Saturday, July 25, 2026

तुला न कळले, मला न कळले

तुला न कळले, मला न कळले

नॉस्टॅल्जिया-श्रीनिवास बेलसरे पद्मभूषण ना. सी. फडके हे कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांच्या व्याख्यानांना खूप गर्दी होत असे. ते विद्यार्थ्यात इतके लोकप्रिय होते की त्यांची एक विद्यार्थिनी कु. कमला दीक्षित त्यांच्या प्रेमातच पडली. पूर्वीची ४ अपत्ये असलेल्या फडकेंनी मग पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन कमलाशी लग्न केले. ते लग्न चांगलेच वादग्रस्त ठरले होते. त्यावर आचार्य अत्र्यांनीही टीका केली होती.विपुल कलावादी लेखन करणाऱ्या प्रा. फडक्यांची ३६ पुस्तके प्रकशित झाली. त्यात ७ जीवनचरित्रेसुद्धा आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी, मोहनदास करमचंद गांधी, यांच्याही चरित्रांचा यात समावेश आहे. त्यांच्या १९१७ साली प्रकाशित झालेल्या पहिल्या कादंबरीचे नाव होते ‘अल्ला हो अकबर.’

फडकेंचे सुधारणावादी विचार प्रकट केलेल्या ‘कनकशोभा’ नावाच्या त्यांच्या कादंबरीवर दत्ता धर्माधिकारी यांनी १९६१ साली त्याच नावाचा सिनेमा काढला. प्रमुख भूमिकेत होते मराठीतील सुपरस्टार सूर्यकांत मांढरे, जयश्री गडकर, गणेश अभ्यंकर (विवेक) आणि चित्तरंजन कोल्हटकर. सिनेमातील गाणी लिहिली होती स्व. शांताबाई शेळके यांनी (त्या १९६० ते १९६४ या काळात सेन्सॉर बोर्डावर असल्याने इतर कामे करू शकत नव्हत्या म्हणून त्यांचे नाव त्या काळातील काही गाण्यांवर दिसत नाही) सिनेमाचे संगीत होते सुधीर फडके यांचे!

स्व. शांताबाईंची सगळी गाणी खूप गाजली. या सिद्धहस्त कवयित्रीचे मराठी साहित्यातील योगदान फार मोठे आहे. भजने, भावगीते, भक्तिगीते, प्रेमगीते, द्वंदगीते इथपासून तमाशापटांसाठी रांगड्या बोलीतील लावण्या असे मराठी साहित्यातले एकही क्षेत्र नाही जिथे शांताबाईंनी आपल्या लेखणीचा ठसा उमटवला नाही. तरीही शांताबाई पुन्हा या सगळ्यापलीकडे जाऊन दशांगुळे उरतातच.त्यांची गाणी नियमित आकाशवाणीच्या लोकप्रिय कार्यक्रमात ऐकवली जात.‘कलंकशोभा’मधील गाणीही लोकप्रिय झाली. त्याकाळी गणेशोत्सवात अनेक वाद्यवृंद (ऑर्केस्ट्रा) गावोगावी फिरत असत. त्यांना प्रेक्षकांकडून या सिनेमातील गाण्यांचा हमखास आग्रह होई. त्यात ‘आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे’ आणि ‘तुला न कळले, मला न कळले’ ही दोन गाणी खूपच लोकप्रिय होती. एकाचा आस्वाद आपण मागे एकदा घेतला आहे.

नुकत्याच प्रेमात पडलेल्या युगुलांच्या मनात सतत भावनांचे नुसते वादळ उसळत असते. एकदा समोरच्या व्यक्तीकडून अनुकूल प्रतिसाद मिळाला की ते थोडे शमते, तरीही मनाच्या पटलावर सतत लाटा उसळत राहतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, अनुभव, भावना, चिंतासुद्धा एकमेकाला सांगितल्याशिवाय चैन पडत नाही. त्यांचे मनोहारी चित्रण करणारे दुसरे एक गाणे सुधीर फडके आणि आशाताईंच्या खास लाडीक आवाजातले होते. तेही रसिकांना खूप आवडले होते. अगदी साधासरळ आशय असलेले हे गाणे प्रेमात पडतानाच्या दोघांच्या हळुवार अनुभवाचे शेयारिंग आहे. त्यांचे त्यांनाच आश्चर्य वाटते की आपण एकमेकांच्या प्रेमात कसे पडलो? दोघे एकमेकाला सांगतात - ‘कसे प्रीतीचे धागे जुळले! तुला न कळले, मला न कळले...’ एकमेकांच्या प्रेमात पडतानाची एकेक गोड आठवण त्यांना पुन्हा पुन्हा एकमेकाला सांगावीशी वाटते. कशी आपली पहिली नजरानजर झाली आणि नकळत डोळ्यांत स्मित उमटले. एक वेगळीच संवेदना जाणवू लागली. बोललो नाही तरी दोघांचे ते मौनच दोघांनाही किती गोड वाटले होते. पहाटे आपोआप एखादी कळी उमलून तिचे फुलात रूपांतर व्हावे तसे आपल्या मनाचे झाले! - ‘ते डोळ्यांचे पहिले मिलन, ते पहिले स्मित, ते संवेदन, शब्दाहून ते गोड मुकेपण, कसे कळीचे फूल उमलले. तुला न कळले, मला न कळले!’ त्यांची त्यांनाच गंमत वाटते, की आपण सुरुवातीला कसे संकोचलो होतो, मनात टोकाची आतुरता जागी झाली होती तरीही आपल्याच विचारांची कशी लाज वाटली होती, समोरच्या प्रिय व्यक्तीने वेगळाच अर्थ काढला, तर काय अनर्थ होईल ही भीती एकीकडे आणि मनात नव्यानेच निर्माण झालेली प्रीती दुसरीकडे यातून मनात कसे प्रेमाचे गाणे गुणगुणले गेले तेही दोघांना आठवते आणि ते मोहरून जातात - ‘थोडी लज्जा थोडी भीती, ओढ अनावर आतुरता ती, कशी जागली हृदयी प्रीती, कसे मनातून गीत उजळले, तुला न कळले. मला न कळले.’ हळूहळू का होईना मग भेटी होऊ लागतात, कधी उघडपणे तर कधी लपून छपून! पहिल्या भेटीत अभावितपणे झालेल्या स्पर्शाची आठवण दोघानाही मजेशीर वाटते. त्याक्षणी जणू काळ थांबला असेच त्यांना वाटून गेलेले असते किंवा तो थांबावा अशी त्यांनी मनोमन प्रार्थना केलेली असते.पहिल्या भेटीतल्या सुखद स्पर्शातून मन कसे मोहरून गेले, मनात कसा वसंत ऋतूच फुलतोय असे वाटले होते, हेही त्यांना एकमेकाला सांगायचे असते. ‘तिने माझे मन जिंकले की मी तिचे?’ याबद्दलही दोघांना कमालीची उत्सुकता वाटत असते. म्हणून ते एकमेकाला कधीकधी अगदी साळसूदपणे विचारूनही बघतात. ती म्हणते, “एवढं काय पाहिलं हो माझ्यात?” किंवा तो विचारतो, “माझ्यात असं काय पाहिलंस गं की तू माझ्या प्रेमात पडलीस?” असे उगाच विचारून मनात गुदगुल्या होत असताना अजून खात्री करून घेतली जाते. ‘स्पर्श लाजरा होता पहिला, काळ थांबुनी उभा राहिला. कणाकणांतून वसंत फुलला, कुणी कुणाला कसे जिंकिले? तुला न कळले, मला न कळले....’ हल्लीसारखे प्रेम म्हणजे एकमेकाची आर्थिक परिस्थिती बघून, विनासायास सुखी, विलासी आयुष्य मिळवण्यासाठी चतुराईने रचलेला डाव अशी व्याख्या जेव्हा नव्हती तेव्हाच्या सोन्यासारख्या स्वच्छ-सुंदर काळातल्या या गोष्टी!‘तारुण्यात प्रवेश करताना मनात आपोआप उमटलेली नैसर्गिक, सात्त्विक, ओढ म्हणजे प्रेम’ असे मानले जायचे तेव्हाच्या भाबड्या मानसिकतेत रमणारी ही भावमधुर गाणी! कुणाला ऐन यौवनात प्रवेश करतानाचा तो निरागसपणा, ती धुंदी ती स्निग्धता पुन्हा अनुभवयाची असेल, तर कधीमधी अशी ही गाणी अवश्य ऐकावीत!

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा