पंढरपूर पोलिसांसमोर गूढ वाढले
पंढरपूर : धावत्या रेल्वेची धडक बसून 24 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू (Railway Accident Death) झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. मात्र, या प्रकरणाला धक्कादायक वळण तेव्हा मिळाले, जेव्हा मृत तरुणाचा तुटलेला पाय त्याच्या मावशीच्या घराच्या दरवाजावर टांगलेल्या अवस्थेत आढळून आला. या विचित्र आणि गूढ प्रकारामुळे संपूर्ण पंढरपूर शहरात खळबळ उडाली असून नातेवाइकांनी हा अपघात नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. (Pandharpur Crime)
मृत तरुणाचे नाव रोहित मधुकर कोरे (वय 24, रा. अनिलनगर, पंढरपूर) असे आहे. तो रिक्षाचालक म्हणून काम करत होता.
पंढरपूर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास टेंभुर्णी रेल्वे गेटजवळ एका तरुणाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला.
- शिवसेनेत विलीनीकरणाचा मार्ग मोकळा; वर्धापनदिनी मांडणार भूमिका मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेल्या 'ऑपरेशन ...
दरम्यान, शहरातील एका घराच्या दरवाजाला मानवी पायाचा तुकडा टांगलेला असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, तो पाय रेल्वे अपघातात मृत झालेल्या तरुणाचाच असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. पुढील तपासात मृत व्यक्ती रोहित कोरे असल्याचे स्पष्ट झाले.
रोहितचा तुटलेला पाय त्याच्या मावशीच्या घराच्या दरवाजावर नेमका कोणी आणि कोणत्या हेतूने टांगला, हा प्रश्न सध्या अनुत्तरित असून पोलिसांसाठी मोठे कोडे ठरला आहे.
या घटनेनंतर रोहितच्या कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त करत हा अपघात नसून सुनियोजित हत्या असल्याचा आरोप केला आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मृत्यूच्या काही वेळ आधी रोहितचा काही व्यक्तींशी वाद झाला होता. त्याच वादातून त्याची हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह रेल्वे रुळांवर टाकण्यात आला असावा, असा त्यांचा संशय आहे.
Nashik : नाशिक जिल्ह्यावर यंदा एल निनोचा (El Nino) प्रभाव स्पष्टपणे जाणवू लागला आहे. पावसाच्या लांबलेल्या प्रतीक्षेमुळे धरणांतील जलसाठा घटत चालला आहे. जून ...
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. पोलिसांनी रोहितच्या मोबाईल कॉल डिटेल्स, सीडीआर आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.
रोहितचा मृत्यू अपघातामुळे झाला की त्यामागे घातपात आहे, याचे उत्तर तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.






