डी. करत होती. ती म्हणाली ते विष माणसाला बाधत नाही, तर अशा फुलपाखरांना खाणाऱ्या पाली, सरडे, साप यांच्यासाठी ते घातक असते. शक्यतो अशा फुलपाखरांच्या नादाला ते प्राणी लागत नाहीत. हा धडा इतरही काही फुलपाखरांनी गिरवणे सुरू केले आहे हे मला आठवले. पुण्याच्या डॉ. कृष्णमेघ कुंटे यांनी अशा फुलपाखरांवर पीएच.डी. केली आहे. आपला वंश पुढे चालू राहावा म्हणून काही फुलपाखरांनी विषारी फुलपाखरांची नक्कल करत स्वतःच्या शरीरात हेतूत: विषारी गुणधर्म उतरवले असून आपले जगणे सुकर करून घेतले आहे. किती मौलिक आणि विलक्षण संशोधन!

दुसऱ्या एका काच-पेटीत पेंढा भरून ठेवलेले उदमांजर आणि एक साळींदर पाहिले. एरवी हे प्राणी जवळून पाहता येत नाहीत. उदमांजर स्मशानातील प्रेते उकरून खाते हे खरे आहे का, असे मी त्या स्कॉलर मुलीला विचारले, ती हो म्हणाली. प्रदर्शन पाहून बाहेर आलो. तेथेच थंडीतील कपडे, भेट वस्तू, पुस्तके यांची विक्री करणारे दुकान. जिम कॉर्बेट हा तिकडे एक लोकप्रिय ब्रँड आहे. कुठेही गेले तरी त्यांच्या नावाने टोप्या, जाकिटे, त्यांची पुस्तके सर्वत्र विक्रीसाठी मांडून ठेवलेली दिसतात. थोडी खरेदी केली आणि बाजूच्या कॅन्टीनमध्ये बसून, आसमंत डोळ्यांत साठवून घेत निवांतपणे चहा घेतला आणि काही वेळाने गाडीत बसून खाली निघालो.

१९ फेब्रुवारी, २०२६. गुरुवार.

सकाळी ७ वाजता जाग आली. थंडी चांगलीच पडली होती. खिडकीच्या काचेवरती धुके दाटले होते. बाहेर येऊन पाहिले तर हलकासा पाऊस येऊन गेलेला दिसला. चहा मागवला. न्याहारी केली आणि ‘जिम कॉर्बेट नॅशनल पार्क’ला जाण्यासाठी निघालो. (आपण ज्या हॉटेलमध्ये उतरतो तेथे पर्यटनाशी संबंधित व्यवहारांचे परिपूर्ण जाळे असते. आवश्यक ती सगळी व्यवस्था असते. विश्वासात घेऊन माणसांशी बोलले की सगळे जमून जाते. सगळीकडे गरजू माणसे असतात. मदत करणारी माणसे असतात.)नैनितालचा घाट उतरून रामनगर मार्गे पलीकडच्या बाजूला गेले की कालाढुंगी लागते. सुप्रसिद्ध लेखक जिम कॉर्बेट यांचे हे गाव. तेथे त्यांचे निवासस्थान पाहिले. ते २५ जुलै १८७५ रोजी नैनितालमध्ये जन्मले आणि १९ एप्रिल १९५५ रोजी त्यांनी केनियामध्ये देह ठेवला. काही काळ रेल्वेत नोकरी झाल्यावर नंतरचे आपले सारे आयुष्य त्यांनी वन्यजीव संरक्षणासाठी वाहून घेतले. ‘मॅन ईटर्स ऑफ कुमाऊ’ हे त्यांचे पुस्तक गाजले. आजही ते जगभर वाचले जाते.जंगल परिसरात राहणाऱ्या गोरगरीब माणसांचा जीव वाचवण्यासाठी जिम कॉर्बेट यांना आधी वाघांची शिकार करावी लागली पण हळूहळू त्यांचे मतपरिवर्तन होत गेले. उर्वरित आयुष्य त्यांनी वाघांचे संरक्षण नि संवर्धन यासाठी पणाला लावले. ‘वन्य जीवांची शिकार’ या घातक छंदाला त्यांनी ‘वन्यजीव छायाचित्रणा’चा अप्रतिम पर्याय उपलब्ध करून दिला; हे अनेकांना माहीत नसेल.

वनविभागाने कॉर्बेट यांच्या घराचे स्मारकात रूपांतर केले आहे. त्यांची टेबल-खुर्ची आणि दोऱ्या लोंबत असलेला लोखंडी खाटेचा सांगाडा पाहून माझ्या मनात त्यांच्याविषयी अधिकच प्रेम निर्माण झाले. येथेच ते लेखन करत असतील, विश्रांती घेत असतील आणि लहर आली की हा संसार उचलून जंगलात चूल मांडत असतील हे लक्षात आले. त्यांच्या जीवनाचे चित्ररूप दर्शन तेथे घडते. त्यांची पुस्तके, त्यांचे नाव असणाऱ्या टोप्या, जाकिटे अशा वस्तू तेथे विक्रीसाठी ठेवल्या आहेत. त्या खरेदी करण्यासाठी गर्दी असते. हे भाग्य कॉर्बेट यांना सहज लाभलेले नाही. त्यासाठी त्यांना आयुष्य वेचावे लागले. त्यांचे जीवन हाच त्यांचा संदेश होता.

बाजूला चहाच्या टपरीवर चौकशी केली. टपरी चालक म्हणाला, “जिम कॉर्बेट हे आमच्यासाठी परमेश्वर होते. त्यांनी स्वतःसाठी काहीही मागे ठेवले नाही. दोघे बहीण-भाऊ शेवटपर्यंत अविवाहित राहिले. त्यांनी ब्रिटिश सरकारकडून जमीन विकत घेऊन आमचे हे गाव वसवले. त्यांच्यामुळेच जगात आज आमचे अस्तित्व आहे”. जिम कॉर्बेट हा आता त्या भागातील एक लोकप्रिय ब्रँड असून अर्थव्यवस्थेचा कणा आहे. सरकारने त्यांच्या कामाची जाणीव ठेवून देशातील या पहिल्या नॅशनल पार्कला त्यांचेच नाव दिले आहे. कालाढुंगी येथील स्मारकाची देखभालही वनविभागामार्फत केली जाते.

पुढे जाताना दहा-पंधरा किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलात जिम कॉर्बेट यांच्या नावाचा प्रसिद्ध धबधबा पाहायला मिळाला. दुपारी २ वाजता सफारी सुरू होणार होती तोवर काय करायचे या प्रश्नाचे उत्तर म्हणून आमच्या ड्रायव्हरकडून आम्हाला मिळालेला तो बोनस होता. त्या प्राचीन डोंगरातील हिरव्यागार शेवाळ्यावरून वाहणारे पाणी आणि पुढे निर्मळ पारदर्शक ओढ्यात होणारे त्याचे रूपांतर पाहून जीव हरखून गेला. डोक्यावर हिरव्या मायेचे दाट छत्र धरणारे घनदाट जंगल आणि तो निर्मळ-प्रशांत धबधबा पाहून विश्व-निर्मितीच्या प्रारंभबिंदूशी आलो की काय असे मलावाटू लागले.वनविभागाच्या सफारी जीपमधून जंगलात शिरलो. जयप्रकाश नावाचे अनुभवी गाईड सोबत होते. आमच्या त्या रोमहर्षक फेरीत विविध प्रकारचे प्राणी-पक्षी, झाडे-झुडपे, कीटक-पतंग दिसले. एका ठिकाणी पाण्यातील लाकडावर येऊन ऊन खात बसलेली दोन कासवे आणि झाडाला चिकटून बसलेली एक निवांत घोरपड दिसली. वाघाने मात्र तोंड दाखवले नाही. त्याची शेपूट जरी दिसली असती तर भरून पावलो असतो. एक फॉरेस्ट ऑफिसर नोकरी करून निवृत्त झाला तरी त्याला एकदाही वाघ दिसला नाही असे मी ऐकून आहे. त्या मानाने आम्ही नशीबवान कारण आम्हाला रणथंबोर येथे तीन दिवसांत सहा वाघ दिसले होते!

एका झाडावर पत्नीला (सुरेखा) क्रेस्टेड सर्पंट इगल अर्थात् तुरेवाला सर्प गरुड दिसला. तो पानात इतका एकरूप होऊन गेला होता की निष्णांत पक्षीनिरीक्षका खेरीज कुणालाही दिसला नसता. आम्ही गाडी थांबवून पाहू लागलो. आमच्या गाईडने या ‘स्पॉटिंग’बद्दल सुरेखाचे कौतुक केले. खरे तर ती गणिताची विद्यार्थीनी. लग्नानंतर माझ्या नादाने पक्षी निरीक्षणाच्या क्षेत्रात आली. त्यात तिने स्वतःला असे झोकून दिले की तिचा अभिमान वाटावा! एखाद्याला पक्षी निरीक्षणाचा छंद जडला तर तो त्या घरातील सर्वांनाच जडतो हे वचन जगप्रसिद्ध आहे.जंगलातून बाहेर पडताना एक ठिपक्याची हरणी आणि तिचे पाडस रस्ता ओलांडून जाताना दिसले. पाडसाचे वय जेमतेम आठ दिवसांचे असेल असे गाईडने म्हटले. आठ दिवसांचे पाडस. एखाद्या वाघाची शिकार तर होणार नाही ना? किती दिवस जगेल? आपला वंश पुढे वाढवण्याची संधी मिळेल ना त्याला? असे प्रश्न मला पडू लागले. ‘जिवो जिवस्य जीवनम्’ हा जंगलाचा नियम. तेथे सर्वांनाच सावधपणे जगावे लागते. पोट भरलेले असल्यावर मात्र कोणी कोणावर हल्ला करत नाही. भूतकाळाचे चिंतन आणि भविष्याची चिंता जंगलाला माहीत नाही. एखाद्या गोष्टीचा संचय किंवा पुढील सात पिढ्यांची व्यवस्था असला अघोरीपणा तेथे कोणी करीत नाही.

निसर्गात फक्त ‘असणे’ असते. तिथे भांडण-तंटे, हेवे-दावे असे काही नसते. तिथे कोणी शाळेत जात नाही. कविता लिहीत नाही. पुस्तके प्रसिद्ध करत नाही. तिथे विद्यापीठे नाहीत. शाळा, महाविद्यालये नाहीत. लष्करी तळ नाहीत. मठ, धर्मसंस्था, बँका नाहीत. तेथे कोणी नोकरी, व्यवसाय करत नाहीत, कोणाची कोणाशी स्पर्धा नाही. तिथे कोणाला काही सिद्ध करायचे नसते. तिथे सकाळ होते, रात्र होते, दुपार होते. फुलपाखरे-पक्षी उडतात, प्राणी बागडतात, कीटक गाणी म्हणतात, जगण्याचा संघर्ष असतो पण कोणतेही पुस्तकी नियम नसतात, पोथ्या-पुराणे नसतात, कादंबऱ्या नसतात, पैसा नसतो, बँका नसतात. धर्म नसतो, राजकारण नसते.

प्राणी-पक्षी आपल्या मेंदूच्या पलीकडे जाऊन विचार करत नाहीत. त्यांना त्याची गरज वाटत नाही. तेथे कोणीही बुद्धीला ताण देत नाही. तेथे प्रॉपर्टीवरून भांडणे होत नाहीत. तेथे कुणालाही अहंकार नसतो, द्वेष-मत्सर, ‘ग’ची बाधा नसते. पक्षी-प्राण्यांकडील बुद्धिमत्ता जुजबी, जगण्यापुरती. पण तेवढी त्यांना पुरते. बुद्धिमत्ता मर्यादित असण्यातच तेथे सर्वांचे भले असते. कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेण्याची वेळ तेथे कुणावरही येत नाही. तेथे ऋतूचक्र बहरते. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा सुरू असतो. पक्षी अंडी घालतात पिल्ले, जन्माला येतात, फुलपाखरे उडतात, फुले फुलतात. तेथे ऑनलाईन काही नाही. यांत्रिक काही नाही आणि तरीही सारे काही सुरळीत सुरू असते. ते जग सुरू असते फक्त वर्तमान-क्षणांच्या हिशेबात. माणसाला हे कधी समजणार? pralhadjadhav.two@gmail.com

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा