Saturday, August 15, 2026

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा
गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला जात आहे. गॉल कसोटीत नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय पहिल्या दिवशी भारतासाठी फायद्याचा ठरला. भारतीय फलंदाज देवदत्त पडिक्कलने १७८ चेंडूत नाबाद १३१ धावा केल्या. त्याने या खेळीला एक षटकार आणि बारा चौकारांनी सजवले. पडिक्कलच्या शतकामुळे भारताने पहिल्याच दिवशी २०० धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे बराच वेळ वाया गेला. पण भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी दोन बाद २८८ धावा केल्या. पडिक्कल आणि ऋषभ पंत खेळत आहेत. पंतने नाबाद २७ धावा केल्या आहेत. यात एक षटकार आणि तीन चौकारांचा समावेश आहे.
भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल ३७ चेंडूत पाच चौकार मारत ३२ धावा करू शकला. तो धावचीत झाला तर एक षटकार आणि नऊ चौकार मारत ७७ धावा करणारा केएल राहुल जखमी झाल्यामुळे मैदानाबाहेर (रिटायर्ड हर्ट) गेला आहे. कर्णधार शुभमन गिलने दोन चौकार मारत १६ धावा केल्या. तो प्रभात जयसूर्याच्या चेंडूवर लाहिरू उदाराकडे झेल देऊन परतला.
श्रीलंकेने फक्त तीन नोबॉल आणि दोन लेगबाय असे पाच अवांतर चेंडू वगळता पहिल्या दिवशी चांगली गोलंदाजी केली. शिवाय पावसाचाही भारताला फटका बसला. यामुळे भारतीय संघाने पहिल्या दिवशी ७३ षटकांत दोन बाद २८८ धावा केल्या. भारताची धावगती ३.९५ एवढीच आहे. आता दुसऱ्या दिवशी धावा काढण्याचा वेग वाढवून भारतीय संघ श्रीलंकेवरील दबाव वाढवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे तर श्रीलंका भारताची कोंडी करून लवकर विकेट मिळवण्याचा प्रयत्न करेल अशी शक्यता आहे.
जयस्वालला भोवली धडक वेगाने धाव घेताना गोलंदाजाला धडकणे जयस्वालला भोवले. तो लयीत येत असताना धावचीत झाला. तर चहापानानंतर पायात पेटके येऊ लागल्यामुळे केएल राहुलला मैदान सोडावे लागले. या दोन घटना आणि गिलने फटकेबाजीच्या प्रयत्नात गमावलेली विकेट यामुळे भारतीय संघाला पहिल्या दिवशी ३०० चा टप्पा पार करणे जमले नाही. अर्थात भारतीय संघ सध्या सुस्थितीत दिसत आहे. यामुळे दुसऱ्या दिवशी पडिक्कल आणि पंत काय करतात याकडे अनेकांचे लक्ष असेल. केएल राहुलच्या तब्येतीत सुधारणा झाली तर तो पुन्हा खेळण्याचीही शक्यता आहे. यामुळे श्रीलंकेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा