Thursday, June 18, 2026

Prasad Savkar Passes Away : रंगभूमी पोरकी! काळाच्या पडद्याआड गेले दिग्गज कलाकार प्रसाद सावकार...

Prasad Savkar Passes Away : रंगभूमी पोरकी! काळाच्या पडद्याआड गेले दिग्गज कलाकार प्रसाद सावकार...
गोव्याचे ज्येष्ठ नाट्यकर्मी, गायक आणि अभिनेते प्रसाद सावकार (Prasad Savkar ) यांचे बुधवारी निधन (Death) झाले. निधनावेळी त्यांचे वय ९८ वर्षे होते. पणजी येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रसाद सावकार हे मराठी संगीत नाट्यसृष्टीतील एक मान्यवर नाव होते. त्यांनी अनेक गाजलेल्या संगीत नाटकांमध्ये प्रमुख भूमिका साकारत आपल्या अभिनय आणि गायनाने रसिकांची मने जिंकली. शास्त्रीय संगीताची भक्कम पार्श्वभूमी आणि वैशिष्ट्यपूर्ण गायनशैली यामुळे त्यांना विशेष ओळख मिळाली होती. महाराष्ट्र ((Maharashtra)) आणि गोव्यातील विविध सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत मैफिली आणि नाट्यप्रयोगांमधून त्यांनी दीर्घकाळ कलाक्षेत्राची सेवा केली. अनेक युवा कलाकारांना त्यांनी मार्गदर्शन केले तसेच विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणूनही काम पाहिले. कला आणि संस्कृती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या निधनामुळे मराठी संगीत रंगभूमीतील एक महत्त्वाचा अध्याय संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मराठी संगीत नाटकांच्या जतन आणि संवर्धनासाठी त्यांनी दिलेले योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, अशा भावना श्रद्धांजली संदेशांमधून व्यक्त करण्यात येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पोस्ट शेअर करत त्यांना श्रध्दांजली वाहली. पोस्टमध्ये त्यांनी लिहले आहे की, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गायक, अभिनेते आणि मराठी संगीत रंगभूमीचे दिग्गज व्यक्तिमत्त्व प्रसाद सावकार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने मराठी संगीत नाट्यक्षेत्रातील एक तेजस्वी पर्व संपुष्टात आले आहे. त्यांच्या जाण्याने मराठी नाट्य आणि संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली असून, कला विश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या कार्याचा वारसा आणि सांस्कृतिक योगदान कायम स्मरणात राहील.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >