Wednesday, June 17, 2026

Suicide News: वसई येथील धक्कादायक घटना, पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

Suicide News: वसई येथील धक्कादायक घटना, पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

मुंबई : राज्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्येच्या घटना समोर आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. वसई येथे एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या (Police Suicide) केल्याची घटना घडली असून, पुणे जिल्ह्यातील आदिवासी निवासी आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीनेही आत्महत्या (Student Suicide) केल्याची माहिती समोर आली आहे.

वसई वाहतूक विभागात कार्यरत असलेले दयानंद पाटील (वय 35) यांनी मंगळवारी आपल्या निवासस्थानी आत्महत्या केली. ते मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील रहिवासी होते. गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

प्राथमिक माहितीनुसार, ते काही काळापासून कौटुंबिक कारणांमुळे मानसिक तणावात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कोहिंडे आदिवासी निवासी आश्रम शाळेत दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पायल शिवाजी पारधी असे विद्यार्थिनीचे नाव असून, शाळा सुरू झाल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये शोककळा पसरली आहे.

आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. या दोन्ही घटनांमुळे मानसिक आरोग्याबाबत जागरूकता आणि वेळेवर मदतीची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >