Tuesday, May 26, 2026

RCB VS GT : RCB ची थेट फायनलमध्ये एंट्री! गुजरातचा ९२ धावांनी धुव्वा

RCB VS GT : RCB ची थेट फायनलमध्ये एंट्री! गुजरातचा ९२ धावांनी धुव्वा

मुंबई : आयपीएल २०२६ च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये (Qualifier) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने गुजरात टायटन्सचा (GT) तब्बल ९२ धावांनी पराभव करत थेट अंतिम फेरीत धडक मारली. आरसीबीने (RCB) प्रथम फलंदाजी (Batting) करताना २० षटकांत २५४ धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा संपूर्ण संघ १६२ धावांवर गारद झाला आणि आरसीबीने एकतर्फी विजय नोंदवला.

२५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. संघाचा प्रमुख फलंदाज साई सुदर्शन अवघ्या १४ धावांवर बाद झाला, तर कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) केवळ २ धावा करून माघारी परतला. या धक्क्यांनंतर जोस बटलर (Jos Buttler) आणि निशांत सिंधू (Nishant Sindhu) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. बटलर काही काळ चांगला खेळला, मात्र २९ धावांवर त्यालाही माघारी जावे लागले बटलरच्या विकेटनंतर गुजरातचा डाव अक्षरशः कोसळला. निशांत सिंधू ५, वॉशिंग्टन सुंदर ८ आणि जेसन होल्डर शून्यावर बाद झाले. त्यामुळे गुजरातची अवस्था अत्यंत बिकट झाली. त्यानंतर राहुल तेवतिया आणि राशिद खान यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र राशिद खानही केवळ ८ धावांवर बाद झाला.

राहुल तेवतियाने अखेरपर्यंत झुंज देत ६८ धावांची लढाऊ खेळी केली. मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. परिणामी गुजरातचा डाव १६२ धावांवर संपुष्टात आला आणि आरसीबीने ९२ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले. दुसरीकडे, गुजरात टायटन्सला आता दुसऱ्या क्वालिफायरमध्ये विजय मिळवून अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.

गुजरातसाठी सर्वात मोठी चूक १४ व्या षटकात घडली. प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर (Balling) रजत पाटीदार १४ धावांवर खेळत असताना कुलवंत खेजरोलियाने त्याचा सोपा झेल (Catch) सोडला. विशेष म्हणजे त्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा पाटीदारचा झेल (Catch) त्याच्याकडून सुटला. या दोन जीवदानांचा फायदा घेत पाटीदारने गुजरातच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. झेल (Catch) सोडण्याबरोबरच गुजरातच्या क्षेत्ररक्षकांकडून अनेक चुका झाल्या. काही महत्त्वाच्या क्षणी मिसफिल्डिंग झाल्याने आरसीबीला सहज चौकार मिळाले. शेवटच्या षटकात रजत पाटीदार ९२ धावांवर खेळत असताना त्याला धावबाद करण्याची संधीही गुजरातकडे होती. मात्र जोस बटलरकडून झालेल्या चुकीमुळे ती संधीही वाया गेली.

गुजरातच्या पराभवाचे आणखी एक मोठे कारण म्हणजे त्यांच्या प्रमुख फलंदाजांचे अपयश. साई सुदर्शन, शुभमन गिल आणि जोस बटलर हे तिन्ही प्रमुख फलंदाज स्वस्तात बाद झाले. संपूर्ण हंगामात गुजरातची फलंदाजी मोठ्या प्रमाणात या तिघांवर अवलंबून राहिली होती. त्यामुळे हे तिन्ही खेळाडू लवकर बाद झाल्यानंतर संघ दबावाखाली आला आणि त्यातून सावरू शकला नाही.

सामन्याच्या पहिल्या टप्प्यात गुजरातच्या गोलंदाजांनी काही प्रमाणात नियंत्रण ठेवले होते. मात्र १४ व्या षटकानंतर चित्र पूर्णपणे बदलले. अखेरच्या सहा षटकांत आरसीबीने तब्बल ११४ धावा (Runs) घेतले. गुजरातच्या गोलंदाजांना धावांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि याच टप्प्यात सामना त्यांच्या हातातून निसटला.

२५५ धावांचे लक्ष्य स्वतःमध्येच आव्हानात्मक होते. त्यात सुरुवातीच्या विकेट्स (Wickets) गेल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांवर (Middle-order batsmen) मोठी जबाबदारी आली. मात्र कोणीही मोठी भागीदारी उभारू शकले नाही. राहुल तेवतियाने एकाकी झुंज दिली, पण इतर फलंदाजांनी निराशा केल्याने गुजरातला पराभव टाळता आला नाही. आरसीबीने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत वर्चस्व गाजवत दमदार विजय मिळवला. आता संघ अंतिम फेरीत पोहोचला असून पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद जिंकण्याचे त्यांचे स्वप्न आणखी एका पावलाने जवळ आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >