डॉ. कुमार सप्तर्षी यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी एका पिढीला निर्भयपणे विचार मांडण्याची हिंमत दिली. महाराष्ट्रातील अनेक पत्रकार, संपादक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींवर युवक क्रांती दलाच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. डॉ. कुमार सप्तर्षी यांचे संपूर्ण आयुष्य ही एक वादळवाट होती. त्या वाटेवर संघर्ष होते, आंदोलन होते, वैचारिक लढे होते, यश-अपयश होते. श्रद्धांजली-डॉ. नीलम गोऱ्हे कुमार सप्तर्षी यांच्या निधनानंतर आज आठवणींचा एक मोठा पट डोळ्यांसमोर उभा राहिला. त्यांची युवक क्रांती दल ही केवळ एक सामाजिक संघटना नव्हती. ती विचारांची, संघर्षाची आणि परिवर्तनाची चळवळ होती. १९७४ नंतर ते १९८३ या काळात माझाडॉ. कुमार सप्तर्षी यांच्याशी कमी-अधिक प्रमाणात परिचय झाला; मात्र काही वर्षे मला युवक क्रांती दलात सक्रियपणे काम करण्याची संधी मिळाली. त्या काळात आंदोलनांमधील त्यांचा धाडसी स्वभाव, प्रश्नांच्या मुळापर्यंत जाऊन शोध घेण्याची वृत्ती आणि त्या प्रश्नांशी दोन हात करण्याची तयारी मला जवळून अनुभवता आली. डॉ. कुमार सप्तर्षी यांची अनेक भाषणे ऐकण्याचा योग आला. नाशिकमधील कार्यक्रम, मुंबईतील युवक क्रांती दलाच्या गच्चीवरील बैठका, डॉ. अरुण लिमये यांच्यासह झालेल्या चर्चा या सर्वांमधून त्यांच्या विचारांचा आणि युवक क्रांती दलाच्या भूमिकेचा परिचय अधिक सखोल होत गेला. मात्र माझ्यावर सर्वाधिक प्रभाव पडला तो १९७५ मध्ये औरंगाबाद (आताचे छत्रपती संभाजीनगर) येथे झालेल्या युवक क्रांती दलाच्या शिबिराचा. त्या शिबिरात मला जाणवले की, कुमार सप्तर्षी हे एक व्यक्तिमत्त्व नव्हते, तर ती अनेक कार्यकर्त्यांना घडवणारी एक शाळाच होती. त्यांच्या आजूबाजूला वीस-पंचवीस जणांची सक्षम कार्यकर्त्यांची फळी होती. पुढे याच कार्यकर्त्यांपैकी अनेकजण महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात महत्त्वाच्या स्थानावर पोहोचले. काही आजही विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत, तर काही दुर्दैवाने आपल्यात नाहीत.
युवक क्रांती दलाची एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धती होती. वैयक्तिक निर्णयांवर संघटनेने बंधने घातली नाहीत, तरी महत्त्वाच्या निर्णयांपूर्वी मुक्तपणे चर्चा करण्याची संस्कृती होती. त्याचाच अनुभव मला आणि आनंद करंदीकर यांना आला. आम्हा दोघांपैकी कोणी तरी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करावे का, कुठे करावे आणि ही जबाबदारी प्रथम कोणी घ्यावी, याबाबत आम्ही डॉ. कुमार सप्तर्षी यांचा सल्ला घेण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी त्यांनी अत्यंत वस्तुनिष्ठ विश्लेषण केले. माझे वैद्यकीय शिक्षण आणि काम लक्षात घेता मी कोणत्याही शहरात वा खेड्यात कार्य करू शकते, तर आनंद यांच्या नोकरीच्या मर्यादा वेगळ्या होत्या. त्याचबरोबर मराठवाड्यात युवक क्रांती दलाचे काम अधिक विस्तारण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी आम्हाला सांगितले की, कार्यकर्त्याने केवळ भावनेने नव्हे, तर समाजहित, परिस्थिती आणि संघटनेच्या गरजा लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. दोन-तीन वर्षांनी स्वतःच्या कामाचे मूल्यमापन करावे, कार्यकर्ते तयार झाले की नवीन प्रदेशात काम सुरू करावे, अशी त्यांची भूमिका होती. त्यांच्या या मार्गदर्शनातून आम्ही उदगीर येथे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. आणीबाणीचा काळ ही युवक क्रांती दलासाठी मोठी कसोटी होती. त्या काळात डॉ. कुमार सप्तर्षी तुरुंगात होते. मात्र जवळपास वीस महिन्यांच्या त्या काळात राशीन (जि. अहिल्यानगर) परिसरातील कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवणे, त्यांना मदत करणे, आर्थिक सहाय्य उभे करणे आणि संघटनात्मक बळ टिकवून ठेवणे ही अनेक कामे आम्ही केली. या काळात अनेक नव्या कार्यकर्त्यांची जडणघडण झाली.
आणीबाणीनंतर युवक क्रांती दलासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला. संघटनेने थेट राजकीय भूमिका घ्यावी का, हा विषय अनेक चर्चांचा केंद्रबिंदू होता. कार्यकर्त्यांमध्ये मतभेद होते. पुढे काळाच्या ओघात अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये गेले ही देखील वस्तुस्थिती आहे; परंतु डॉ. कुमार सप्तर्षी यांनी स्वतःच्या लोकप्रियतेच्या आणि लोकांमधील विश्वासाच्या बळावर आमदार म्हणून निवडून येण्याइतकी लोकमान्यता मिळवली. मात्र त्याच काळात युवक क्रांती दलाच्या मोठ्या आंदोलनांची ताकद हळूहळू कमी होत गेली. देशातील राजकीय परिस्थिती बदलत होती. अनेक विचारवंत आणि नेत्यांनी विविध भूमिका स्वीकारल्या. राष्ट्रीय स्तरावर द्विध्रुवीकरण झाले. बिहार, उत्तर प्रदेश येथे समाजवादी पक्षाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण डॉ. कुमार यांनीही आपल्या वैचारिक भूमिकेशी प्रामाणिक राहत लेखन, व्याख्याने आणि सामाजिक हस्तक्षेप सुरू ठेवला. ‘सत्याग्रही विचारधारा’सारख्या माध्यमांमधून त्यांचे समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने चालू राहिले. माझ्या राजकीय प्रवासात पुढे आमचा प्रत्यक्ष संपर्क कमी झाला. याचे कारण वैयक्तिक दुरावा नव्हता; परंतु आम्ही वेगवेगळ्या राजकीय प्रवाहांत काम करू लागलो होतो. मी शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असताना पक्षशिस्त आणि जबाबदाऱ्यांना प्राधान्य देणे आवश्यक होते. त्यामुळे युवक क्रांती दलाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे शक्य झाले नाही. मात्र विचारांचा सन्मान आणि व्यक्तीबद्दलचा आदर कधीही कमी झाला नाही. डॉ. कुमार सप्तर्षी यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी एका पिढीला निर्भयपणे विचार मांडण्याची हिंमत दिली. महाराष्ट्रातील अनेक पत्रकार, संपादक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींवर युवक क्रांती दलाच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. म्हणूनच आमच्या स्त्री आधार केंद्र आणि क्रांतिकारी महिला संघटनेच्या कामातही जातीविहीन, वर्गविहीन आणि स्त्री-पुरुष समतेच्या समाजाची त्यांची संकल्पना प्रेरणादायी ठरली. त्या विचारातून अनेक संवेदनशील आणि जाणीवसंपन्न कार्यकर्ते घडले. आम्ही समतेसाठी निरंतर कृती हेच घोषवाक्य स्वीकारले आहे.
डॉ. कुमार सप्तर्षी यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बदलत्या काळातही युवक क्रांती दलाला नव्याने उभारी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी मला एका कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले होते. मी त्या वेळी गेले, शुभेच्छा दिल्या, मनोगतही मांडले; परंतु पुनश्च युक्रांदिय म्हणून सक्रिय होणे शक्य नव्हते. ‘युक्रांद’कडून गरिबांना घरे न देता फसवणुकीच्या विरोधात एका बाहुबलीविरोधात आंदोलन झाले होते. त्यात मी शेवटपर्यंत प्रशासनाला रोखून होते. २०१४ ते २०१९ या कालावधीत त्यासाठी मला शिवसेनेच्या नेत्यांनी पूर्ण सहकार्य दिले होते. आज त्यांच्या स्मृती जागवत असताना एक वाक्य पुन्हा पुन्हा आठवते, ‘अन्यायाच्या काळातील शांतता ही बंडाची सुरुवात असते.’ हे वाक्य आमच्या पिढीला संघर्षाची दिशा देणारे ठरले. विधायक काम, रचनात्मक कार्य आणि आवश्यक तेथे संघर्ष यांचा समतोल कसा साधायचा, हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो.
डॉ. कुमार सप्तर्षी यांचे संपूर्ण आयुष्य ही एक वादळवाट होती. त्या वाटेवर संघर्ष होते, आंदोलन होते, वैचारिक लढे होते, यश-अपयश होते. या कार्यात पत्नी ऊर्मिला, मुलगा कबीर, भाऊ, बहीण, प्रवीण, अनिल, मंगल बडवे, कुमार यांचे आई-बाबा यांना बसलेली झळ मी समजू शकते. परिस्थिती समजून घेण्याबद्दल मला ऊर्मिलाच्या माहेरच्या नातेवाइकांचेही कौतुक वाटते. काही बदल समाजाने स्वीकारले, काहींना विरोध झाला; पण समतेचा, सामाजिक न्यायाचा आणि परिवर्तनाचा ध्यास डॉ. कुमार सप्तर्षी यांनी आयुष्यभर सोडला नाही. आज ते आपल्यात नसले तरी त्यांनी घडवलेले कार्यकर्ते, त्यांनी रुजवलेले विचार आणि त्यांनी दिलेली संघर्षाची प्रेरणा समाजात कायम जिवंत राहील. जातीविहीन, वर्गविहीन आणि स्त्री-पुरुष समतेवर आधारित समाजव्यवस्थेचे त्यांचेस्वप्न पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या स्मृतींना मी भावपूर्ण अभिवादन करते. (डॉ. गोऱ्हे या विधान परिषद सदस्य आहेत.)






