Saturday, July 25, 2026

अर्जुनाकडून अप्सरांचा उद्धार

अर्जुनाकडून अप्सरांचा उद्धार

महाभारतातील मोतीकण-भालचंद्र ठोंबरे महाभारतातील कुंती पुत्र अर्जुनाकडून शापीत अप्सरांचा उद्धार झाल्याची कथा स्कंध पुराणात आहे. त्या कथेनुसार अर्जुन एकदा आपल्या तीथार्टनाच्या दरम्यान पंचतीर्थ नावाने प्रसिद्ध असलेल्या कुमारेश्वर तीर्थ, स्तंभेष तीर्थ, वर्करेश्वर तीर्थ, महाकालेश्वर तीर्थ आणि सिद्धेश तीर्थ या तीर्थावर पोहोचला. त्या पाच तीर्थामध्ये पाच भयंकर मगरी राहत होत्या. त्या मगरी या तीर्थात स्नान करणाऱ्यांना पाण्यात ओढून नेत असत. त्यामुळे या तीर्थावर ऋषीमुनी अथवा अन्य कुणीही स्नानास येत नसत. त्यामुळे एक प्रकारे या तीर्थावर बहिष्कार टाकल्यासारखा होता.

त्या तीर्थात स्नान करण्याची ईच्छा करणाऱ्या अर्जुनाला काही जणांनी तीर्थातील मगरीचे अस्तित्व सांगून स्नान न करण्याची विनंती केली; परंतु त्यांचे न ऐकता अर्जुन तीर्थात स्नानास उतरला. तेव्हा मगरीने त्याला पकडले. अर्जुनाने आपली सुटका करून घेतली व आपल्या ताकतीने तिला पाण्याच्या बाहेर काढले. पाण्याबाहेर येताच मगरीचे एका सुंदर अप्सरेत रूपांतर झाले. अर्जुनाने तिला तू कोण? व तुला मगरीचे रूप का व कसे प्राप्त झाले? असे विचारले. तेव्हा माझे नाव वर्चा असून मी देवांच्या नंदनवनातील अप्सरा आहे व बाजूच्या चार तीर्थात माझ्या चार मैत्रिणीही मगरीच्याच रूपात असल्याचे सांगितले. आपल्या मगरीच्या रूपाबद्दल सांगताना ती म्हणाली, “ एकदा मी माझ्या मैत्रिणीसह वनात विहार करीत होते तेव्हा एका ऋषींना तप करताना पाहिले. त्यांच्या तपाच्या तेजाने तो परिसर उजळून गेला होता, त्या ऋषींच्या रूपावर भाळल्याने आम्ही त्यांचा तपोभंग करण्याचे ठरवले. आम्ही नृत्य व अंगवेक्षेपाद्वारे त्यांची तपश्चर्या भंग केली. त्यामुळे संतप्त झालेल्या ऋषींनी आम्हा पाचही जणींना शंभर वर्षेपर्यंत पाण्यात मगरीच्या रूपात राहण्याचा शाप दिला.”

आमच्याकडून झालेल्या चुकीची जाणीव झाल्याने आम्ही ऋषींची क्षमा मागून कृपा करण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी आम्हाला उपदेश केला की, तुम्ही आजपर्यंत अनेकांना आपल्या मोहजालात अडकवून पाप केले आहे. संसार चक्र अखंडप्रमाणे चालू राहावे म्हणूनच स्त्री-पुरुषांची निर्मिती झाली आहे व एकदा शास्त्रोक्त पद्धतीने विवाह झाल्यानंतर दोघांनीही परस्परांशी एकनिष्ठ असावे. मात्र एकनिष्ठ नसणाऱ्या व स्त्रीलंपट पुरुषाला मृत्यूनंतर भयंकर नरक यातना भोगाव्या लागतात. तेव्हा प्रत्येकाने भगवत भक्ती करून आपले जन्माचे सार्थक करावे. असा उपदेश करून काही वर्षांनंतर एक श्रेष्ठ पुरुष तुमची या पाशातून मुक्तता करेल असा उ:षाप दिला. आपल्या कृत्याचा पश्चात्ताप होऊन शापित झालेल्या त्या अप्सरा शोक करीत असतानाच देवर्षी नारद त्या ठिकाणी आले. त्यांनी अप्सरांची कथा ऐकून त्यांनी त्यांना या पंच तीर्थात जाण्यास सांगितले व पुढे कालांतराने तीथार्टनासाठी आलेल्या अर्जुनाने या तीर्थात केलेल्या स्नानामुळे तुम्ही शापमुक्त व्हाल असा सल्ला दिला.त्यानुसार आज मी शापमुक्त झाले तसेच माझ्या अन्य मैत्रिणींना सुद्धा मुक्त करावे, अशी तिने विनंती केली. तेव्हा अर्जुनाने अन्य चार तीर्थात स्नान करून त्यांनाही मुक्त केले. अशा प्रकारे शापमुक्त होऊन अप्सरा परत स्वर्गात निघून गेल्या.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा