Tuesday, August 18, 2026

Ashish Shelar : Gen Z साठी मराठी चित्रपट निर्मितीत राज्य सरकार सहभागी होणार; आशिष शेलार यांची घोषणा

Ashish Shelar : Gen Z साठी मराठी चित्रपट निर्मितीत राज्य सरकार सहभागी होणार; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीला, विशेषतः Gen Z प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या विशेष चित्रपटाच्या निर्मितीत महाराष्ट्र शासन सहभागी होणार, अशी महत्त्वाची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली. आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), व्हिज्युअल इफेक्ट्स आणि अत्याधुनिक निर्मिती तंत्राचा वापर करून मराठी चित्रपटांना नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिसंवादात ॲड. शेलार (Ashish Shelar) बोलत होते.

‘कनेक्टिंग लिंक’वर काम करण्याची गरज :

मराठी चित्रपटांमध्ये दर्जा, गुणवत्ता, नावीन्य आणि अभिनयाची कोणतीही कमतरता नाही. मात्र चित्रपटाचे व्यावसायिक यश मिळवण्यासाठी निर्मितीबरोबरच स्क्रीन, वितरण व्यवस्था आणि प्रेक्षकवर्ग यांचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे, असे ॲड. शेलार (Ashish Shelar) यांनी सांगितले. ते म्हणाले, “मराठी चित्रपटांमध्ये गुणवत्ता आणि नावीन्य ठासून भरले आहे. मात्र निर्मितीइतकाच स्क्रीन, वितरण आणि प्रेक्षकवर्ग यांचाही अभ्यास आवश्यक आहे. यासाठी व्यवहार्य मॉडेल तयार झाल्यास महाराष्ट्र शासन त्यात गुंतवणूकदार म्हणून भूमिका घेईल.”

मराठी चित्रपटांना Gen Z शी जोडण्याचा प्रयत्न :

आजच्या तरुण प्रेक्षकांचा मनोरंजनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मोठ्या प्रमाणात बदलला आहे. स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियामुळे तरुणांना विविध भाषांमधील मनोरंजन सहज उपलब्ध होत आहे. अशा परिस्थितीत मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा आत्मा कायम ठेवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने Gen Z ला भावणाऱ्या कथा आणि चित्रपटांची निर्मिती करण्याची आवश्यकता आहे, असे शेलार (Ashish Shelar) यांनी स्पष्ट केले.

दक्षिण भारतीय चित्रपटांना मिळणाऱ्या भावनिक प्रतिसादाचा दाखला देत मराठी चित्रपटांसाठीही नव्या पिढीशी भावनिक नाते निर्माण करणारा प्रेक्षकवर्ग विकसित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

AI आणि व्हिज्युअल इफेक्ट्सचा वापर वाढवणार :

कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म आणि आधुनिक तंत्रज्ञान हे चित्रपटसृष्टीसमोर आव्हान असले तरी त्याचे संधीत रूपांतर करण्याची गरज आहे. यासाठी AI, नवीन तंत्रज्ञान, त्याची उपयुक्तता आणि संभाव्य आव्हाने यावर प्रात्यक्षिकांसह चर्चासत्रे आणि कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचनाही शेलार यांनी दिल्या. Gen Z प्रेक्षक अन्य भाषिक मनोरंजनाकडे वळण्याऐवजी मराठी चित्रपटांकडे आकर्षित व्हावेत, यासाठी उच्च दर्जाचे व्हिज्युअल इफेक्ट्स, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी निर्मितीमूल्यांचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. (Ashish Shelar)

निर्मितीचा आर्थिक भार सरकारही उचलणार :

अशा महत्त्वाकांक्षी चित्रपटाची निर्मिती करताना त्याचा संपूर्ण आर्थिक भार केवळ निर्मात्यांवर पडू नये, यासाठी राज्य सरकारनेही योग्य भूमिका बजावावी, असे ॲड. शेलार (Ashish Shelar) यांनी सांगितले. व्यवहार्य व्यावसायिक मॉडेल तयार झाल्यास शासन गुंतवणूकदार म्हणून सहभागी होण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चित्रनगरीला संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीची परिसंस्था बनवणार :

फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनीही चित्रपटसृष्टीतील बदलत्या तंत्रज्ञानावर भाष्य केले. चित्रपट हा केवळ कला किंवा व्यवसाय नसून कला, तंत्रज्ञान, अर्थकारण, निर्मिती आणि संस्कृती यांचा संगम असल्याचे त्यांनी सांगितले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात चित्रनगरीची भूमिका केवळ चित्रीकरणासाठी जागा उपलब्ध करून देण्यापुरती मर्यादित न राहता चित्रपटसृष्टीची संपूर्ण परिसंस्था निर्माण करण्याची आहे, असे त्या म्हणाल्या.

चित्रनगरीकडून पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, तंत्रज्ञान आणि ‘Ease of Doing Business’ यावर काम सुरू असून, त्यासाठी पाच आधारस्तंभ निश्चित करण्यात आले आहेत. महामंडळ आपल्या स्थापनेच्या ५०व्या वर्षात पदार्पण करत असल्याचेही त्यांनी सांगितले. या परिसंवादाला स्वाती म्हसे पाटील, उपव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजनीकर, महेश मांजरेकर, अशोक राणे, मेघराज राजेभोसले, राजेश मापुस्कर, सुशांत शेलार यांच्यासह अनेक चित्रकर्मी उपस्थित होते.

आधुनिक तंत्रज्ञान आणि मराठी संस्कृतीची सांगड घालत Gen Z ला केंद्रस्थानी ठेवून चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या या निर्णयामुळे मराठी चित्रपटसृष्टीला नव्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचण्याची मोठी संधी मिळणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >