Saturday, May 16, 2026

आंतरिक व्यक्तिमत्व

आंतरिक व्यक्तिमत्व

गोष्ट लहान, मोठा अर्थ - शिल्पा अष्टमकर

मनुष्याचे बाह्य रूप, पोशाख, बोलण्याची शैली किंवा सामाजिक प्रतिष्ठा पाहून आपण त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज बांधतो; परंतु खरे व्यक्तिमत्त्व हे बाह्य रूपात नसून मनाच्या गाभाऱ्यात दडलेले असते. मनातील विचार, भावना, संस्कार, मूल्ये, स्वभाव, वर्तन आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांचा मिळून जो परिणाम तयार होतो, त्यालाच आंतरिक व्यक्तिमत्त्व असे म्हणतात. हे व्यक्तिमत्त्व दिसत नसले तरी प्रत्येकाच्या वागणुकीतून सतत प्रकट होत असते. आंतरिक व्यक्तिमत्त्व हे माणसाच्या जीवनाचे खरे सौंदर्य आहे. एखादी व्यक्ती साधी असली तरी तिच्या मनातील प्रामाणिकपणा, नम्रता, सहकार्याची वृत्ती आणि सकारात्मक विचार यामुळे ती सर्वांच्या मनात स्थान निर्माण करते. उलट बाह्य आकर्षण असले, पण मनात अहंकार, मत्सर, स्वार्थ किंवा राग भरलेला असेल तर असे व्यक्तिमत्त्व टिकाऊ प्रभाव निर्माण करू शकत नाही. त्यामुळे व्यक्तीचे खरे मूल्य तिच्या अंतर्मनावर अवलंबून असते. माणसाचे विचार त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतात. जसे विचार, तसे आचरण आणि तसेच जीवन घडते. सकारात्मक विचार करणारी व्यक्ती संकटातही धैर्य टिकवून ठेवते. ती इतरांना मदत करते, चांगले संबंध निर्माण करते आणि समाजात आदर मिळवते. म्हणूनच मन स्वच्छ, शांत आणि सकारात्मक ठेवणे आवश्यक आहे.

आंतरिक व्यक्तिमत्त्व घडविण्यात संस्कारांचा मोठा वाटा असतो. बालपणी पालक, शिक्षक आणि समाजाकडून मिळालेले संस्कार व्यक्तीच्या विचारसरणीवर परिणाम करतात. सत्य बोलणे, इतरांचा आदर करणे, शिस्त पाळणे, कृतज्ञ राहणे, संयम ठेवणे आणि जबाबदारीने वागणे हे गुण व्यक्तिमत्त्व समृद्ध करतात. शिक्षण हे केवळ ज्ञान मिळविण्याचे साधन नसून उत्तम व्यक्तिमत्त्व घडविण्याची प्रक्रिया आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात अनेकजण बाह्य यशाच्या मागे धावताना अंतर्मन विसरतात. पैसा, प्रसिद्धी किंवा पद हे तात्पुरते असते; परंतु चांगले मन आणि चांगले विचार कायम टिकतात. म्हणूनच प्रत्येकाने स्वतःच्या मनाचा अभ्यास करणे, चुका स्वीकारणे आणि सतत स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. आत्मपरीक्षणामुळे व्यक्ती अधिक परिपक्व आणि संवेदनशील बनते. आंतरिक व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत - चांगले साहित्य वाचन, सत्संग, ध्यान, सकारात्मक विचार, चांगली संगत आणि सेवाभाव. इतरांच्या यशाचा मत्सर न करता प्रेरणा घेणे, अपयशातून शिकणे आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागणे यामुळे व्यक्तिमत्त्व अधिक सुंदर बनते.

शेवटी असे म्हणता येईल की, बाह्य सौंदर्य क्षणिक असते; परंतु आंतरिक सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्व आयुष्यभर माणसाला उंचीवर घेऊन जाते. म्हणून प्रत्येकाने स्वतःचे आंतरिक व्यक्तिमत्त्व समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कारण माणसाची खरी ओळख त्याच्या चेहऱ्यात नसून त्याच्या विचारांत आणि संस्कारांत असते.

१) मन (Mind) : मन एवं मनुष्याणाम् कारणम् बंधमोक्षयोः । मन हेच मनुष्याच्या बंधनाला व मोक्षाला कारण आहे. मनुष्याला चांगला, वाईट, पापी, दुराचारी बनविणे मनातील विचारावर अवलंबून असते. मनच मनुष्याला गुलाम किंवा स्वतंत्र बनविते. मनच मनुष्याला भाग्यवान किंवा करंटा बनविते. मनच माणसाला स्वर्गात किंवा नरकात नेऊन बसवते म्हणूनच ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ असे म्हणतात. शरीर हा स्थूल भाग व मन हा सूक्ष्म भाग आहे. सत्त्व, रज व तम असे मनाचे तीन गुण अध्यात्मामध्ये मानले आहेत. सत्त्व गुण जास्त असल्यास मनाची शक्ती जागृत असते व ज्ञान मिळविण्याचा तो प्रयत्न करते. रजोगुण जास्त असल्यास कर्म करण्याकडे जागृत प्रवृत्ती असते. तमोगुण जास्त असल्यास आळसात, व्यसनात वेळ घालविण्यास माणसास प्रवृत्त करतो. उपनिषदानुसार आपण जे अन्न सेवन करतो त्याच्या स्थूलभागाची विष्ठा बनते. मध्यम भागापासून रक्त मांस हाडे व शारीरिक अवयव बनतात व सूक्ष्म भागापासून मन बनते. उपनिषदामध्ये मनाचे वर्णन एका श्लोकामध्ये केले आहे.

बहिणाबाई चौधरींनी मनाचे समर्पक वर्णन आपल्या कवितेत केले आहे.

- मन वढाय वढाय । उभ्या पिकातलं ढोर ।। किती हाकला हाकला । फिरी येतं पिकांवर ।। मन मोकाट मोकाट । त्याले ठायी ठायी वाटा । जशा वाऱ्यानं चालल्या । पान्याव -हल्यारे लाटा ।।

मन ही जगातील गूढ, अजब व आश्चर्यकारक गोष्ट आहे. अत्यंत महत्त्वाची व न टाळता येणारी जबाबदारी टाकल्यास निष्क्रिय, आजारी व काम करण्यास असमर्थ व्यक्ती सुद्धा मानसिक सामर्थ्यावर कार्यक्षम होतात. चालायला न जमणाऱ्या व्यक्तीच्या मागे चोर, लुटारू, कुत्रा किंवा वाघ लागल्यास जीवाच्या आकांताने सर्व बळ एकवटून मनाच्या सामर्थ्यावर जबरदस्त वेगाने तो धावतो. तुकाराम महाराज मनाच्या सामर्थ्याविषयी म्हणतात,

‘मनाचे संकल्प पाववील सिद्धी । जरी राहे बुद्धी याचे ठायी ।।’

मानवी मनाची व्याप्ती विशाल असल्यामुळे मन महासागरासारखे विशाल व अथांग आहे. आपले मन दुसऱ्याला कळत नाही पण काही वेळा ते स्वतःला सुद्धा कळत नाही. मानवी अनुभवाच्या मुळाशी असणारी वस्तू दाखवता न येणारी वस्तू म्हणजेच मन होय. शरीराच्या हालचालींना प्रवृत्त करणाऱ्या व त्याचे नियमन करणाऱ्या अदृश्य शक्तीला मन म्हणतात. मन म्हणजे विचारांचा प्रवाह.

Mind is nothing but a flow of thoughts.

मन हे डोळ्यांना दिसत नाही. स्पर्शाने जाणवत नाही; परंतु त्याचे अस्तित्व आहे. सुगंध दिसत नाही; परंतु अनुभवास येतो. मन कशाचे बनले आहे? हे सांगता येत नाही; परंतु मनाच्या प्रचंड शक्तीचा अनुभव मात्र येतो. मन म्हणजे अजब चमत्कार आहे. आपल्या जीवनाला चांगला किंवा वाईट आकार देण्याचे कार्य मनातील विचार करतात.

As you think so you become.

मन करारे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ॥ मोक्ष अथवा भव बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥ मने प्रतिमा स्थापिली । मने मना पूजा केली ॥ मने इच्छा पुरविली । मन माऊली सकळांची ॥ मन गुरू आणि शिष्य । करी आपुलेचि दास्य ॥ प्रसन्न आप आपणास । गती अथवा अधोगती ॥ साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐकामात ॥ नाही नाही आन दैवत । तुका म्हणे दुसरे ॥

Comments
Add Comment