संवाद-गुरुनाथ तेंडुलकर
बाप मनाच्या एका कोपऱ्यात तो अजून बसला आहे वंशपरंपरेनं विणलेल्या खुर्चीत ठाण मांडून... युगानुयुगाचं जोखड त्याच्याही होतंच खांद्यावर... उजाडताच तो घराबाहेर पडायचा घेऊन, दिवेलागण होऊन गेल्यावर परतायचा थकून भागून... पण नजरेतील जरब ताजीच रहायची पापण्या मिटेस्तोवर... घरभिंतीपेक्षा मोठ्या भासायच्या त्याच्या अस्तित्वाच्या खुणा... त्याच्या करड्या सावलीखाली झाकून जायची, आईची मायाळू लगबग... चिडीचूप होऊन जायचं तिचं गजबजलेलं गोकूळ... तो झाला नाही आमचा मित्र, कधीच त्याने घातला नाही गळ्यामधे गळा दोन-चार लाफे लगावले प्रसंगी त्यातूनच व्यक्त व्हायचं त्याचं प्रेम त्याचा लळा... तो बाप होता, बापासारखं जगला... गेल्यानंतर माझ्यामध्ये, बाप बनून उरला... कवी : डॉ. संतोष पाठारे बाप मनाच्या एका कोपऱ्यात तो अजून बसला आहे वंशपरंपरेनं विणलेल्या खुर्चीत ठाण मांडून... युगानुयुगाचं जोखड त्याच्याही होतंच खांद्यावर... उजाडताच तो घराबाहेर पडायचा घेऊन, दिवेलागण होऊन गेल्यावर परतायचा थकून भागून... पण नजरेतील जरब ताजीच रहायची पापण्या मिटेस्तोवर... घरभिंतीपेक्षा मोठ्या भासायच्या त्याच्या अस्तित्वाच्या खुणा... त्याच्या करड्या सावलीखाली झाकून जायची, आईची मायाळू लगबग... चिडीचूप होऊन जायचं तिचं गजबजलेलं गोकूळ... तो झाला नाही आमचा मित्र, कधीच त्याने घातला नाही गळ्यामधे गळा दोन-चार लाफे लगावले प्रसंगी त्यातूनच व्यक्त व्हायचं त्याचं प्रेम त्याचा लळा... तो बाप होता, बापासारखं जगला... गेल्यानंतर माझ्यामध्ये, बाप बनून उरला... कवी : डॉ. संतोष पाठारेआई... मराठी भाषेतील दोन अक्षरांचा एक छोटासा शब्द. पण हा शब्द उच्चारला की आपल्या मनामध्ये अनेक प्रेमळ, स्नेहमयी, वात्सल्यपूर्ण भावना जागृत होतात. आईची महती सांगणारी अनेक संस्कृत सुभाषितं आहेत. ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गाद् अपि गरियसि’पासून ते ‘न मातृसमा छाया’पर्यंत...मराठीत आईवर लिहिलेल्या अनेक कविता आहेत ‘आईसारखे दैवत साऱ्या जगतामधी नाही’पासून ते ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविणा भिकारी’ पर्यंत... केवळ मराठीतच नव्हे तर भारतातील सर्वच भाषांत आई या विषयावर अनेक कविता-गाणी लिहिली गेली आहेत.
आईची महती अपरंपार आहे, यात शंकाच नाही. पण आई इतकीच आणखी एक महत्त्वाची व्यक्ती आपल्या आयुष्यात असते. ती व्यक्ती म्हणजे... आपला बाप...आईने मूल पोटात वाढवताना सहन केलेल्या वेदना, पुढे बाळाचं सांगोपन करताना काढलेले कष्ट, तिनं मुलांवर केलेले संस्कार हे सगळं सगळं मान्य आहे. पण त्याचबरोबर बापानं मुलांसाठी केलेला त्याग, स्वतःच्या छोट्या छोट्या हौसमौजेपासून अनेक भावनांना घातलेली मुरड चटकन कुणाच्या ध्यानात येत नाही. बाप म्हटला की, त्याची एक ठरावीक साचेबद्ध प्रतिमी आपल्या मनात तयार झालेली (की केलेली?) असते. बाप रागीट असतो. तापट स्वभावाचा असतो. तो विनाकारण ओरडतो, क्वचित मारतो देखील.
आईची माया आवडते पण बापाचा धाक, त्यानं लावलेली शिस्त, ती मोडल्यानंतर त्याच्या आवाजातून, डोळ्यांतून किंबहुना संपूर्ण देहबोलीतून व्यक्त होणारा संताप... अजाणत्या पोर वयात हे सगळं नकोसं वाटतं. लहान मुलांच्या दृष्टीनं आईचा पदर ही सुरक्षित जागा असते. पण बापाच्या बाबतीत... अनेकदा बापाच्या समोर जायला भीती वाटते. विशेषकरून काही चुकीची वर्तणूक झाली असेल तर...
पण पुढे वय वाढल्यानंतर ध्यानात येतं की ज्या बापाच्या समोर उभं रहाणंदेखील संकटसमान वाटत होतं तोच बाप हा सगळ्या संकटापासून रक्षण करणारा आपला सुरक्षा कवच असतो. तो कुटुंबाचा प्रमुख असतो. तो कर्ता असतो. बहुतेक कुटुंबात तो पोशिंदा असतो. याच बापावर आधारित आजची कविता. डॉक्टर संतोष पाठारे यांच्या कवितेचं शीर्षक आहे ‘बाप.’ ते लिहितात... मनाच्या एका कोपऱ्यात तो अजून बसला आहे वंशपरंपरेनं विणलेल्या खुर्चीत ठाण मांडून... बाप नावाचा माणूस समोर असला काय किंवा नसला काय तो प्रत्येक संवेदनशील माणसाच्या मनात कायमचा असतोच असतो. हा बाप जोवर सोबत असतो तोवर त्याची किंमत आपल्याला कळत नाही. किंबहुना अनेकदा तर तो त्याच्या कडक शिस्तीच्या स्वभावामुळे आणि धाकामुळे नकोसाच वाटतो. आपल्यापैकी बहुतेकांनी दंगल सिनेमा पाहिला असेल. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू गीता फोगट आणि बबीता कुमारी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात एक गाणं आहे. बापू सेहद के लिये तू तो हानिकारक है आपल्या मुलींना कडक शिस्त लावून कुस्तीपटू बनवण्याचा ध्यास घेतलेला बाप आणि त्या बापाच्या अथक प्रयत्नांमुळे पुढे त्या मुलींना मिळालेलं देदीप्यमान यश... चित्रपट पाहिला नसेल तर आवर्जून पाहा. लहान मुलाला आई उचलून कडेवर घेते. बाप मात्र मुलांना आपल्या खांद्यावर बसवतो... याचं कारण ठाऊक आहे आपल्याला...? कारण आईला आपण जे पाहिलंय, अनुभवलंय ते सगळं बाळाला दाखवायचं असतं. म्हणून ती कडेवर घेते. पण बापाच्या बाबतीत मात्र... आपण जे पाहिलं, अनुभवलं नाही ते देखील आपल्या मुलानं पहावं हीच भावना असते म्हणून तो मुलाला आपल्या खांद्यांवर बसवतो. बापाची ही भावना आपल्याला जाणवत नाही हे दुर्दैव... बापाचं आणि त्याहून अधिक आपलं... कवी संतोष पाठारे पुढे म्हणतात तो झाला नाही आमचा मित्र, कधीच त्याने घालला नाही गळ्यामधे गळा दोन-चार लाफे लगावले प्रसंगी त्यातूनच व्यक्त व्हायचं त्याचं प्रेम, त्याचा लळा बापाचं प्रेम अनेकदा उघड्या डोळ्यांना दिसत नाही. स्पर्शातून जाणवत नाही. शब्दांतून ऐकू येत नाही. पण ते सतत सोबत असतं. म्हणूनच तर वेदना झाल्यानंतर आपण कळवळून ‘आई गं’ म्हणतो, पण भीती वाटली की तोंडातून ‘बाप रे’ असे उद्गार आपसूकच येतात. शारीरिक वेदनेवर मलम लावायला आई हवी असते, पण मनातली भीती घालवायला मात्र बापच हवा असतो.अनेक साहित्यिकांनी आईला पृथ्वीची उपमा दिली आहे. ते योग्यही आहे. पण जर आईला पृथ्वी म्हटलं तर बापाला सूर्य म्हणावं लागेल. सूर्याचे चटके जाणवतात. त्याचा दाह अनेकदा असह्य होतो. पण तो नसतो तेव्हा... तेव्हा चहूकडून अंधार अंगावर येतो. जीव घाबरा होतो. म्हणूनच तर बाप असेपर्यंत त्याची किंमत जाणवली नाही तरी तो गेल्यानंतर माणसं पोरकी होतात. सैरभैर होतात. अचानक जबाबदारीचं न पेलवणारं ओझं खांद्यावर पडल्यासारखं होतं. बाप गेल्यानंतर जाणवतं की तो असायला हवा होता. त्याच्या धाकासह, त्याच्या शिस्तीसह, त्याच्या नजरेतल्या जरबेसह... कसाही असला तरी तो असायला हवा होता. कारण तो आपला बाप होता. सहज आठवल्या म्हणून एका हिंदी कवितेतल्या दोन ओळी उद्धृत करतोय... कुछ भी कहे पर यह बात पक्की है। बाप की डाँट मे ही बच्चे की तरक्की है।






