Wednesday, June 17, 2026

Vaibhav Sooryvanshi : वैभव सूर्यवंशीमुळे पुन्हा वाद! आऊट असून अंपायरने दिला नॉटआऊट ? तरीही मोठी खेळी करण्यात अपयश...

Vaibhav Sooryvanshi : वैभव सूर्यवंशीमुळे पुन्हा वाद! आऊट असून अंपायरने दिला नॉटआऊट ? तरीही मोठी खेळी करण्यात अपयश...

Mumbai : भारत अ संघ सध्या श्रीलंकेत तिरंगी मालिकेत खेळत आहे. या मालिकेत भारत अ संघ चार पैकी दोन सामने जिंकला आणि दोन सामने हरला आहे. अफगाणिस्तान अ विरूद्ध बुधवार १७ जूनचा सामना भारताने जिंकला आहे. पण भारत अ च्या कामगिरीपेक्षा वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीचीच चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडणारा वैभव श्रीलंकेतील तिरंगी मालिकेत मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे. शिवाय अफगाणिस्तान अ विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यातील घटनेवरूनही सोशल मीडियात वैभवची चर्चा सुरू आहे.

वैभव सूर्यवंशीने श्रीलंका अ विरूद्धच्या पहिल्या सामन्यात १४, अफगाणिस्तान अ विरूद्धच्या पहिल्या सामन्यात ४४, श्रीलंका अ विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात २१ आणि अफगाणिस्तान अ विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात ३८ धावांचे योगदान दिले. याआधी आयपीएल २०२६ मध्ये वैभवने १६ सामन्यांत ७७६ धावा केल्या होत्या. आयपीएलमधील कामगिरी बघून बीसीसीआयने फक्त १५ वर्षांचा असूनही वैभवला भारत अ संघात खेळवण्याचा निर्णय घेतला. पण वैभव अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही.

भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातील दुसऱ्या सामन्यादरम्यान वैभव आणि श्रीलंका अ चे खेळाडू यांच्यात शा‍ब्दिक चकमक झाली होती. एका लंकेच्या खेळाडूला वैभवने धक्का दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता अफगाणिस्तान अ विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात नवा वाद झाला आहे. या सामन्यात वैभवने ३८ धावा केल्या. ही खेळी करत असताना तब्बल दोन वेळा त्याला जीवनदान मिळाले. पण या संधीचा फायदा घेऊन मोठी धावसंख्या उभारण्यात तो अपयशी ठरला.

एका सामन्यात वैभवला दोन जीवदान

वैभवने अफगाणिस्तान अ विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात २८ चेंडूत २ षटकार आणि ४ चौकार मारत ३८ धावा केल्या. पण या खेळी दरम्यान दुसऱ्या षटकात मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. मैदानावरील पंचाने त्याला बाद ठरवले. संशयास्पद झेल असल्यामुळे हे प्रकरण तिसऱ्या पंचाकडे अर्थात थर्ड अंपायरकडे गेले. रिप्लेमध्ये स्पष्ट झाले की, चेंडू जमिनीला स्पर्श करून गेला होता. त्यामुळे थर्ड अंपायरने पंचांचा निर्णय फिरवत वैभवला नाबाद घोषित केले. विशेष म्हणजे, यावेळी वैभवचे खातेही उघडले नव्हते. त्यानंतर वैभवने काही धावा केल्या. पण पुन्हा एकदा त्याला नशिबाने त्याची साथ दिली. मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात त्याने चेंडू हवेत मारला, परंतु अफगाणिस्तानच्या क्षेत्ररक्षकाला तो झेल टिपता आला नाही. अशा प्रकारे काही मिनिटांतच त्याला दुसरे जीवदान मिळाले.(Opration Tiger)

संक्षिप्त धावफलक : भारत अ विरूद्ध अफगाणिस्तान अ, मालिकेतील चौथा सामना

भारत अ - ५० षटकांत नऊ बाद ३१९ धावा

अफगाणिस्तान अ - ३६.५ षटकांत सर्वबाद २१८ धावा

निकाल - भारत अ १०१ धावांनी विजयी

भारताची तिरंगी मालिकेतील कामगिरी

भारत अ विरूद्ध श्रीलंका अ - मालिकेतील पहिला सामना - भारत अ आठ धावांनी विजयी

भारत अ विरूद्ध अफगाणिस्तान अ - मालिकेतील दुसरा सामना - अफगाणिस्तान डकवर्थ लुईस नियमानुसार ४ धावांनी विजयी

भारत अ विरूद्ध श्रीलंका अ - मालिकेतील तिसरा सामना - श्रीलंकेचा सुपर ओव्हरमध्ये विजय

भारत अ विरूद्ध अफगाणिस्तान अ - मालिकेतील चौथा सामना - भारत अ १०१ धावांनी विजयी

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >