Tuesday, May 26, 2026

Weastern Railway : पश्चिम रेल्वेकडून मान्सूनपूर्व कामे पूर्ण

Weastern Railway : पश्चिम रेल्वेकडून मान्सूनपूर्व कामे पूर्ण
मुंबई : पश्चिम रेल्वेने आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेसाठी व्यापक तयारी पूर्ण केली असून, मुसळधार पावसातही लोकल सेवा सुरळीत ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत पश्चिम रेल्वेच्या या नियोजनामुळे उपनगरीय मार्गांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचणे किंवा दीर्घकाळ सेवा विस्कळीत होण्याच्या घटना टाळल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनपूर्व कामे ‘मिशन मोड’मध्ये हाती घेण्यात आली आहेत. नाले, पुलाखालील जलमार्ग आणि पावसाच्या पाण्याचा निचरा होणाऱ्या मार्गांची साफसफाई, गाळ काढणे, ट्रॅकजवळील कचरा हटविणे, अतिरिक्त पंप बसविणे आणि झाडांची छाटणी यांसारखी कामे मोठ्या प्रमाणावर पूर्ण करण्यात आली आहेत. रेल्वे प्रशासनाने ५८ पुल व पुलियांची साफसफाई हाती घेतली असून त्यापैकी सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच जवळपास ६० किलोमीटर नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम सुरू असून ५० किलोमीटरपेक्षा अधिक भागातील काम पूर्ण झाले आहे. संवेदनशील ठिकाणी नवीन नाले आणि मॅनहोलची उभारणीही करण्यात आली आहे.
पूरस्थिती टाळण्यासाठी उपनगरीय मार्गांवर १२६ उच्च क्षमतेचे पंप बसविण्यात आले असून, ही संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे १० टक्क्यांनी अधिक आहे. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीसाठी अतिरिक्त पंपही सज्ज ठेवण्यात आले आहेत.मान्सूनदरम्यान परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यासाठी ४० पूरमापक यंत्रे आणि ६ ऑटोमेटेड डिजिटल रेन गेज बसविण्यात आले आहेत. तसेच संवेदनशील पुलांवर स्काडा आधारित जलस्तर निरीक्षण प्रणाली बसवून पाण्याची पातळी रिअल टाइममध्ये तपासली जाणार आहे. पश्चिम रेल्वेने मलबा हटविण्यासाठी विशेष मोहिमही राबवली असून, गेल्या मान्सूनपासून आतापर्यंत ४८० हून अधिक ‘डेब्रिस स्पेशल’ गाड्या चालवण्यात आल्या आहेत. जेसीबी, पोकलेन आणि विशेष यंत्रणांच्या साहाय्याने ट्रॅक परिसरातील कचरा आणि गाळ हटविण्याचे काम सुरू आहे. ड्रोन आणि फ्लोटर कॅमेरा ड्रोनच्या सहाय्याने नाले व पुलांची पाहणी केली जात असून, विशेष सक्शन आणि डी-स्लजिंग मशीनद्वारे खोलवर साफसफाई केली जात आहे. चर्चगेट-विरार मार्गावर मायक्रो-टनलिंग प्रकल्पाद्वारे अतिरिक्त जलनिस्सारण व्यवस्था उभारण्यात आली असून, या मार्गावरील मायक्रो-टनल पाइप ओपनिंग्सची संख्या आता १९ वर पोहोचली आहे.माटुंगा रोड आणि वसई रोड यांसारख्या पूर्वी पाणी साचणाऱ्या संवेदनशील ठिकाणी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ट्रॅकची उंची वाढविणे, अतिरिक्त निचरा व्यवस्था आणि उच्च क्षमतेचे पंप बसवून संभाव्य अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच, बृहन्मुंबई पालिका, मीरा भाईंदर पालिका आणि वसई-विरार पालिका यांच्यासह संयुक्त पाहण्या करून विविध धरणे, बंधारे आणि जलवाहिन्यांची तपासणी करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेने या सर्व उपाययोजनांद्वारे मान्सून काळात प्रवाशांची सुरक्षितता, लोकल सेवेची विश्वासार्हता आणि अखंड वाहतूक सुनिश्चित करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >